Bhag 4.3 अनुवाद

Bhag 4.3 अनुवाद

Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
फरक स्पष्ट करा. (प्रत्येक प्रकाराचे एक उदाहरण अपेक्षित)

(अ) अनुवाद-भाषांतर
उत्तरः

भाषांतर : म्हणजे एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे. उदा. विज्ञान तंत्रज्ञान या विषयावर आधारित पुस्तकांचे भाषांतर हे जसेच्या तसे केले जाते किंवा सरकारी अधिनियम जसे आहेत तसेच भाषांतरीत केले जातात. पूर्वीच्या काळी ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी बायबलचे मराठीत भाषांतर झाले. दोन भिन्न भाषिक व्यक्ती, समाज एकत्र येतात तेव्हा भाषांतर अपरिहार्य ठरते. अनुवाद : अनुवाद या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमध्ये शोधता येते.

मूळ धातू ‘वद’ म्हणजे बोलणे ‘अनु’ हा त्याचा उपसर्ग याचा अर्थ ‘मागील’. थोडक्यात आधी कोणी सांगितल्या नंतर सांगणे म्हणजेच श्रीकृष्णाने आधी गीतेत तत्त्वज्ञान सांगितले. तेच तत्त्वज्ञान संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिकेत सांगितले. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद केला असे म्हटले जाते. थोडक्यात शब्द, संरचना, शैली यांपेक्षा एकूण आशयावर भर देऊन केलेले भाषांतर म्हणजे अनुवाद होय. उदा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या wings of Fire या आत्मचरित्राचा मराठीत ‘अग्निपंख’ या नावाने माधुरी शानबाग यांनी केलेला अनुवाद.

(आ) रूपांतर-स्वैर अनुवाद
उत्तरः

रूपांतर : एखादया वाङ्मयप्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मयप्रकारात नेणे म्हणजे रूपांतरण होय. उदा. नटसम्राट या वि. वा. शिरवाडकर लिखित नाटकावर आधारित मराठीत ‘नटसम्राट’ या नावाने सिनेमा निघाला. मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘गमभन’ हे नाटक तसेच ‘शाळा’ हा मराठी चित्रपटही आला. स्वैर अनुवाद : स्वैर अनुवादात मूळ साहित्यकृतीमधील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्यकृतीत बदलले जाते. उदा. विसाव्या शतकातील श्रेष्ठ जर्मन नाटककार, दिग्दर्शक, संगीतज्ज्ञ, कवी आणि तत्त्वचिंतक ब्रेश्ट यांच्या ‘द थ्री पेनी ऑपेरा’ या मूळ जर्मन नाटकाचं पु. ल. देशपांडे यांनी तीन पैशाचा तमाशा’ हे स्वैर रूपांतर केले आहे.

प्रश्न 2.
अनुवादाची कार्यक्षेत्रे स्पष्ट करा.
उत्तर :

भारतात अनेक प्रांत, अनेक भाषा एकत्र नांदत असल्यामुळे इथे नेहमीच प्रांतिक अनुवाद होत असतात याशिवाय जागतिकीकरणामुळे इंग्रजीचे महत्त्व वाढले आहे. विविध विषयांची अद्ययावत माहिती इंग्रजीत उपलब्ध आहे. इंग्रजीतील हे ज्ञान विविध भाषांमध्ये जाण्याची प्रक्रिया निरंतर घडत असते. म्हणूनच अनुवादकांना आजच्या युगात अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्रात अनुवादासाठी स्वतंत्र भाषा संचालनालय निर्माण झालेले आहे. त्यासाठी भाषा सल्लागार मंडळ अस्तित्वात आहे. पूर्वी अनुवाद हे साहित्याचे केले जात. आज तंत्रज्ञान विज्ञान इ. वेगवेगळ्या विषयांचे अनुवाद होत आहेत.

रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट या माध्यमांत अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध ओत. अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्या आपले कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषांमध्ये घेऊन येण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना सातत्याने अनुवादकांची गरज लागते. बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर पसरलेल्या असतात. त्यांच्या उत्पादनांना, सेवांना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांना स्थानिक भाषेत जाहिराती दयाव्या लागतात. यासाठी अनुवादकांची गरज असते. शिक्षण क्षेत्राचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यातील ज्ञान विविध लोकांपर्यंत विविध भाषांमध्ये पोहोचवण्याची गरज असते. यासाठीही अनुवादकांची गरज असते.

प्रश्न 3.
अनुवाद क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी तुमच्या शब्दांत नमूद करा.
उत्तर :

अनुवादामुळे सामाजिक, वैचारिक जडण घडण होते. त्यामुळे लक्ष्य भाषा संपन्न होतेच शिवाय नवीन वाङ्मयीन प्रवाह निर्माण होतात. उदा. मराठी दलित साहित्याच्या प्रेरणेमुळे हे गुजराथी दलित साहित्य निर्माण झाले. म्हणूनच ज्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाषा येतात त्यांना अनुवादाच्या क्षेत्रात प्रचंड मागणी आहे.

भारतातील संपूर्ण भाषांतर कार्यामध्ये हिंदी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतेही साहित्य अखिल भारतीय पातळीवर न्यायचे असेल तर त्याचे हिंदी भाषांतर होणे गरजेचे असते. केंद्रशासनाने नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी अशी मंडळे त्यासाठी निर्माण केली आहेत. बिदागी, पुरस्कार अशा स्वरूपात अनुवाद कार्याला उत्तेजन दिले जाते. महाराष्ट्रात ‘आंतर-भारती’ या सानेगुरुजी प्रणीत संस्थेमार्फत अनुवाद भाषांतर कार्याला गती दिली जाते.

विविध सिनेमे, विविध भाषांत डब होऊन त्या त्या प्रांतांत दाखवले जातात. परदेशातील काटुन फिल्म इथल्या प्रादेशिक भाषेत डब करून दाखवल्या जातात. हे करण्यासाठी मूळ कलाकृती समजून घेऊन त्याचे अपेक्षित असणाऱ्या भाषेत अनुवाद करण्यासाठी तज्ज्ञ माणसांची गरज लागते. जाहिरातीच्या वेगवेगळ्या प्रांतांत दाखवताना जाहिरात तीच दाखवून भाषा बदलली जाते. हे करण्यासाठी उत्तम अनुवादकांची आवश्यकता असते. परदेशी भाषा तर येत असेल तर दुभाषक म्हणून काम करता येते. भारताचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांना भेटले तेव्हा त्यांच्या हिंदी भाषणाचे भाषांतर अनुवाद करून ते इंग्रजीत ऐकवले गेले. हे आपण पाहिले. दुतावासात अशा परदेशी भाषा येणाऱ्या लोकांना प्रचंड मागणी आहे.

प्रश्न 4.
‘अनुवाद करणे ही सर्जनशील कृती आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :

मर्यादित अर्थाने का होईना अनुवाद ही एक प्रकारची नवनिर्मितीच असते. अनुवादक तिला एक आपलेपण देतो. मूळ कलाकृतीच्या अनुरोधाने तो वाचकाला जिवंत, समृद्ध सौंदर्यानुभवाचा प्रत्यय देतो. तो जर आंधळेपणाने मुळाशी जखडून राहिला तर अनुवाद जिवंत वाटणारच नाही. त्यात कोरडेपणा येईल. अनुवाद करताना अनुवादकाला भाषेचे बंधन पाळावे लागते. उदा. अरेबियन नाईटचे रूपांतर, भाषांतर करायचे किंवा अनुवाद करायचे तर आजची भाषा वापरणे योग्य ठरेल याचे भान अनुवादकाला सांभाळावे लागते. कवितेचा अनुवाद करताना तर फार काळजी घ्यावी लागते.

कारण कवितेतील शब्दांना नादांची लय असते. विनोदी साहित्य अनुवादित करताना मूळ भाषेतील गंमत निघून जाणार नाही हे पाहावे लागते. थोडक्यात अनुवादक दोन संस्कृतींना जोडतो. अनुवाद म्हणजे केवळ तांत्रिक रूपांतर नाही तर ती सर्जनशील कृती असते. हे कौशल्याचे काम आहे. हे कौशल्य अनुवादकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. कोणते साहित्य अनुवादासाठी निवडावे, त्याचे सामाजिक महत्त्व काय याचे भान अनुवादकाला बाळगावे लागते. विविध साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये त्याला माहीत असावी लागतात.

भाषिक संदर्भ, सामाजिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ त्याला समजून घ्यावे लागतात. मूळ साहित्यांचे बारकाईने अवलोकन करावे लागते. थोडक्यात अनुवाद असा झाला पाहिजे की मूळ कलाकृती कोणती आणि अनुवादित कलाकृती कोणती याचा संभ्रम निर्माण झाला पाहिजे. हे सगळे भान सांभाळणे ही तारेवरची कसरतच आहे. म्हणूनच अनुवाद करणे म्हणजे सर्जनशील कृती करणे.

प्रश्न 5.
अनुवाद करताना पाळायची पथ्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :

अनुवादकाची वृत्ती ही संशोधकाप्रमाणे असावी. खोलात जाऊन शोध घेतला नाही तर अनुवादात चूक होण्याची शक्यता असते. अनुवादक एकाच वेळी चांगला वाचक तर हवाच पण तो अभ्यासकही असायला हवा. जागतिक घडामोडींचे त्याला भान हवे. अनवाद करणं हे नाटकात काम करण्यासारखे आहे. दसऱ्याचे शब्द नट जसा दकश्राव्य माध्यमातन इतरांपर्यंत पोहोचवतो तसंच अनवादात दसऱ्याचे विचार. त्याचे साहित्यिक विश्व आपल्यापर्यंत आपल्या भाषेत पोहोचवतो. त्याने खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अनुवादासाठी निवडलेली कलाकृती ही उत्कृष्ट व उपयुक्त असावी. मूळ कलाकृतीशी प्रामाणिक राहून अनुवाद केला पाहिजे. वर्णन विवेचन यात अचूकता व स्पष्टता असावी. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता त्याने कलाकृतीला न्याय दिला पाहिजे. स्वत:चे विचार त्याने अनुवाद करताना घुसडता कामा नयेत. मूळ भाषा व अनुवाद होणारी भाषा याचे त्याला ज्ञान असावे. वाचकांना समृद्ध करणारा अनुभव त्याने दिले पाहिजे. अनुवाद करताना मूळ नावांमध्ये बदल करू नये. कलाकृतीचे स्वरूप पाहून स्वैर अनुवाद असावा की शब्दशः अनुवाद असावा हे त्याने ठरवून घेणे गरजेचे असते.

प्रश्न 6.
‘अनुवादामुळे सांस्कृतिक संचित विस्तारते’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :

एका भाषेतील कलाकृती ही दुसऱ्या भाषेत येते त्याला आपण अनुवाद म्हणतो. पण ही वाटते तेवढी सोपी-सरळ प्रक्रिया नाही. त्यात अनेक बाबींचा अंतर्भाव होतो. विशेषतः भौगोलिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असतील तर अनुवाद करणे हे एक आव्हान ठरते. इतर प्रदेशातील संस्कृती, रूढी-परंपरा याची या निमित्ताने वाचकांना ओळख होते. त्याचे भावविश्व व सांस्कृतिक विश्व समृद्ध होते. निग्रो साहित्याची जेव्हा जगाला ओळख झाली. तेव्हा त्यातून प्रेरणा घेऊन वंचित समाजाचे नवीन साहित्य उदयास आले. मराठीत निग्रो साहित्याच्या प्रभावातून दलित साहित्य जन्माला आले आणि भारतीय सांस्कृतिक, सामाजिक वास्तवाचे जगाला दर्शन झाले. त्यातूनच विषमतेच्या विरोधात लढे उभारले गेले. सामाजिक समतेच्या लढ्याला यश आले.

आपल्या भोवतालचा समाज, त्यातील मर्यादित विश्व आणि प्रथा, परंपरा यांच्या पगड्यातून अनुवादित साहित्य आपल्याला बाहेर काढते. ‘एक होता कार्व्हर’ हा वीणा गव्हाणकर यांनी केलेला अनुवाद वाचकालाही अंतर्मुख करतो तर अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’च्या ‘अग्निपंख’ या माधुरी शानबाग यांनी केलेल्या अनुवादामुळे आपल्यालाही भारतीय अवकाश संशोधनाची सखोल माहिती मिळते. आपल्याही ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या जातात. या प्रक्रियेमुळे जगभरातील माणसे, त्यांची संस्कृती, रूढी, परंपरा, विचार, साहित्य, तंत्रज्ञान, समाज व्यवस्था याचा एकमेकांना परिचय होतो.

महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी अनुवाद ग्रंथसूची’नुसार १९९८ पर्यंत एकूण ५९७४ पुस्तके राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषेतून मराठीत अनुवादित झाली आहेत. हीच प्रक्रिया उलटही होते आहे. मराठीतून इंग्रजीत व इतर भाषेत साहित्य अनुवादित होत आहे. उदा. डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मचरित्राचे १५ भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यामुळे भारतीय जीवनाची ओळख परदेशी वाचकांना झाली.

प्रश्न 7.
बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याबाबतची अनुवादकाची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः

अनुवाद करताना मूळ साहित्यकृतीशी प्रामाणिक राहणे गरजेचे असते. त्यात स्वत:चे काही घालायचे नाही, काही वगळायचे नाही, बदल करायचे नाहीत आणि तरीही ते शब्दश: भाषांतर असता कामा नये ही तारेवरची कसरत अनुवादकाला करायची असते. यासाठी त्याला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याचा तारतम्याने विचार करावा लागतो.

दैनंदिन जीवनव्यवहारात आपण प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेचाच अधिक प्रमाणात वापर करतो. प्रमाणभाषेचा वापर शिक्षण, ग्रंथलेखन, शासनव्यवहार यांसाठी होतो. प्रमाणभाषा औपचारिक असते तर बोलीभाषा अनौपचारिक असते. प्रमाणभाषा तांत्रिकतेकडे झुकते तर बोली भाषेला त्या त्या मातीचा गंध असतो. त्यात जिवंतपणा असतो. दोन्हीपैकी कोणती भाषा निवडायची याचा अनुवादकाला गांभीर्याने विचार करावा लागतो. उदा. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद असेल आणि प्रमाणभाषा वापरली तर त्यातील गंमत निघून जाते. म्हणूनच अनुवादकाला भिन्न भिन्न बोली, त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक संचित यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

प्रश्न 8.
(अ) खालील परिच्छेदाचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करा.
मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखनसाहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला.
उत्तर :

मूळ लेख : मोहन आज सकाळी लवकर जागा झाला. त्याने दात घासले, तोंड, हात-पाय धुतले आणि तो अभ्यासाला बसला. आज तो खेळायला गेला नाही. मोहनने दहा वाजता भोजन केले. लेखन साहित्य घेतले आणि तो परीक्षेसाठी शाळेत निघून गेला.

हिंदी : मोहन आज सुबह जल्दी उठा। उसने दाँत साफ किये, हाँथ, पैर, मुँह धोया और वह पढ़ाई करने बैठा। वह ‘आज’ खेलने नहीं गया। दस बजे उसने खाना खाया। लेखन साहित्य लेकर वह परीक्षा देने स्कूल पहुँच गया।

इंग्रजी : Mohan woke up early today. Brushed his teeth, had a bath, got ready and sat to study. Due to his exam, he did not go to play today. He had his lunch at 10.00 am. He then took his study material and went to school for the exam.

(आ) खालील वाक्यांचा मराठी व इंग्रजीत अनुवाद करा.

प्रश्न 1.
किसी नदी में एक भेड़िया ऊपर की तरफ पानी पी रहा था।
उत्तर :

मराठी : एका नदीवर एक लांडगा नदीच्या वरच्या बाजूला पाणी पीत होता.
इंग्रजी : Besides a river, on the upper edge a wolf was drinking water.

प्रश्न 2.
मेरे मित्र की चिट्ठी कई दिनों बाद आयी।
उत्तर :

मराठी : खूप दिवसांनी माझ्या मित्राचे पत्र आले.
इंग्रजी : I received my friends letter after so many days.

प्रश्न 3.
राम के पिता मोहन यहाँ आएँ है।
उत्तर :

मराठी : रामचे वडील मोहन इथे आले आहेत.
इंग्रजी : Ram’s father, Mohan came here.

प्रकल्प.

प्रश्न 1.
मराठीमधून हिंदी भाषेत अथवा इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या दहा साहित्यकृतींची माहिती मिळवा आणि त्याबाबत एक टिपण तयार करा.
उत्तर :

मराठी

इंग्रजी

आमचा बाप अन आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव

Untouchabile – डॉ. नरेंद्र जाधव

बलुतं – दया पवार

BALUTA – जरी पिंटो

शांतता कोर्ट चालू आहे – विजय तेंडुलकर

Silence! The court is in session – प्रिया आडारकर

मी वाय. सी. पवार – शब्दांकन – चंद्रकांत घाणेकर

Y.C. Rela Time Cop – प्रशांत तळणीकर

हिंदी

मराठी

निवडक कविता – गुलज़ार

एक स्वप्न पुन्हा पुन्हा – विजय पाडळकर

अमृता प्रीतम की कहानियाँ

रिकामा कॅनव्हास – डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे

प्रश्न 2.
हिंदी आणि इंग्रजीतून मराठी भाषेत अनुवादित झालेल्या प्रत्येकी दहा साहित्यकृतींची माहिती मिळवा आणि त्याबाबत एक टिपण तयार करा.
उत्तर :

मराठी

हिंदी

आमचा बाप अन् आम्ही – डॉ. नरेंद्र जाधव

असीम है आसमाँ – कमलाकर सोनटक्के

ययाती – वि. स. खांडेकर

ययाती – मोरेश्वर तपस्वी

घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर

घाशीराम कोतवाल – वसंत देव

क्रौंच वध – वि. स. खांडेकर

क्रौंचवध – मोरेश्वर तपस्वी

महानायक – विश्वास पाटील

महानायक – डॉ. रामजी तिवारी, रमेशचंद्र तिवारी

व्हायरस – जयंत नारळीकर

वाईरस – जयंत नारळीकर

विंदांच्या कविता – विंदा करंदीकर

यह जनता अमर हैं। – डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर

इंग्रजी

मराठी

वाईज आदरवाईज – सूधा मूर्ती

वाईज आदरवाईज – लीना सोहोनी

सुटेबल बॉय – विक्रम सेठ

शुभमंगल – अरुण साधू

इमॉर्टल ऑफ मेलुहा – अमिष त्रिपाठी

मेलुहाचे मृत्यूंजय – डॉ. मीना शेटे

थ्री पेनी ऑपेरा – ब्रेश्ट

तीन पैशांचा तमाशा – पु. ल. देशपांडे

ओल्ड मॅन अॅण्ड सी – हेमिंग्वे

एका कोळीयाने – पु. ल. देशपांडे

द बुक थीफ – मार्कुस झुसँक

पुस्तक चोर – विनता कुलकर्णी

फाई पॉईंट समवन – चेतन भगत

फाई पॉईंट समवन – सुप्रिया वकील

साहित्याचे माध्यम भाषा आहे. साहित्यातून ती भाषा, तो समाज यांचे यथार्थ दर्शन घडत असते. म्हणूनच प्रत्येक भाषेत अन्य भाषेतील साहित्य येणे गरजेचे असते. परकीय शब्द भाषेतील अभिव्यक्ती क्षमता वाढवितात. त्यातून भाषा अधिक समृद्ध होते. परकीय भाषेतील साहित्य आपल्या भाषेला परिपुष्ट करते.

स्वत:चा देश, स्वत:ची भाषा, संस्कृती याचा प्रत्येकाला अभिमान असणे साहजिकच आहे. पण त्याचबरोबर स्वत:चा व संस्कृतीचा भाषिक विकास साधण्यासाठी विदेशी भाषेतील श्रीमंती नाकारून चालणार नाही. उलट इतर भाषेतील साहित्य स्वभाषेत येते तेव्हा आपली भाषा अधिक समृद्ध होते.

आशय, शैली, अनुभवांची विविधता अशा अंगाने भाषेत वेगळेपण येते. म्हणून अनुवाद प्रक्रिया गरजेची आहे. कारण अनुवादामुळे एखादया लेखकाचे लेखन, स्थल-काल-संस्कृती या सगळ्या मर्यादा ओलांडून जागतिक वाचकांपर्यंत पोहोचते.

Additional Important Questions and Answers

कृती : २ आकलन कृती
खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

कृती-१. कारण लिहा.

प्रश्न 1.
अनुवादासाठी गुगल ट्रान्सलेटर वापरणे नेहमीच हितकारक ठरत नाही.
कारण → [ ]
उत्तरः

कारण गुगल ट्रान्सलेटर शब्दश: भाषांतर करते. त्यात नेमकेपणा आणि अचूकता असेलच याची खात्री देता येत नाही. संगणकाद्वारे शब्दानुवाद यथायोग्य होत असला तरी भावानुवाद योग्य प्रकारे होऊ शकेलच असे नाही. कारण शेवटी माणूस व यंत्र यात मूलभूत भेद राहणारच.

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अनुवाद 1
उत्तरः

प्रश्न 3.

उत्तरः

स्वमत :

प्रश्न 1.
आधुनिक काळातील दुभाषकाचे महत्त्व स्पष्ट करा.
उत्तरः

‘वसुधैव कुटुंबकम्’ या उक्तीप्रमाणे आज सगळे जग जवळ आले आहे. घरी बसल्याबसल्यासुद्धा संगणकाच्या माध्यमातून, मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण जगभरात संपर्क साधू शकतो. परंतु हे खरे असले तरी जगाच्या पाठीवर जिथे आपण संपर्क साधणार आहोत त्या प्रदेशातील लोकांना आपली भाषा समजेलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेचे ज्ञान असणारे दुभाषक यांना प्रचंड मागणी आहे.

जागतिकीकरणामुळे व्यापारानिमित्त वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देशात सतत प्रवास करत असतात. कधी कधी व्यापार मेळावे भरवले जातात. ज्यात जगभरातील लोक सहभागी होतात. यांमधील चर्चामध्ये दुभाषकांची गरज असते. काही वेळा अभ्याससत्रे, प्रशिक्षणसत्रे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा यांचे आयोजन केले जाते. यांमध्ये बुद्धीजीवी वर्ग, राजकारणी लोक विशेषत: मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी दुभाषकांची गरज असते. पर्यटन सेवा, जनसंपर्क स्थाने इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या भाषेतून सतत सूचना दयाव्या लागतात.

या सूचनांचे सुलभ भाषांतर वा अनुवाद करणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींची बैठक होते, त्यावेळी किंवा G २० सारख्या परिषदांचे आयोजन केले जाते तेव्हा वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा तेवढ्याच महत्त्वाच्या व्यक्तींचा त्यात सहभाग असतो. अशावेळी त्या त्या देशाची भाषा जाणून त्याचे शीघ्र इंग्रजी भाषांतर करणे वा अनुवाद करणे अत्यंत गरजेचे ठरते. सिनेमा, दूरदर्शन मालिका, वृत्तपत्र या सगळ्याच ठिकाणी भाषांतरकार व अनुवादक यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते.

अनुवादाच्या सरावासाठी काही उतारे :

उतारा क्र. (१)

A man with a small salary is very likely to get into difficulties unless he learns to “budget” for his monthly spending. A fixed amount should be set aside under each heading – rent, food, clothing, insurance, school-fees and so on. The ideal budget would also include a fixed sum, no matter how small to be set apart each month as “saving”. Indeed this better be paid into the ‘Post office or the Bank, and not kept at home. Until all this has been done, nothing should be spent on luxuries. Only by such a method can a man live within his income & make both the ends meet.

मराठी अनुवाद –

कमी पगार असणारा माणूस मासिक खर्चाचे अंदाजपत्रक करायला शिकला नाही तर अडचणीत सापडण्याची फार शक्यता असते. घरभाडे, अन्नधान्य, कपडेलत्ते, आयुर्विमा, शाळेची फी याप्रमाणे प्रत्येक बाबीवर ठराविक रक्कम काढून ठेवायला हवी. आदर्श अंदाजपत्रकात दरमहा शिल्लक म्हणून बाजूला ठेवायच्या रकमेचा – मग ती अल्पस्वल्प असो – समावेश असायला हवा. खरे तर ती रक्कम घरी ठेवता कामा नये. पोस्टात किंवा बँकेतच टाकायला हवी. या सर्व गोष्टी होईपर्यंत चैनीवर त्याने काहीही खर्च करू नये. अशाच पद्धतीने माणूस आपल्या ऐपतीत राहू शकतो आणि खर्चाची तोंडमिळवणी करू शकतो.

उतारा क्र. (२)

We sometimes think it should be very nice to have no work to do. How we envy rich people who have not to work for their living? They can do just what the please all the year round! Yet, when we feel like this, we make a mistake. Sometimes rich people are not happy we think there are because they are tired of having nothing to do. Most of us are happy when we have regular work to do for our living; especially if the work is that we like to do.

मराठी अनुवाद –

आपण कधी कधी असा विचार करतो की, आपल्याला काहीच काम करायला लागलं नसतं तर फार बरं झालं असतं. जगण्यासाठी ज्यांना काम करावं लागत नाही अशा श्रीमंत लोकांचा आपण हेवा करतो? वर्षभरात जे करायचं आहे तेवढं ते काम करतातच तरी सुद्धा आपली त्यांच्याविषयी चुकीची समजूत असते. पुष्कळदा श्रीमंत लोक आपण समजतो तेवढे सुखी नसतात कारण काहीच करायचं नसल्याने ते बऱ्याचदा त्रासलेले असतात. आपल्यापैकी बरेच जण जगण्यासाठी नियमितपणे काम करतात, असे काम की जे मुख्यत्वे आपल्या आवडीचे असते म्हणूनच जीवनात ते सुखी असतात.

उतारा क्र. (३)

Many visitors come and admire me, and some of them take photographs of me. When I roar, how they start back in fear, even though iron bars are between! It is a lazy and idle life, in which I walk about a little and then dream the time away. At night I become restless when I feel the jungle smells come down on the wind. If the keeper would only leave the door unlocked one day, I would soon find my way back to the free jungle where I was born.

मराठी अनुवाद –

खूप प्रेक्षक येतात व माझी स्तुती करतात आणि त्यांच्यापैकी काहीजण माझी छायाचित्रेही घेतात. मी डरकाळी फोडतो तेव्हा मध्ये लोखंडी गज असूनही ते भीतीने कसे मागे सरकतात. पिंजऱ्यामध्ये मला फारच थोडे हिंडायला मिळते आणि बराच वेळ मनोराज्यात घालवावा लागतो असे हे आळसावलेले व निरुपयोगी आयुष्य आहे. रात्री वाऱ्यावर वाहत येणाऱ्या जंगलाच्या गंधाने मी बेचैन होतो. पहारेकऱ्याने एखादे दिवशी पिंजऱ्याचे दार उघडे ठेवले तरी मला वाटते की, जिथे मी जन्मलो त्या मुक्त जंगलाचा मार्ग मी लगेच शोधेन.

उतारा क्र. (४)

कोई विदेशी जो भारत से बिलकुल अपरिचित हो, एक छोर से दूसरे छोर तक सफर करे तो उसको इस देश में इतनी विभिन्नताएँ देखने में आएँगी कि वह कह उठेगा कि यह एक देश नहीं, बल्कि कई देशों का एक समूह है, जो एक दूसरे से बहुत बातों में और विशेष करके ऐसी बातों में, जो आसानी से आँखों के सामने आती हैं बिलकुल भिन्न है। प्राकृतिक विभिन्नताएँ भी इतनी और इतने प्रकारों की और इतनी गहरी नजर आएँगी, जो किसी भी महाद्वीप के अंदर ही नजर आ सकती है। हिमालय की बर्फी से ढकी पहाड़ियाँ एक छोर मिलेंगी और जैसे-जैसे दक्खिन की ओर बढ़ेगा गंगा, यमुना, ब्रम्हपुत्र से प्लावित समतलोंको छोड़कर फिर विंध्य, अरवली, सतपुडा, सह्याद्रि, नीलगिरि की श्रेणियों के बीच समतल रंग-बिरंगे हिस्से देखने में आएँगे। पश्चिम से पूरब तक जाने में भी उसे इसी प्रकार की विभिन्नताएँ देखने को मिलेगी। (डॉ. राजेंद्रप्रसाद : साहित्य, शिक्षा और संस्कृति)

मराठी अनुवाद –

भारताबद्दल कसल्याही प्रकारची माहिती नसणारी, दुसऱ्या देशातील एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर त्या व्यक्तीने प्रवासाला सुरुवात केली तर या देशातील ठिकठिकाणाचे वेगळेपण पाहून तो नक्कीच उत्स्फूर्तपणे बोलेल की, भारत हा एकसंघ असा देश नाही. अनेक छोट्या छोट्या देशांचा तो एक विशाल असा समूहच आहे. भारतातील प्रत्येक भागात खूप सारे वेगळेपण आहे. विशेष म्हणजे प्रत्येक भागातील हा वेगळेपणा सहजपणे डोळ्यांना दिसून येतो. अनेक लहान-सहान गोष्टींमध्ये हा वेगळेपणा जाणवतो.

भारताच्या निरनिराळ्या भागातील प्राकृतिक वेगळेपण व त्याचे विविध प्रकार या महाद्वीपाच्या अंतर्गत भागात ठळकपणे दृष्टीस पडतात. उत्तरेकडील एका टोकास असणारी हिमालयीन पर्वतरांग बर्फाच्छादित अशी आहे. उत्तरेकडच्या या टोकाकडून दक्षिणेकडे जाताना प्रथम गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा नदयांच्या खोऱ्यांचा सपाट मैदानी भाग लागतो. यानंतर विंध्य, अरवली, सातपुडा, सहयाद्रि, निलगिरि पर्वतरांगांच्यामध्ये काही ठिकाणी सपाट तर काही ठिकाणी वेगवेगळ्या रंगढंगाचा भाग दृष्टीस पडतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाही अशाच प्रकारचा वेगळेपणा आपल्या दृष्टीस पडतो.

उतारा क्र. (५)

यहाँ पर मुख्य-मुख्य भाषाएँ भी कई प्रचलित है और बोलियों की तो कोई गिनती ही नहीं क्योंकि यहाँ एक कहावत मशहूर है, “कोस-कोस पर बदले पानी, चार कोस पर बानी’। भिन्न-भिन्न धर्मों के माननेवाले भी जो सारी दुनिया के सभी देशों में बसे हुए हैं, यहाँ भी थोडी-बहुत संख्या में पाए जाते है। और जिस तरह यहाँ की बोलियों की गिनती नहीं, उसी तरह यहाँ भिन्न धर्मों के संप्रदाय की गिनती आसान नहीं। इन विभिन्नताओं को देखकर अगर अपरिचित आदमी घबराकर कह उठे कि यह एक देश नहीं, अनेक देशों का एक समूह है।

मराठी अनुवाद –

या ठिकाणी वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मुख्य भाषा अनेक आहेत आणि त्या भाषेच्या असंख्य बोलीभाषाही रूढ आहेत, कारण इथे एक म्हण प्रसिद्ध आहे, ती म्हणजे “कोसा-कोसांवर पाणी बदलते व चार कोसांवर वाणी (भाषा) बदलते.” जगाच्या निरनिराळ्या भागात राहणारे व आपआपल्या भिन्न-भिन्न धर्माला मानणारे अनेक लोक भारतातही थोड्या अधिक संख्येने प्रत्येक भागात आढळतात. या ठिकाणच्या असंख्य बोलीभाषांप्रमाणे नानाविध धर्मपंथांची मोजदाद करणे अशक्य असे आहे. भारतातील या वेगळेपणाला पाहून एखादा अनोळखी मनुष्य घाबरून म्हणेल की, भारत हा एक देश नाही तर अनेक छोट्या छोट्या देशांचा तो एक समूह आहे.

अनुवाद प्रास्ताविक :

एका भाषेतील मजकूर अगदी नेमकेपणाने दुसऱ्या भाषेत व्यक्त करणे म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद या प्रक्रियेत ज्या भाषेतून मजकूर आणायचा असतो त्याला उगम भाषा किंवा ‘मूळ भाषा’ किंवा ‘स्रोत भाषा’ म्हणतात तर ज्या भाषेत मजकूर आणला जातो त्याला ‘लक्ष्य भाषा’ म्हणतात.

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची जाण असणे गरजेचे असते. केवळ साहित्याचे नव्हे तर व्याकरणाचे ज्ञानदेखील त्याला असावे लागते. तरच ती भाषा बोलणाऱ्याच्या संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा त्याला समजू शकतात. या सर्वांबरोबर त्याच्याकडे सृजनात्मकता असायला हवी तरच अनुवादित साहित्य रसपूर्ण होईल.

अनुवाद म्हणजे केवळ ललित साहित्यकृतीचा अनुवाद नाही. हे क्षेत्र विस्तृत आहे. भारतात अनेक प्रांत, अनेक भाषा एकत्र नांदत असल्यामुळे इथे नेहमीच प्रांतिक अनुवाद होत असतात. जागतिकीकरणामुळे इंग्रजीचेही महत्त्व वाढले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भाषेतील ज्ञान वेगवेगळ्या भाषेत जाण्याची प्रक्रिया निरंतर घडत असते. म्हणूनच अनुवादकांना आजच्या युगात अत्यंत महत्त्व आहे.

अनुवाद या शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेत शोधता येते. मूळ धातू ‘वद’ म्हणजे बोलणे व ‘अनु’ हा उपसर्ग म्हणजे ‘मागील’ किंवा ‘मागाहून सांगितलेले’.

इंग्रजीत याला translation म्हणत असले तरी प्रत्यक्षात ही क्रिया खूप विस्तृत आहे. सुदैवाने मराठीत भाषांतर, रूपांतर, अनुवाद, स्वैर अनुवाद अशा विविध संज्ञा उपलब्ध आहेत त्यात सूक्ष्म भेद आहेत.

आज विज्ञान-तंत्रज्ञान, उदयोग विश्व, रेडिओ, दूरचित्रवाणी, चित्रपट, जाहिरातक्षेत्र या माध्यमांत अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

  1. भाषांतर : मूळ मजकुरातील शब्द, वाक्यरचना जशीच्या तशी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात नेमकेपणा, काटेकोरपणा असतो. भाषांतरकार मूळ मजकुराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. उदा. विविध प्रकारची सामाजिक शास्त्रे, विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित साहित्य, सरकारी अधिनियम इ.
  2. अनुवाद : यामध्ये शब्द, शैली, संरचना यांपेक्षा आशयाला महत्त्व दिले जाते हे एक प्रकारचे मुक्त भाषांतरच असते. यात अनुवादकाच्या स्वत:च्या शैलीची छाप दिसून येते. उदा. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या Wings of fire चा माधुरी शानबाग यांनी ‘अग्निपंख’ या नावाने केलेला अनुवाद.
  3. रूपांतर : यात मूळ कलाकृतीचे फक्त बीज घेतले जाते आणि नवीन कलाकृती निर्माण केली जाते. मूळ पुस्तकातील सांस्कृतिक वातावरण, शैली यात आमूलाग्र बदल केला जातो. रूपांतरकार शैलीचे पूर्ण स्वातंत्र्य घेतो. या इंग्रजी जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मेलियन’ या इंग्रजी नाट्याचा भावानुवाद पु. ल. देशपांडे यांनी ‘ती फुलराणी’ या नावाने केला आहे.
  4. स्वैर अनुवाद : मूळ कथा वस्तूला धक्का न लावता स्वातंत्र्य घेऊन स्वैर अनुवाद केला जातो. वाचकांना पचेल-रुचेल अशा शैलीत बदल केला जातो. उदा. रविंद्रनाथ टागोर यांच्या मूळ बंगाली कवितेचा शामला कुलकर्णी यांनी केलेला ‘जाता अस्ताला’ हा स्वैर अनुवाद आहे.

अनुवादाचा व्यासंग : अनुवादक, भाषांतरकार, रूपांतरकार यांना सर्वसाधारपणे ‘अनुवादक’ याच नावाने संबोधले जाते. अनुवाद करणे हे कौशल्याचे काम आहे. अनुवादासाठी निवडलेली साहित्यकृती जितकी लोकप्रिय व उत्कृष्ट तेवढी अनुवादकाची जबाबदारी वाढते. त्याला प्रमाणभाषा, बोली भाषा या दोन्हींचे ज्ञान असावे लागते. परभाषेतील शब्द त्या शब्दांमागचे सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ, शब्दाच्या अर्थच्छटा वगैरे गोष्टींचे ज्ञान अनुवादकाला असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीला पर्यायी शब्द मिळतोच असे नाही. मग त्या शब्दाच्या जवळ जाऊ शकतील अशा अर्थ छटेचे शब्द वापरणे योग्य ठरते.

अनुवादकाचे स्रोत भाषा आणि लक्ष्य भाषा या दोन्हीवर प्रभुत्व असायला हवे. त्याचे वाचन उत्तम असावे, विविध शब्दकोष, विश्वकोष, व्युत्पत्ती कोष वापरण्याचे त्याला ज्ञान असावे. विविध बोली, प्रमाण भाषा त्या त्या भाषेतील सांस्कृतिक संचित, त्या प्रदेशाचा इतिहास इत्यादीची जाण असणे गरजेचे आहे.

अनुवाद करताना पाळावयाची पथ्ये : अनुवादामागे निवडलेली कलाकृती उत्कृष्ट आणि उपयुक्त असावी. त्याने मूळ कलाकृतीला न्याय दयावा. स्वत:चे विचार कलाकृतीवर लादू नयेत. अनुवाद वाचकांना समृद्ध करणारा असावा. पूर्वग्रह डोक्यात ठेऊन अनुवाद करू नये.

अनुवादात भाषेचे महत्त्व : अनुवादासाठी भाषा वापरताना प्रमाणभाषा वापरायची की बोलीभाषा याचा निर्णय घ्यावा लागतो. उदा. ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करताना प्रमाणभाषेचा वापर करणे अनुचित ठरेल.

मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्रे : वृत्तपत्रे, अल्प प्रसारमाध्यमे, न्यायालये, इतर सरकारी संस्था तसेच रेडिओ, चित्रपट, जाहिरात क्षेत्र या ठिकाणी अनुवादकांची गरज असते. त्याचबरोबर वैदयकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, कायदयाचे क्षेत्र, पर्यटन सेवा इ. अनेक ठिकाणी अनुवादकांना प्रचंड मागणी आहे.

मौखिक अनुवादाची कार्यक्षेत्रे : आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे वा परिषद किंवा राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तींची भेट इत्यादी ठिकाणी दुभाषक गरजेचा ठरतो. त्याचबरोबर जनसंपर्क स्थाने, पर्यटन सेवा, समूह दूरभाष, समूह संबोधन, अनुवाद या सर्वच ठिकाणी अनुवादकांची गरज असते. गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून केलेले अनुवाद अचूक असतीलच याची खात्री देता येत नाही.