Chapter 4.1 काझीरंगा (स्थूलवाचन)
Chapter 4.1 काझीरंगा (स्थूलवाचन)
Textbook Questions and Answers
स्वाध्याय :
1. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.
प्रश्न 1.
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.
(अ) भौगोलिक वैशिष्ट्ये
(आ) प्राणिजीवन
उत्तर:
साचा भारताचे भूषण असलेले काझीरंगा हे अभयारण्य आसाम राज्यात सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर परिसरात वसलेले आहे. या परिसरात सर्वत्र चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. इथल्या कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य असते. त्याचबरोबर इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की, त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो.
या अभयारण्यात वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये इतकी विविधता आहे की, अशी विविधता एक आफ्रिका सोडल्यास इतात्र कुठेही अढळत नाही. हुलॉक नावाचा शेपटी नसलेला वानर फक्त इथेव आढळतो. आसामचे वैशिष्ट्य दाखविणारा दुसरा खास प्रापो म्हणजे एकशिंगी गेंडा होय. या ठिकाणी सगळे वन्यपशू बहुतेक सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. इथल्या गवतांमध्ये मनसोक्त चरणाऱ्या रानम्हशींचा कळप पाहिला की, मन आनंदून जाते. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांचा उड्या मारत वेगाने पळत जाणारा कळप पाहिला की, मन समाधानाने भरून जाते.
2. ‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
प्रश्न 1.
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
काझीरंगा अभयारण्यातील कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य आहे. शिवाय या ठिकाणी सर्वत्र खूप उंचच उंच गवतवाढलेले दिसते. त्यामुळे इथे जंगल सफारीसाठी पंधरावीस हत्ती खास शिकवून तयार केले आहेत. या प्राण्यांचे गंधज्ञान फारच जबरदस्त असते. तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेऊन आपल्या शत्रूचा, थोडक्यात जवळपास असलेल्या मृत्यूचा अंदाज त्यांना घेता येतो. त्यामुळे सावधपणे चालत चालत ते पुढचा रस्ता पार करतात. शिवाय जमिनीचा व गवताचा वास घेत घेत परतीचा प्रवास सहजपणे त्यांना करता येतो.
3. ‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
प्रश्न 3.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
भारताच्या आसाम राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत थोडा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे या भागात झाडे – झुडुपे आणि गवत भरपूर उगवते. त्यामुळेच येथील काझीरंगाच्या अपयारण्यात चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. काही ठिकाणी तर कमरेइतका चिखल आढळतो. त्यातून फिरणे माणसाला अशक्यच होऊन जाते.
या चिखलामुळेच वैशिष्ट्यपूर्ण असा एकशिंगी गेंडा या अभयारण्यात आढळतो. आपले शरीर थंड ठेवण्यासाठी तो स्वत:ला चिखलाने माखून घेत असतो. चिखलात पूर्णपणे माखलेला गेंडा, चिलखत घालून पायावर उभ्या असलेल्या एखादया विशालकाय योद्ध्यासारखा वाटत असतो. एकप्रकारे नैसर्गिक संरक्षणच गेंड्याला निसर्गाने बहाल केल्यासारखे वाटते.
4. टिपा लिहा.
प्रश्न 1.
टिपा लिहा.
1. वैजयंती
2. एकशिंगी गेंडा
3. गेंड्याच्या सवयी
4. गायबगळे
उत्तर :
1. वैजयंती: काझीरंगा या अभयारण्यात प्रवाशांन फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने जे पंधरा – वीस हत्ती शिकवून तयार ठेवले आहेत त्यांपैकीच एक हत्तीण म्हणजे वैजयंती होय, ती इतर वन्यपशूना घाबरत नाही शिवाय दाट गवतातून ती सहज मार्ग काढते. जंगलात फिरण्यासाठी लेखकाला तीच हत्तीण मिळाली होती. ती खूप देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशीच होती. गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे, अशा ऐटीत ती चालत होती. मात्र माहुताच्या सगळ्या आज्ञा ती मानत होती.
तिचे गंधज्ञान फारच जबरदस्त होते. किंकाळी फोडून आणि तोंड हवेत फिरवून, चारी दिशांचा वास घेऊन जणू मृत्यू आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे काय याचा अंदाज ती घेत आहे, असे लेखकाला एकदा जाणवले.काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत, गिरक्या घेणाऱ्या गवताचा सुगंध घेत, तसेच स्वतः बरोबर इतर प्रवाशांना जंगल भटकंतीचा आनंद मिळवून देणारी वैजयंती एक उत्कृष्ट सोबतीणच म्हणावी लागेल.
2. एकशिंगी गेंडा: आसामचे वैशिष्ट्य दाखविणारा खास प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा होय. काझीरंगा अभयारण्यात तो आढळतो. जगातील प्रचंडकाय प्राण्यांत भारतातील एकशिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो. साधारणतः असा समज आहे की, गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे त्याच्या रक्तातच नसते.
पण क्वचित एकटेपणाने वैतागलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूवर आक्रमण करायला निघतो. असा एकशिंगी गेंडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी लेखक काझीरंगाला गेला होता. इथे फिरत असताना थोड्याच वेळात लेखकाला जवळच चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखादया विशालकाय योद्ध्यासारखा पण निश्चल उभा असलेला एकशिंगी गेंडा दिसला.
3. गेंड्याच्या सवयी: गेंडा आपले शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेतो. तो सामाजिक आरोग्याचा चाहता असतो. त्यासाठी सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. वाटेल तेथे घाण टाकू नये,शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये हे समजणारा गेंडा खरोखरच शहाणा व्यक्ती आहे, असेच म्हणावे लागेल.
4. गायबगळे: वैजयंती हत्तीणीवर बसून लेखक जंगल सफारी करत होता. त्यावेळी उंचच उंच गवतामधून पाच-पंधरा म्हशींचा कळप शांतपणे चरताना त्याला दिसला. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहन कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी गायबगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरती येऊन बसतात. विशाल शिंगांच्या दहा – पंधरा म्हशींच्या मधून वावरणारे हे बगळे पाहून लेखकाच्या मनात आले की, निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हातरी कागदावर चित्रित केली पाहिजे. म्हणजेच काळ्या रानम्हशींच्या मोठ्या आणि सुंदर शिंगांच्या मधून वावरणारे पांढरे बगळे यांचे सुंदरसे चित्र कधीतरी काढावे असे लेखकाला वाटले.
5. ‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
प्रश्न 1.
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तरः
दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये मी माझ्या काकांसोबत ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ पाहण्यासाठी गेलो होतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हयात असलेले हे उद्यान भारताची शान आहे. येथे प्राणी, पशु-पक्षी यांची विविधता आपण अनुभवू शकतो. इथे आढळणारा वाघ हा इचल्या आकर्षणाचे केंद्र आहे.
आम्ही पहाटे 5.30 – 6.00 वाजताच जीपमध्ये बसून जंगल सफारीसाठी निघालो. याठिकाणी जंगली पशुपक्षी पहाटे जास्त पाहण्यास मिळतात, अशी माहिती मिळाली होती. ती अगदीच खरी ठरली. आम्ही फिरण्यासाठी निघालो तेवढ्यातच पाच-सहा हरणांचा कळप आमच्या समोरून अगदी सहज उड्या मारत गेला. त्यांचा तो सोनेरी रंग, अहाहा! सीतेला त्याच्या कातडीचा मोह का झाला असावा त्यांचे कारण खऱ्या अर्थाने मला त्यावेळी उलगडले.
पशुपक्षांच्या किलबिलाटाने सारे वातावरण धुंद झाले होते. डोक्यावरून निर्भयपणे उडत जाणाऱ्या बगळ्यांची रांग पाहिली आणि बालकवींची ‘श्रावणमास’ कविताच आठवली. डोक्यावर शिंगांचा संभार मिरविणाऱ्या काळवीटांचा कळप गवतांमधून चरताना पाहिला आणि क्षणभर हरखूनच गेलो. दिवसभर भटकंती करून थकून परतीच्या वाटेवर निघालो. प्रवासी बंगला 1520 मिनिटांच्या अंतरावर असेल नसेल आणि तितक्यातच अचानक रस्त्यावर ताडोबाच्या राजाचे भव्यदिव्य दर्शन घडले.
चालकाने जीप थांबवली आणि काहीही हालचाल न करता शांतपणे समोरच्या वाघाकडे पाहण्यास सांगितले. त्याची ती भेदक नजर, डौलदार चाल पाहताना आम्हाला कसलेही भान उरले नव्हते.
Summary in Marathi
लेखकाचा परिचय :
नाव : वसंत अवसरे
कालावधी : 1907 – 1976
परिचय : कवी, प्रवासवर्णनकार. ‘यात्री’ हा स्फुट कवितांचा संग्रह. ‘भिखूच्या प्रदेशातून’, ‘लाल नदी निळे डोंगर’ ही प्रवासवर्णने प्रसिद्ध. प्रवासवर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशांतील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते.
प्रस्तावना :
‘काझीरंगा’ हे स्थूलवाचन लेखक ‘वसंत अवसरे’ यांनी लिहिले आहे. या पाठात भारतातील आसाम राज्याचे भूषण असलेल्या ‘काझीरंगा’ या अभयारण्यात केलेल्या जंगलसफारीचे मनोवेधक चित्रण केले आहे.
Kaziranga National Park is the ‘Jewel of Assam. A trip to this national park is attractively narrated by author Vedant Avasare in this write-up.
शब्दार्थ :
- विस्तार – आवाका, वाढ, फैलाव, व्याप्ती (expansion, spread)
- चौरस – square of a unit
- वावरणे – ये-जा करणे (to move arround)
- पुच्छविहीन – शेपटी नसलेला (without tail)
- प्रतीक – खूण, चिन्ह (a symbol, an emblem)
- वानर – माकड (monkey)
- निर्बुद्ध – मूर्ख, बुद्धी नसलेला (stupid, idiot)
- बुरबुर – पावसाची रिपरिप, बारीक पाऊस (light rain, drizzle)
- निरभ्र – ढग नसलेला, स्वच्छ (cloudless, fair)
- कर्दम – चिखल (mud)
- दाट – घन (thick, dense, crowded)
- निष्कारण – अनावश्यक (unnecessary)
- अपवाद – नियमास बाधा आणणारी गोष्ट (exception)
- एकलकोंडेपणा – एकटे राहायला आवडणे (an act of living alone in solitude)
- पर्यवसान – परिणाम (the result)
- तिरसटपणा – चिडकेपणा (hot-temper)
- नवल – आश्चर्य (wonder, miracle)
- प्रचंडकाय – फार मोठा, अवाढव्य (huge, massive)
- ऐट – दिमाख, रुबाब (pomp)
- माहूत – हत्ती हकणारा, महत (an elephant driver)
- निश्चल – स्तब्ध, ठाम (stable, firm, fixed)
- चिलखत – शरीराचे रक्षण करणारा लोखंडी अंगरखा (an armour)
- मनसोक्त – मन तृप्त होईल एवढे (to one’s hearts content)
- भोक्ता – अनुभव घेणारा (one who experiences)
- विष्ठा – मल (excrement)
- कळप – समुदाय (a flock, a group)
- तर्क – अनुमान, अंदाज (guess, inference)
- गिरकी – फेरी (whirl)
- दृष्टी – नजर
- लहर – अकस्मात होणारी इच्छा (whim)
- चक्काचूर – चुराडा, विध्वंस (destruction, ruin)
- विस्तीर्ण – पसरलेले, वाढलेले (expanded, extended)
- हुंगत – वास घेत (to sniff, to smell)
- धवकणे – मध्येच अकस्मात थांबणे (to stop short)
- घोटाळणे – घुटमळणे, मागे-पुढे फिरणे (to waver, to falter)
टिपा :
- इंद्र – देवांचा राजा
- ऐरावत – इंद्राचा हत्ती
- काझीरंगा – आसाममधील एक अभयारण्य
- वैशाख – हिंदू कालगणनेतील दुसरा महिना
वाक्प्रचार :
- नशीब जोरदार असणे – चांगले नशीब असणे
- अंगावर चालून जाणे – हल्ला करणे
- खूण करणे – संकेत देणे
- दृष्टीस पडणे – दिसणे
- चित्रित करणे – रेखाटणे
- किंकाळी फोडणे – जोराने ओरडणे
- मागोवा घेणे – शोध घेणे, तपास करणे
- गिरकी घेणे – फेरी मारणे
- बधीर होणे – काही सुचेनासे होणे