Chapter 15.1 वीरांगना (स्थूलवाचन)
कृति-स्वाध्याय व उत्तरे
पाठ्यपुस्तकातील कृती:
प्रश्न 1.
खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्रश्न 2.
‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
पतिनिधनामुळे स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाट्टेल ती दुःखे सहन करू शकतात. वाटेल त्या संकटांना सामोरे जाण्याची मानसिक हिम्मत माणसांमध्ये असते. इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच या जीवनातून निघून गेला होता. त्यातच दोन मुलांना वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येऊन पडली होती.
दुसरी एक गोष्ट स्वातींच्या मार्गात आडवी येणारी होती. ऐन तारुण्यात माणसामध्ये प्रचंड ऊर्जा असते. कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मन मागेपुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या चाळिशीत पोहोचल्या होत्या. या वयात घडाकेबाज. कृती करण्यास लागणारे शारीरिक-मानसिक बळ कमी असण्याचा संभव असतो, तसेच, त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर होते. तेथे कमालीची शारीरिक क्षमता आवश्यक असते. आणि शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळ अधिक गरजेचे असते.
या अडचणी दूर करण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागणार होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत सैन्यात जायचेच, असा स्वाती यांचा पक्का निर्धार होता. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतलेसुद्धा. म्हणूनच त्यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला.
प्रश्न 3.
‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
स्वाती महाडिक यांनी पतिनिधनाचे असीम दुःख झेलले. त्या दुःखात बुडून जाऊन त्या निष्क्रिय झाल्या नाहीत. आपल्या पतीचे देशाची सेवा करण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला. एवढेच नव्हे तर तो निर्धार त्यांनी पुरा केला. या घटनेचा समाजावर प्रभाव पडलाच. समाजाला त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळाला.
आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांनी सैन्यात भरती होण्याबाबत समाज अनुकूल असतो. हाच समाज स्त्रियांना सैन्यात पाठवण्यास मात्र तयार नसतो. स्त्रियांकडे शारीरिकमानसिक बळ कमी असते, स्त्रिया सैनिकांचे काम करूच शकणार नाहीत, अशीच समाजाची धारणा असते.
या पार्श्वभूमीवर, स्त्रिया पुरुषांइतक्याच सक्षम असून सैनिकांचे कामही करू शकतात, असा संदेश समाजाला मिळतो.
प्रश्न 4.
टिपा लिहा.
(अ) देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक
उत्तर:
कर्नल संतोष महाडिक यांची देशावर अपार निष्ठा होती.. त्यासाठीच त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. त्यांची कामगिरी व त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा त्यांच्या भोवतालच्या लोकांवर प्रभाव पडला होता. अचानक १७ नोव्हेंबर २०१५ रोजी काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारताच्या सार्वभौमत्वावरच हा हल्ला होता. महाडिक यांच्या बटालियनकडे या दहशतवादयांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवली गेली. महाडिक यांनी प्राण पणाला लावून दहशतवादयांचा निःपात केला. दुर्दैवाने त्या कारवाईमध्ये कर्नल संतोष हे हुतात्मा झाले आणि आपल्या देशाने एक निधड्या छातीचा निष्ठावान सैनिक गमावला
(आ) जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक
उत्तर:
लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची जिद्द त्यांच्या निर्धारातून व त्या निर्धाराच्या पूर्तीमधून दिसते. पतीचे अंत्यविधी चालू होते, त्याच वेळी स्वाती यांच्या मनात त्यांचा निर्णय पक्का झाला. त्या वेळी त्या सैन्यात दाखल होण्याच्या वयाच्या अटीत बसत नव्हत्या. तरीही अर्ज-विनंत्या करून त्यांनी वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा खूप कठीण असते. खूप कष्ट घेऊन त्यांनी ती परीक्षा यशस्वी रितीने पार केली. त्यानंतरचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीचे अत्यंत कष्टमय असे प्रशिक्षण यशस्वी रितीने पूर्ण केले. लेफ्टनंट म्हणून त्या सैन्यदलात दाखल झाल्या. कर्तबगारीने खांदयावर अभिमानाचे दोन स्टार मिळवले. पतीचे स्वप्न नष्ट होऊ दिले नाही. एक सर्वसाधारण स्त्री समाजाला ललामभूत ठरली. हे सर्व त्यांच्या जिद्दी स्वभावामुळे घडू शकले.
प्रश्न 5.
‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
स्वातींनी काय केले? त्यांनी प्रथम स्वतःसमोर ठाकलेली परिस्थिती नीट समजून घेतली. आपण काय काय करू शकतो, याचा त्यांनी अंदाज घेतला. त्यानुसार निर्णय घेतले. एकदा निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आपल्याला अमुक अमुक गोष्टी नक्की करता येतील, असा त्यांनी विश्वास बाळगला. कठोर परिश्रम घेतले. परिश्रमाबाबत कोणतीही तडजोड केली नाही. योजलेल्या मार्गावर त्या ठामपणे पावले टाकत राहिल्या. त्यामुळे त्या यशापर्यंत पोहोचल्या.
यश म्हणजे वेगळे काय असते? फक्त परिस्थितीचा विचार करून निवडलेल्या दिशेने न घाबरता, कच न खाता ठामपणे पावले टाकली आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट घेणे म्हणजेच यश. स्वाती यांच्या जीवनकार्यावरून हे लक्षात येते.
प्रश्न 6.
‘मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा’, या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
होते काय की, आपल्याला काय करायचे आहे, आपले ध्येय कोणते आहे, हे आपण नक्की करतो आणि पावले टाकायला सुरुवात करतो. अर्ध्यावर गेल्यावर ध्येयाच्या दिशेने आपण चाललेलो नाही हे लक्षात येते. मग आपण मार्ग बदलतो. असे पुन्हा पुन्हा घडते आणि काळ संपतो. पण आपण मुक्कामाला पोहोचतच नाही. त्याचे कारण साधे आहे. आपण फक्त मुक्कामाचा विचार करतो. सुरुवातीपासून मुक्कामापर्यंतचा, शेवटापर्यंतचा जो मार्ग आहे, त्याचा आपण विचारच करीत नाही. खरे तर, या मार्गाचा तपशीलवार व सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक पावलावर पार पाडाव्या लागणाऱ्या सर्व कृतींची नोंद केली पाहिजे. काही कृतींचा मिळून एक टप्पा, याप्रमाणे संपूर्ण मार्गाचे टप्पे ठरवले पाहिजेत. प्रत्येक टप्प्याला किती वेळ लागेल, कोणती साधने वापरावी लागतील, हेसुद्धा निश्चित केले पाहिजे. याप्रमाणे तयारी केली की यश नक्कीच मिळते. तयारी म्हणजेच नियोजन होय, म्हणून अंतिम मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर विश्वास ठेवला पाहिजे, हेच खरे.
प्रश्न 7.
हा पाठ वाचल्यावर तुमच्या मनात येणारे भाव शब्दबद्ध करा.
उत्तर:
स्वाती यांनी घडाकेबाज निर्णय घेतले आणि ते प्रत्यक्षात आणलेसुद्धा, पतीचे अपुरे राहिलेले स्वप्न त्यांनी पूर्ण करायला घेतले. या त-हेने त्यांनी पतीच्या आठवणी मनात जपून ठेवायचा मार्ग निवडला.
एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्या व्यक्तीची कर्तबगारी, विचार, तत्त्वे यांचाही एक प्रकारे अंत होत असतो. मरण पावलेल्या व्यक्तीला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही. किंबहुना कोणत्याही माणसाला अमर करू शकत नाही. तर मग आपली प्रिय व्यक्ती, आदरणीय व्यक्ती यांना अमर कसे करणार? तर त्यांच्या आठवणी जाग्या ठेवून. त्या व्यक्तींचे कर्तृत्व, त्यांचे विचार, त्यांनी उराशी बाळगलेली तत्त्वे जिवंत ठेवून आपण त्या व्यक्तीच्या आठवणी जाग्या ठेवू शकतो. किंबहुना तोच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मला या विचाराची देणगी प्रस्तुत पाठाने दिली आहे.
(१) खालील कृती करा.
मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.
उत्तर:
सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी.एड. ही पदवीसुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सबइन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या.
श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही. त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या दीड वर्षांत त्यांनी ४३४ मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले.
(२) पाठाच्या आधारे टिपा लिहा.
(i) मुले भरकटण्याची कारणे.
उत्तर:
काही मुले वेगवेगळ्या कारणांनी आईवडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात, गरिबीला कंटाळून चार पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात. कधी कधी काही समाजकंटक मुलांना पळवून नेतात आणि त्यांना अवैध कामांना जुंपतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात.
(ii) रेखाजींच्या कार्याचा परिणाम.
उत्तर:
श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले. या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात. मुलांना, वस्तुस्थिती कळत नाही. स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात. भांडणे होतात. मुले रागावून घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक, स्वास्थ्य बिघडवणारी आहे. श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या ४३४ मुलांची सुटका केली. पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणात आणून सोडले. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबे सावरली आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहेत. ज्यांचे बालपण कोळपले आहे, अशी मुले आनंदाने नाचूबागडू लागली आहे. श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठे सामाजिक कार्य घडून आले आहे.
(३) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससुद्धा अशी मुले समोर आली की, त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो. साहजिकच, एक तर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात. या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो. श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले. त्यांना जवळ घेतले. आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या १४ वर्षांच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले. पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली. याचा अर्थच असा की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात.
(४) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर:
रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना/मुलींना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते. कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायदयाची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे.
आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.
(५) सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
उत्तर:
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. अन्य अवैध कामांसाठीसुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो. जरीकाम हे अत्यंत त्रासदायक व किचकट काम. अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रितीने जंपले जाते. अत्यंत कष्टाच्या कामांसाठीसुद्धा मुले वापरली जातात. चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहेत. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा होता. सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.
भाषाभ्यास
कर्मधारय समास
→ खालील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा.
उदा., तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे!
नीलकमल – नील असे कमल.
(अ) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे. [ ]
(आ) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. [ ]
(इ) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे. [ ]
कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये.
(अ) दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात.
(आ) कधी पूर्वपद विशेषण असते. उदा., नीलकमल
(इ) कधी उत्तरपद (दुसरे पद) विशेषण असते. उदा., घननीळ
(ई) कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदा., श्यामसुंदर
(उ) कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदा., कमलनयन, नरसिंह
(ऊ) कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदा., विदयाधन
ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, त्याला ‘कर्मधारय समास’ असे म्हणतात.
• खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(अ) रक्तचंदन-
(आ) घनश्याम
(इ) काव्यामृत-
(इ) पुरुषोत्तम
द्विगू समास
खालील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.
उदा., नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे.
पंचारती – पाच आरत्यांचा समूह.
(अ) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही. [ ]
(आ) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते. [ ]
(इ) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे. [ ]
द्विगू समासाची वैशिष्ट्ये
(अ) द्विगू समासात पूर्वपद संख्यावाचक असते.
(आ) हा समास नेहमी एकवचनात असतो.
(इ) सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो.
ज्या समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो तेव्हा, त्यास द्विगू समास असे म्हणतात.
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
(अ) अष्टाध्यायी
(आ) पंचपाळे
(इ) द्विदल
(ई) बारभाई
(उ) त्रैलोक्य
अपठित गद्य आकलन
• उतारा वाचून दिलेल्या कृती करा.
(अ) तक्ता पूर्ण करा.
जंगलाचा स्वभाव – माणसाचा स्वभाव
(१) ……………….. – (१) ………………..
(२) ……………….. – (२) ………………..
जंगलाने सर्वांचे स्वागत केले-दिलखुलास, मनमोकळे. जंगलाचा स्वभावच असा मोकळाढाकळा असतो. अढी धरावी, तेढ बाळगावी यासाठीसुद्धा एखादा कोपरा लागतो. जंगलाला असा कोपरा नसतो. माणसं आणि त्यांची घरं यांना कोपरे असतात म्हणून ती जंगलाइतकी मुक्त, मोकळी नसतात. जंगल मनमोकळे असते. सहजसुंदर असते. ऊनपावसाशी ते लपंडाव खेळते. थंडीवाऱ्याशी गप्पा मारते. फुलताना, खेळताना, डुलताना, हसताना ते मनापासून सगळे काही करते. एप्रिलचा हा महिना, उन्हाळ्याचे दिवस, भामरागडच्या जंगलाची वेश बदलण्याची वेळ, तर त्या जंगलाने अंगाखांदयावरची पर्णभूषणे ढाळलेली दिसली. त्यातही संकोच नाही, की संशय नाही. त्यामुळे जमीन दिसू नये इतका हातभर खाली वाळलेल्या पानांचा सुदूर सडा. राखाडी, पिंगट रंगाचा. वारा हलकेच त्यात शिरायचा तेव्हा सळसळ आवाज व्हायचा. नागमोडी पाऊलवाटेने जेव्हा पावले त्यावर पडायची तेव्हा त्यातून चर्रचर्र आवाज उठायचा. जणू जंगल बोलते आहे असे वाटते. जंगल कुजबुजते आहे असे भासते. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो तेव्हा तो गाणे होऊनच घुमत घुमत बाहेर पडतो. पानं, फांदया, फुलं सर्वांनीच जंगल हसते, गाते आणि डुलते. पावसाच्या सरी झेलते. सचैल न्हाते. भिजत चिंब होऊन जाते.
– राजा मंगळवेढेकर.
(आ) चौकटी पूर्ण करा.
(इ) खालील कृती करा.
(१) खालील शब्दांची जात ओळखा.
(२) सूचनेप्रमाणे सोडवा.
(i) जंगल मनमोकळे असते. (काळ ओळखा.)
(ii) सहसंबंध लिहा.
कोपरे : [ ] पाने : पान
स्वमत.
जंगलाचा मनमोकळा स्वभाव सोदाहरण स्पष्ट करा.