Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक (कविता)
Textbook Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…
प्रश्न 1.
खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ) (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – [मळवाट]
(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे
उत्तर:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – [खाचखळगे]
(आ)
उत्तर:
प्रश्न 2.
कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संदर्भ – स्पष्टीकरण
(१) मळवाट – (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(२) खाचखळगे – (आ) पारंपरिक वाट
(३) मूक समाज – (इ) अडचणी, कठीण परिस्थिती
उत्तर:
(१) मळवाट – पारंपरिक वाट
(२) खाचखळगे – अडचणी, कठीण परिस्थिती
(३) मूक समाज – अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
प्रश्न 3.
चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
उत्तर:
(i) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
(ii) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.
(iii) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.
प्रश्न 4.
चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती – पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
………………… – …………………
………………… – …………………
………………… – …………………
उत्तर:
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षानंतरची परिस्थिती
(i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली सूर्यफुले ध्यास घेत आहेत. होती.
(ii) रणशिंग फुकले होते. आता बिगूल वाट पाहत आहे.
(iii) चवदार तळ्याचे पाणी आता चवदार तळ्याचे पाणी पेटले होते थंड आहे.
प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) ‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
उत्तर:
आशयसौंदर्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.
काव्यसौंदर्य: उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.
भाषिक वैशिष्ट्ये: मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. ‘महाकाव्याची नम्रता’ व ‘काठ्यांच्या बंदुका’ या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.
(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्रयाच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. .अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.
(ई) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
उत्तर:
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.
Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
(i) मूक समाजाचे नायक
(ii) पाठ फिरवणारी
(iii) संपूर्ण जागृत केलेला
(iv) अगाध ज्ञानाच्या बळावर कुंकलेले –
(v) डॉ. आंबेडकरांच्या पायाजवळ गळून पडणारी
(vi) डॉ. बाबासाहेबांच्या डरकाळीने डळमळलेले
(vii) अजूनही प्रतीक्षा करणारा –
(vii) प्रस्तुत कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे
उत्तर:
(i) मूक समाजाचे नायक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(ii) पाठ फिरवणारी – सूर्यफुले
(iii) संपूर्ण जागृत केलेला – बहिष्कृत भारत
(iv) अगाध ज्ञानाच्या बळावर फुकलेले – रणशिंग
(v) डॉ. आंबेडकरांच्या पायाजवळ गळून पडणारी – महाकाव्ये
(vi) डॉ. बाबासाहेबांच्या डरकाळीने डळमळलेले – आकाश व पृथ्वी
(vii) अजूनही प्रतीक्षा करणारा – बिगूल
(viii) प्रस्तुत कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. – नाकेबंदी
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी…
प्रश्न.
पुढील कवितेसंबंधीत्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा: कविता-तू झालास मूक समाजाचा नायक.
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी: ज. वि. पवार.
(२) कवितेचा रचनाप्रकार: मुक्तछंद.
(३) कवितेचा काव्यसंग्रह: नाकेबंदी.
(४) कवितेचा विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माहात्म्य,
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: सर्वहारा समाजात अशक्यप्राय वाटणारी जागृती करून त्याला स्वबळावर उभे केल्याबद्दलचा कृतज्ञता भाव,
(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: कविता मुक्तछंदात आहे. ‘तू परिस्थितीवर स्वार झालास’, ‘इतिहास घडवलास’, ‘रणशिंग फुकलेस’, ‘गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्यास’, ‘आकाश हादरलं’, ‘पृथ्वी डचमळली’, ‘चवदार तळ्याला आग लागली’ यांसारख्या लढवय्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. पूर्वी दलित समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता. तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. हे ‘चवदार तळ्याला आग लागली’ या शब्दांतून प्रखरपणे व्यक्त होते. ‘आता दलित समाज शांत झाला आहे, ही बाब ‘चवदार तळ्याचे पाणी थंड झालंय’ या शब्दांतून व्यक्त होते.
(७) कवितेंची मध्यवर्ती कल्पना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महान कार्याबद्दल त्यांचे माहात्म्य कथन करण्यासाठी ही कविता लिहिली आहे. बाबासाहेबांनी सर्वार्थानी गांजलेल्या, पिचलेल्या समाजात जागृती निर्माण केली. त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला. दलित समाजाला नवा जन्म दिला. पूर्ण खचलेल्या मनांमध्ये आत्मविश्वास ओतला. ही बाबासाहेबांची कर्तबगारी या कवितेचा आशय आहे.
(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला आत्मविश्वास दिला. स्वत:च्या पायावर उभे केले. संपूर्ण दलित समाज त्या वेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला, चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला, दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झाला आहे. त्याचे बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरून गेले आहे. याविषयीची खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे.
(९) कवितेतील आवडलेली ओळ: आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत बिगूल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.
(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी शब्दांनी ओतप्रोत भरलेली आहे. कविता वाचत वाचत जाता बाबासाहेबांची महानता स्पष्ट होत जाते. त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे. शेवटच्या कडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. मात्र आता तोच दलित समाज शांत, थंड झाल्याची दु:खद जाणीव व्यक्त होते. ही दुःखद जाणीव शेवटच्या केवळ चार ओळींमध्ये व्यक्त झाली असतानाही आधीच्या जाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकूळ करते. हा दु:खभाव हाच या कवितेचा आत्मा आहे.
(११) कवितेतून मिळणारा संदेश: अज्ञान, दारिद्रय, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला. प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली. पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे. तो थंड झाला आहे. तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व ताकदीनिशी उठावे आणि पुन्हा एकदा विषमतेविरुद्ध लढ्याला सिद्ध व्हावे, अशी इच्छा कवी व्यक्त करतात. हाच या कवितेचा संदेश आहे.
रसग्रहण
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (इ) साठी…
प्रश्न. पुढील पंक्तींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा:
प्रश्न 1.
‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत बिगूल प्रतीक्षा करतोय चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’ (सराव कृतिपत्रिका-२)
उत्तर:
आशयसौंदर्य: दलितांवरील अन्यायाविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला लढा हा ‘चवदार तळ्याचा संग्राम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या लढ्याला पन्नास वर्षे उलटून गेल्यावर ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये या महामानवाला अभिवादन केले आहे. उपरोक्त ओळीत आताच्या परिस्थितीचे विदारक वर्णन केले आहे.
काव्यसौंदर्य: पन्नास वर्षे झाल्यानंतर चवदार तळ्याच्या संग्रामाचा ऊहापोह करताना व लढा थंड झाल्याची खंत व्यक्त करताना कवी म्हणतात-सुख-समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेतायत. परिस्थितीत बदल न झाल्यामुळे संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला असला, तरी पुन्हा पेटण्यासाठी पाणी आसुसलेले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये: ही कविता मुक्तच्छंदात (मुक्तशैली) आहे. त्यामळे भावनांचे व विचारांचे थेट प्रसारण योग्य शब्दांत झाले आहे. सूर्यफुले व बिगूल या प्रतीकांमुळे आशयघनता वाढली आहे. ‘चवदार तळ्याचं पाणी थंड पडणं’ या वाक्यखंडातून आताच्या विदारक परिस्थितीवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे.
प्रश्न 2.
‘तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.’
उत्तर:
आशयसौंदर्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित व पीडित जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा उभारला. मूकसमाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये त्यांच्या महत्कार्याचा गौरव करताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत.
काव्यसौंदर्य: चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची थोरवी गाताना कवी म्हणतात-प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही या वर्णव्यवस्थेने ग्रासलेल्या समाजाला जागृत केलेत. त्यांना नवविचारांची प्रेरणा देऊन नवीन इतिहास घडविला. अन्याय सहन करणाऱ्या जनतेचे तुम्ही महानायक झालात. बहिष्कृत असलेल्या पीडित समाजात नवचैतन्य निर्माण केलेत. त्यांच्यातील आत्मविश्वास जागवलात.
भाषिक वैशिष्ट्ये: मुक्तशैलीमध्ये लिहिलेली ही कविता त्यातील समर्पक शब्दांमुळे अर्थवाहक झाली आहे. ‘मूक समाज’ ‘बहिष्कृत भारत’ या संकल्पनांचा यथोचित वापर केल्यामुळे कविता परिणामकारक झाली आहे. सुयोग्य व ठाशीव शब्दकळा हे या कवितेचे बलस्थान आहे. थेट शब्दकळेमुळे ओज हा गुण दिसून येतो. आशयाला समर्पक अभिव्यक्तीची जोड मिळाल्यामुळे ओळी रसिकांच्या काळजाला भिडतात.
व्याकरण व भाषाभ्यास
(कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृतीः
१. समास:
पुढील समासांचे प्रत्येकी एकेक उदाहरण लिहा:
(i) अव्ययीभाव
(ii) विभक्ती तत्पुरुष
(iii) इतरेतर द्वंद्व
(iv) वैकल्पिक द्वंद्व
(v) समाहार वंद्व
(vi) द्विगू
(vii) कर्मधारय.
उत्तर:
(i) बेशक
(ii) भयमुक्त
(iii) आईबाबा
(iv) बरेवाईट
(v) हळदकुंकू
(vi) चौकोन
(vii) नीलपुष्प.
२. अलंकार:
‘व्यतिरेक’ या अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहा:
उत्तर:
लक्षणे: उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते, असे वर्णन केले असेल तर ‘व्यतिरेक’ हा अलंकार होतो.
उदाहरण:
‘तू माउलीहून मयाळ । चंद्राहुनि शीतळ ।
पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।।
३. वृत्त:
पुढील ओळींचे गण पाहून वृत्त ओळखा:
तुझ्या आसवांचा नभी पावसाळा
जशी सांज होता फुलांनी रडावे
उत्तर:
वृत्त – हे भुजंगप्रयात अक्षरगणवृत्त आहे.
४. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
‘गैर’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
[ ] [ ] [ ] [ ]
उत्तर:
[गैरहजर] [गैरसमज] [गैरसोय] [गैरशिस्त]
प्रश्न 2.
‘णारा’ हा प्रत्यय असलेले चार शब्द तयार करा:
उत्तर:
[ ] [ ] [ ] [ ]
[बोलणारा] [चालणारा] [लिहिणारा] [हसणारा]
प्रश्न 3.
‘शेजारीपाजारी’ यासारखे चार अभ्यस्त शब्द तयार करा:
उत्तर:
[बारीकसारीक] [उरलासुरला] [अघळपघळ] [आडवातिडवा]
५. सामान्यरूप:
पुढील शब्दांतील सामान्यरूप ओळखा:
(i) सूर्यफुलांनी
(ii) परिस्थितीवर
(iii) युद्धात
(iv) डरकाळीने
(v) वर्षांनी
(vi) ज्ञानाच्या.
उत्तर:
(i) सूर्यफुलांनी – सूर्यफुलां
(ii) परिस्थितीवर – परिस्थिती
(iii) युद्धात – युद्धा
(iv) डरकाळीने – डरकाळी
(v) वर्षांनी – वर्षां
(vi) ज्ञानाच्या – ज्ञाना.
६. वाक्प्रचार:
पुढील अर्थ असलेले वाक्प्रचार निवडा:
(i) वाट पाहणे –
(अ) प्रतीक्षा करणे
(आ) सहन करणे.
उत्तर:
वाट पाहणे – प्रतीक्षा करणे.
(ii) मदत न करणे – …………………………
(अ) अंग धरणे
(आ) पाठ फिरवणे.
उत्तर:
मदत न करणे – पाठ फिरवणे.
(iii) बाहेर ठेवणे – …………………………
(अ) उपकृत करणे
(आ) बहिष्कृत करणे.
उत्तर:
बाहेर ठेवणे – बहिष्कृत करणे.
भाषिक घटकांवर आधारित कृती:
१. शब्दसंपत्ती:
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा:
(i) खळगा= …………………………
(ii) जवान = …………………………
(ii) संघर्ष= …………………………
(iv) फूल = …………………………
उत्तर:
(i) खळगा = खड्डा
(ii) जवान = सैनिक, तरुण
(iii) संघर्ष = लढा
(iv) फूल = पुष्प.
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) काळोख x …………………………
(ii) चवदार x …………………………
(iii) मूक x …………………………
(iv) थंड x …………………………
उत्तर:
(i) काळोख x उजेड
(ii) चवदार x बेचव
(iii) मूक x बोलका
(iv) थंड x उष्ण, गरम.
प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा:
(i) मळवाटेने →
(ii) चवदार →
उत्तर:
(i) मळवाटेने → मळ – वाम – मवाळ – वाटेने
(ii) चवदार → चव – दार – वर – रख
प्रश्न 4.
गटात न बसणारा शब्द लिहा:
(i) पृथ्वी, अवनी, जमीन, वसुंधरा, रसा.
(ii) पाणी, जलद, तोय, उदक, नीर.
उत्तर:
(i) जमीन
(ii) जलद.
२. लेखननियम:
अचूक शब्द लिहा:
(i) ऐतिहासिक/ ऐतिहासीक / एतिहासिक /ऐतीहासिक.
(ii) वैश्विक / वेश्विक / वैश्वीक/वैस्विक.
(iii) माहीती /माहिती/माहिति /माहीति.
(iv) भवतिक / भौतीक / भौतिक / भौवतिक.
(v) वीपरीत / विपरीत / विपरित / वीपरित.
उत्तर:
(i) ऐतिहासिक
(ii) वैश्विक
(iii) माहिती
(iv) भौतिक
(v) विपरीत.
३. विरामचिन्हे:
विरामचिन्हांसमोर नावे लिहा:
[ : ] [ ]
[ ! ] [ ]
[ ; ] [ ]
[ ? ] [ ]
उत्तर:
(i) [ : ] [अपूर्णविराम]
(ii) [ ! ] [उद्गारचिन्ह]
(iii) [ ; ] [अर्धविराम]
(iv) [ ? ] [प्रश्नचिन्ह]
४. पारिभाषिक शब्द:
योग्य पर्याय निवडा:
(i) Correspondence – …………………………
(१) व्यवहार
(२) पत्रवाटप
(३) पत्रव्यवहार
(४) कर्जवाटप
उत्तर:
(३) पत्र्यव्यवहार
(ii) Humanism – …………………………
(१) व्यक्तिवाद
(२) भूतदया
(३) मानवतावाद
(४) सामाजिक
उत्तर:
(३) मानवतावाद
(iii) Journalism – …………………………
(१) वृत्तपत्र
(२) मुखपत्र
(३) पत्रकारिता
(४) प्रसिद्धी माध्यम
उत्तर:
(३) पत्रकारिता
(iv) Lecturer – …………………………
(१) शिक्षक
(२) प्राचार्य
(३) अधिव्याख्याता
(४) व्याख्याता
उत्तर:
(३) अधिव्याख्याता
(v) Pocket Money – …………………………
(१) जमाखर्च
(२) पैसाअडका
(३) हातखर्च
(४) पावती
उत्तर:
(३) हातखर्च
(vi) Qualitative – …………………………
(१) गुणपत्रक
(२) गुणात्मक
(३) प्रसिद्धी
(४) गणसंख्या
उत्तर:
(२) गुणात्मक
५. अकारविल्हे /भाषिक खेळ:
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
(i) रणशिंग → बिगूल → तुतारी → नगारा.
(ii) सूर्यफूल → मोगरा → गुलाब → चाफा.
उत्तर:
(i) तुतारी → नगारा → बिगूल → रणशिंग.
(ii) चाफा → गुलाब → मोगरा → सूर्यफूल.
(२) शब्द बनवा:
उत्तर:
तू झालास मूक समाजाचा नायक Summary in Marathi
तू झालास मूक समाजाचा नायक कवितेचा भावार्थ
वर्णव्यवस्थेला क्रूर दुष्ट चक्रात खितपत पडलेल्या शोषित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा संग्राम केला. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला कवींनी कवितेतून अभिवादन केले आहे. कवी म्हणतात –
हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचे साम्राज्य होते. दु:ख, दैन्य, दारिद्रय व सामाजिक असमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग ग्रासलेला होता. सतेज किरणांनी न्हायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही. तू एकाकी होतास, तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस. नवविचारांचा, जागृतीचा मार्ग खाचखळग्यांनी भरलेला अतिशय खडतर होता. खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले.
अशा या प्रतिकूल परिस्थितीची तू तमा बाळगली नाहीस. त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास, आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या सर्वहारा जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस. नवचैतन्य आणलेस, त्यांच्यात आत्मविश्वास जागा केलास.
तुझ्या अपरिमित, प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुकलेस, अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास. आतापर्यंत गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखळ्या तू तोडून टाकल्यास आणि एखादया युद्धात सैनिकांना सज्ज करावे, तसे चवदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस.
सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे, असे तुझे संघर्षमय शब्द होते. हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात, असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले नि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली म्हणजेच संघर्ष पेटला.
या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता पन्नास वर्षे उलटून गेली. कवी म्हणतात – पन्नास वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभवू पाहतो. अजूनही ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगूल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला आहे. (पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसलेले आहे. शोषितांची परिस्थिती फारशी चांगली नाही.)
तू झालास मूक समाजाचा नायक शब्दार्थ
- मूक – अबोल,
- नायक – नेते, कप्तान, अग्रणी, प्रणेता.
- खाचखळगे – खड्डे.
- स्वार – आरूढ.
- बहिष्कृत – बाहेर टाकलेला, परित्यक्त.
- अगाध – प्रचंड.
- बळ – शक्ती, सामर्थ्य.
- बेड्या – साखळ्या.
- जवान – सैनिक.
- संघर्ष – लढा, झुंज.
- संगिनी – बंदुका,
- डरकाळी – वाघाची आरोळी.
- हादरणे – थरथरणे.
- डचमळली – डळमळीत झाली.
- प्रतीक्षा – वाट पाहणे.
तू झालास मूक समाजाचा नायक वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- पाठ फिरवणे : मदत न करणे, वंचित ठेवणे.
- स्वागत करणे : मानाने, आदराने एखादया व्यक्तीला या म्हणणे.
- परिस्थितीवर स्वार होणे : परिस्थितीवर मात करणे,
- बहिष्कृत करणे : बाहेर ठेवणे, वंचित करणे.
- रणशिंग फुकणे : युद्ध सुरू होण्याचा इशारा देणे.
- बेड्या तोडणे : स्वतंत्र होणे,
- गळून पडणे : निखळून पडणे.
- ध्यास घेणे : एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे.
- प्रतीक्षा करणे : वाट पाहणे.