Bhag 3.2 गढी
Bhag 3.2 गढी
Textbook Questions and Answers
कृती
1. (अ) चौकटी पूर्ण करा.
प्रश्न 1.
गावाचं भरभरून कौतुक पाहणारी
उत्तर :
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी : वाननदी
प्रश्न 2.
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत
उत्तर :
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत : सातपुडा पर्वत
प्रश्न 3.
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे
उत्तर :
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे : पाटील
प्रश्न 4.
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे
उत्तर :
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे : उचापती माणसे
(आ) खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा.
(a) बापू गुरुजी आणि परबतराव
(b) बापू गुरुजी आणि संपती
(c) लक्ष्मी आणि बापू गुरुजी
(d) बापू गुरुजी आणि पाटील
उत्तर :
(a) बापू गुरुजी आणि परबतराव – बापू गुरुजी हे परबतरावांचे सुपुत्र.
(b) बापू गुरुजी आणि संपती – संपती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा.
(c) लक्ष्मी आणि बापू गुरुजी – लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी.
(d) बापू गुरुजी आणि पाटील – पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे.
2. कृती करा.
प्रश्न 1.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तर :
3. (अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
(a) दान्याचा पूर.
(b) मानसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं.
(c) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं.
(d) मले पा आन् फुलं वहा.
उत्तर :
(a) दान्याचा पूर : खूप धान्य पिकत असे.
(b) माणसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं : परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घ्यावा आणि कामाला हात घालावा.
(c) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं : स्वत:ची कुवत पाहून कार्य करायला पुढे व्हावे.
(d) मले पा आन् फुलं वहा : फक्त मलाच चांगले म्हणा.
(आ) वैदर्भी बोलीत वापरलेल्या खालील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या. यासाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा.
(a) मन तिळतिळ दुखने
(b) ठान मांडून उबी रायने
उत्तर :
(a) मन तिळतिळ दुखने : (i) मन तिळतिळ तुटणे., (ii) दुःखाने व्याकूळ होणे.
(b) ठान मांडून उबी रायने : (i) ठाण मांडून बसणे, पाय रोवून उभे राहणे., (ii) कृतीत ठामपणा असणे.
(इ) खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
प्रश्न 1.
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.
उत्तर :
हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.
अर्थ : क्षुद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तींचे काहीही वाईट करू शकत नाही.
प्रश्न 2.
गायीचे शिंगं गायीले भारी नसतात.
उत्तर :
गायीची शिंगं गायीला भारी नसतात.
अर्थ : आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कोणालाही त्रास होत नाही.
प्रश्न 3.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.
उत्तर :
चाल व्हय रे पोरा आन् वय रे ढोरा.
अर्थ : पोरा, चल, पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा.
4. कारणे लिहा.
प्रश्न अ.
गावातला जो तो आनंदात होता, कारण…
उत्तर :
गावतला जो तो आनंदात होता; कारण त्या दिवशी गावाला ‘साजरे गाव’ हे पारितोषिक मिळाले होते.
प्रश्न आ.
शिक्षण आटोपल्यावर बापूंना गावाची ओढ लागली, कारण…
उत्तर :
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण त्यांना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते.
प्रश्न इ.
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते, कारण…
उत्तर :
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण गढी खचल्यावर गाववाल्यांना पांढरी माती मिळणार होती.
5. थोडक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
‘पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं’, असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
उत्तर :
आकाशात भरारी मारायची असेल, तर पंख मजबूत असावे लागतात. पंख मजबूत नसतील, तर अर्ध्यावरच पक्षी खाली पडेल, त्या दमलेल्या अवस्थेत त्याला पळताही येणार नाही. उडताही येणार नाही. मग कोणीही त्याला मारतील, खातील. म्हणजेच त्याला स्वत:चे रक्षण करता येणार नाही. स्वत:चे अन्न आणण्यासाठी दूरपर्यंत जाता येणार नाही. हा एक दाखला झाला. हाच सर्वत्र लागू पडतो.
आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी करू पाहतो. अशा वेळी आपण कोणती कृती करायची ठरवली आहे; त्या कृतीसाठी कोणते गुण, कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, ते प्रथम समजून घेतले पाहिजेच. ते गुण, ती कौशल्ये आपल्याजवळ आहेत का, ते तपासून पाहिले पाहिजे. ते गुण कौशल्ये नसतील, तर आपण यशस्वी होणार नाही आणि आपल्याला नैराश्य येण्याचा धोका असतो. म्हणून गुरुजींनी दिलेला दाखला नीट समजून घेतला पाहिजे.
प्रश्न आ.
बोडींगमधला ‘संपती’ नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
बोर्डिंगमधल्या संपतीला गुरुजींनी आपला मुलगाच मानले होते. त्याला वडील नव्हते. त्याचे वडील तो लहान असतानाच हे जग सोडून गेले होते. गुरुजींनी त्याला आईबापाची माया दिली होती. पण एक प्रसंग आभाळ कोसळल्यासारखा आला. तालुक्याला शिक्षण समितीची बैठक होती. गुरुजींना बैठकीसाठी जाणे भागच होते. गुरुजी तालुक्याला गेले आणि इकडे संपती पटकीच्या रोगाने त्याच रात्री मरण पावला. या घटनेने गुरुजी व्याकुळले, विव्हळले. याला आपण मुलगा मानला; पण आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही. गावात दवाखाना असता, तर तो वाचला असता. ते धाय मोकलून रडले. गावात दवाखाना नाही याला जणू आपणच जबाबदार, असे त्यांना वाटू लागले. म्हणून गावातली एक एक उणीव दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला.
प्रश्न इ.
गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.
उत्तर :
गुरुजी शाळेमध्ये पूर्ण गुंतून पडले होते. त्यांचे त्यांच्या घराकडे, पत्नीकडे, मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. तापाने फणफणला. पत्नी येऊन रागावून गेली, तेव्हा ते मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे गेले. आपल्या कनवाळू गुरुजींवर फार मोठे संकट आल्याचे मुलांना जाणवले. हे संकट दूर झाले नाही, तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील, या भीतीने संपूर्ण बोर्डिंग भकास झाले होते. त्यातले चैतन्यच नष्ट झाले होते. बोर्डिंगातल्या मुलांची जेवणावरची वासना उडाली. कोणीही जेवले नाहीत. सर्वजण निपचीत पडून राहिले होते. तिकडे अकोल्याला डॉक्टरांच्या उपचारांचा काही उपयोग झाला नाही. गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला. गुरुजी पुरते हादरून गेले. मुले तर त्यांच्यापेक्षाही भेदरून गेले. एकमेकांच्या गळ्यात पडून रडले, गढीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी खचत चाललेले मुलांना पाहवत नव्हते. मुले हादरून गेली होती. अगतिकता, असहायता यांचे दर्शन घडत होते.
6. स्वमत.
प्रश्न अ.
बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विदयार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विदयार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत; पहाटे उठूनही अभ्यास घेत. गुरुजींचा मुलगा वारला, तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले.
सातवी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली, तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पड़त, त्यांचा आशीर्वाद घेत. आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे, असा ते आग्रहही करीत. अशा प्रकारे आजीमाजी सर्व विदयार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता.
प्रश्न आ.
गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दल तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
उचापती करणारे लोक सर्वत्र असतात, असे आता माझे मत झालेले आहे. ‘गढी’ या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे. शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरांतसुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामात अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला, तर त्यांची किंमत नाहीशी होईल, अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की, उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वत:चा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते. फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे. तरच आपला देश सुधारेल.
प्रश्न इ.
‘वान नदीले कदीमधी येनारा पूर आता पटावरल्या आकळ्याइले आला व्हता.’ यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजून घेऊ, वान नदीला पूर्वी भरपूर पाणी असे. पूर्वी ती भरभरून वाहत होती. अधूनमधून पूरही येई. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई, तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होऊ लागली होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती, त्या गावात आता शाळा आली. इतकेच नव्हे, तर चौथीपर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे सातवीपर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे; म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई, तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. हे मात्र एक सुचिन्ह होते.
7. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
‘गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.
उत्तर :
‘गढी’ हे गुरुजींचे प्रतीक आहे. गढी पूर्वी भक्कम होती. गावाला आधार होती. माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची गढीची वृत्ती होती. म्हणून गढीच्या पाटलांनी अभ्यासात हुशार असलेल्या बापूंच्या शिक्षणाचा सर्व भार उचलला. तेच गुरुजींनी केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच गावाला अर्पण केले. काही काळ गावाला प्रगतीची फळे मिळालीच. ‘साजरे गाव’ हे पारितोषिकही मिळाले. पण कालांतराने गावावर अवकळा आली. प्रगती खुंटली. गढी खचत गेली. बापू गुरुजीही खचत गेले.
‘वाननदी’ हे गावातील जीवनप्रवाहाचे प्रतीक आहे. पूर्वी गरिबी होती, पण गावात निर्मळपणा होता, गावाच्या विकासाची स्वप्नेच जणू काही वाननदी वाहून आणत होती. हळूहळू वाननदीचा प्रवाह आटत गेला, पाणी कमी झाले. शेवटी शेवटी तर नदीने पात्रच बदलले. गावानेही आपला जीवनप्रवाहच बदलून टाकला.
‘वटवृक्ष’ म्हणजे गावच होय. वाननदीच्या काठावर वटवृक्ष अंकुरला, हळूहळू वाढत गेला. मुलांना, वाटसरूंना तो आधार बनला. पण हळूहळू तोही सुकत गेला. गावही बापू गुरुजींच्या प्रयत्नांमुळे अंकुरला, त्याने विकासाची स्वप्ने पाहिली. चांगले दिवस आलेही, पण उचापत्यांमुळे गाव उलट्या दिशेने प्रवास करू लागला. वटवृक्ष सुकत गेला. तसा गावही सुकत गेला.
एकंदरीत, गावाची पडझड झाली. हळूहळू निराशामय गर्तेत गाव अडकत चालला. याचे दर्शन या तिन्ही प्रतीकांमधून घडते.
प्रश्न आ.
पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून दया.
उत्तर :
‘गढी’ हे गावातील सत्तास्थानाचे प्रतीक आहे. गढीच्या गावावर प्रभाव असायचा. त्याचबरोबर गावाला गढीचा आधारही असायचा, ती गढी स्वातंत्र्यानंतर आपले सत्तास्थान गमावून बसली. तरीही तिचा आधार होता. उन्हापावसाला तोंड देत, त्यांच्याशी झगडत गढी ताठ उभी होती. हळूहळू ती खंगत गेली. चारही बाजूंनी ती कणाकणाने कोसळत होती. उचापती लोकही गढी पडण्याची वाटच बघत होते. गाववाल्यांना गढी कोसळली तर हवीच होती. गढीखालची पांढरी माती त्यांना हवी होती. ते विळ्याने हळूहळू जमीन उकरत होतेच, गाव खरे तर चांगल्या दिशेने चालले होते. पण उचापत्यांनी गावाला वाईट दिशेला ढकलले. गावाची विकासाची दिशा ढळली. जे गढीचे झाले तेच गावाचे झाले. गढी ही कथा त्या लहानशा गावाच्या स्थित्यंतराचे, पडझडीचे चित्रण करते. गावाची जशी पडझड झाली, तशी गढीचीही झाली. तीच गत बापू गुरुजींची झालेली आहे. गाव, बापू गुरुजी यांच्या पतनाची, कोसळण्याची कथा म्हणजे ही गढी होय. म्हणून ‘गढी’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
प्रश्न इ.
या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण लिहा.
उत्तर :
वैदर्भी बोली खरोखरच रसाळ भाषा आहे. ऐकताना मन प्रसन्न होते. कथेतील वर्णने कोरड्या तपशिलाने केली जात नाहीत. हृदय भाषेत ही वर्णने येतात. त्यामुळे भाषा वाचकांच्या मनाची पकड , घेते. कथेत वाक्प्रचार व म्हणींचा मुबलक उपयोग केलेला आहे. किंबहुना बोलीभाषेचे हे वैशिष्ट्यच असते. यामुळे भाषा रसाळ झाली आहे.
भाषा रसाळ होण्याला आणखी एक कारण आहे. ते म्हणजे ध्वनिमाधुर्य हे होय. नामांना, क्रियापदांना लागलेले प्रत्यय पाहा. उदा., गावाले, त्याइच्या, त्याइने, त्याइले हे उदाहरणादाखल दिलेले प्रत्यय लक्षणीय आहेत. त्यांचा उच्चार मृदू, मुलायम आहे. या प्रत्ययांचे प्राबल्य आहे. भाषा वाचताना, ऐकताना मन मृदूमुलायम होऊन जाते.
भाषेची आणखी वैशिष्ट्ये पाहा. ‘वाडा’ हा शब्द वैदर्भीमध्ये ‘वाळा’ होतो. ‘पडल्याने’ या प्रमाण मराठीतील शब्दाचे वैदर्भातील – रूप आहे पळल्याने, याच पाठातील असे खूप शब्द दाखवता येतील. मुद्दा असा की या भाषेची प्रकृतीच मुळी मृदूमुलायम असावी. वैदर्भी भाषेकडून प्रमाण मराठीकडे होणारा प्रवास रसाळतेकडून कोरडेपणाकडे जास्त होतो. प्रमाण भाषेत आखीव-रेखीवपणा जास्त असतो. त्यामुळे औपचारिकपणा जास्त येतो. थोडक्यात, हे आहे वैदर्भी भाषेचे मला जाणवलेले वेगळेपण.
कृति
1. चौकटी पूर्ण करा :
प्रश्न 1.
काळीशार, लोण्याहूनही मऊ असलेली
उत्तर :
काळीशार, लोण्याहूनही मऊ असलेली : गावची जमीन
प्रश्न 2.
नदीच्या काठी वाढत गेलेले झाड
उत्तर :
नदीच्या काठी वाढत गेलेले झाड : वडाचे झाड
प्रश्न 3.
वाडा पडल्याने उघडी – पडलेली
उत्तर :
वाडा पडल्याने उघडी पडलेली : गढी
प्रश्न 4.
गावाला मिळालेला मान :
उत्तर :
गावाला मिळालेला मान : साजरे गाव
प्रश्न 5.
उभा जन्म गाववाल्यांची सेवा करणारे
उत्तर :
उभा जन्म गाववाल्यांची सेवा करणारे : बापू गुरुजी
प्रश्न 6.
गावात काही सोयी नाहीत म्हणत शहरात जाणारी :
उत्तर :
गावात काही सोयी नाहीत म्हणत शहरात जाणारी : नवी पिढी
प्रश्न 7.
कार्यक्रमापासून दूर जाऊ पाहणारे
उत्तर :
कार्यक्रमापासून दूर जाऊ पाहणारे : बापू गुरुजी
2. कृती करा :
प्रश्न 1.
उत्तर :
प्रश्न 2.
उत्तर :
प्रश्न 3.
उत्तर :
प्रश्न 4.
उत्तर :
प्रश्न 5.
उत्तर :
प्रश्न 6.
उत्तर :
प्रश्न 7.
उत्तर :
प्रश्न 8.
उत्तर :
3. वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
(a) रगत आटवने : ……………………..
(b) ऊर भरभरून येते : ……………………..
(c) लाळ करने : ……………………..
(d) चटनीवर तेल न सापळणे : ……………………..
(e) सपन डोयात फुलने : ……………………..
(f) जीव वतने : ……………………..
(g) शाननं उबं व्हने : ……………………..
(h) मायेची वाकय घालने : ……………………..
(i) हिंमत बांदून उटने : ……………………..
(j) लोये तोळने : ……………………..
(k) पोटापान्याला लागने : ……………………..
(l) पदरात पळने : ……………………..
उत्तर :
(a) रगत आटवने : (i) रक्त आटवणे., (ii) खूप कष्ट घेणे.
(b) ऊर भरभरून येणे : (i) ऊर भरून येणे., (ii) मनात अभिमान किंवा कौतुक किंवा आनंद दाटणे.
(c) लाळ करने : (i) लाड करणे., (ii) खूप प्रेमाने वागवणे.
(d) चटनीवर तेल न सापळणे : (i) नेहमी कमतरता असणे., (ii) खूप गरिबी असणे.
(e) सपन डोयात फुलने : (i) मनात स्वप्न फुलणे., (ii) भविष्याविषयी खूप आशावादी चित्र निर्माण होणे.
(f) जीव वतने : (i) जीव ओतणे., (ii) खूप मन:पूर्वक, कष्टपूर्वक काम करणे.
(g) शाननं उबं व्हने : (i) डौलात उभे राहणे., (ii) आनंदाने व आत्मविश्वासाने वागणे.
(h) मायेची वाकय घालने : (i) मायेचे पांघरूण घालणे., मायेची पाखर घालणे.
(i) खूप माया करणे. (११) हिंमत बांदून उटने : (i) धीर एकवटून उठणे., (ii) हिमतीने तोंड देणे. हिमतीने लढायला सिद्ध होणे,
(j) लोये तोळने : (i) लचके तोडणे., (ii) एक एक तुकडा तोडावा तशा वेदना देणे.
(k) पोटापान्याला लागने : (i) पोटापाण्याला लागणे., (ii) कामधंदा मिळणे.
(l) पदरात पळने : (i) पदरात पडणे., (ii) न मागता, फार हवीशी नसताना मिळणे.
4. पुढील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा :
प्रश्न 1.
घरी तेल हाये तं मीठ नायी; आन् मीठ हाये त चटनी नायी.
उत्तर :
घरी तेल हाये तं मीठ नायी; आन मीठ हाये त चटणी नायी.
अर्थ : अत्यंत गरिबी असणे.
प्रश्न 2.
नासकुला हळयाई पिंडाला झोम्बते.
उत्तर :
नासकुला हळयाई पिंडाला झोम्बते.
अर्थ : क्षुद्र जीवसुद्धा पोटासाठी धडपडतो.
प्रश्न 3.
खुटे गाळ खुटे उपळ.
उत्तर :
खुटे गाळ खुटे उपळ.
अर्थ : खुंट जमिनीत गाडायचा आणि उपटायचा, अशी निरर्थक रिकामपणची कामे करीत बसणे.
गढी लेखिकांचा परिचय
लेखिकांचे नाव :
डॉ. प्रतिमा इंगोले
साहित्यिक व्यक्तिमत्त्व :
सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कवयित्री, कथाकथनकार म्हणूनही चांगली ओळख. ललित, विनोदी व वैचारिक स्वरूपाचे लेखनही प्रसिद्ध आहे. बालसाहित्य लेखिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध विषय आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. लोकसाहित्याच्या प्रख्यात अभ्यासक आहेत. ८० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध. आपल्या काव्यांमधून ग्रामीण जीवनातील जीवघेणा संघर्ष प्राधान्याने चित्रित केला आहे. सामाजिक विषयांवर प्रत्यक्ष संशोधन करून विपुल लेखन केले आहे.
ग्रंथसंपदा :
अकसिदीचे दाने’, ‘अंधारपर्व’, ‘अन् मृगधारा बरसल्या’, ‘अमंगल युग’ वगैरे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध. ‘आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच’, ‘आत्मघाताचे दशक’ वगैरे वैचारिक स्वरूपाची पुस्तके. ‘करारी आजी’, ‘उजळ आजोबा’ वगैरे बालसाहित्य क्षेत्रातील पुस्तके प्रसिद्ध. ‘बोडखी’, ‘पार्ट टाईम’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध
पुरस्कार पारितोषिके :
महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, संत गोरोबा सामाजिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, जनसंवाद पुरस्कार, करवीर साहित्य परिषदेतर्फे ‘दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार प्राप्त.
गढी कथेचा गोषवारा
- सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या एका लहानशा गावाची ही कथा आहे. गाव तसे खाऊनपिऊन सुखी होते. गावाला निसर्गाची साथ होती.
- फ्लॅशबॅक पद्धतीने ही कथा आकार घेते. आज त्या गावात धामधुम होती. गावाला शासनाचा ‘साजरे गाव’ हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. बापू गुरुजी या आदर्श शिक्षकाचाही त्या समारंभात सत्कार होणार आहे. साजरे गाव या पारितोषिकापर्यंत गावाचा प्रवास होण्यात बापू गुरुजींचा फार मोठा वाटा आहे. मात्र बापू खूप उदासवाणे झालेले आहेत. त्यांना समारंभात व त्यांच्या सत्कारात गोडी वाटत नाही.
- गुरुजींच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. मुले तालुक्याला शिकायला जात. गुरुजींची घरची गरिबी होती. पण गढीवरच्या पाटलांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. गुरुजी शिकले आणि त्यांनी गावाच्या विकासाला वाहून घेतले. गुरुजींच्या बरोबर शिकलेल्यांनी शहरांची वाट धरली.
- देश नुकताच स्वतंत्र झाला होता. नव्या प्रेरणांचे वारे सर्वत्र वाहत होते. गुरुजींना गावाच्या विकासाची स्वप्ने पडू लागली. गुरुजींना निवडणुकीच्या राजकारणात रस नव्हता. गुरुजींनी गावाच्या विकासाला वाहून घेतले. पण स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केले.
- गुरुजी सकाळ–संध्याकाळ, रात्री–बेरात्री शाळेतच दिसू लागले. त्यांनी शाळा नावारूपाला आणली. चौथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत झाली. गुरुजींनी शाळेत तालीमखाना सुरू केला.
- गावातल्या उचापती लोकांना हे सर्व पाहावले नाही. त्यांनी गुरुजींच्या कार्यात खोडे घालायला सुरुवात केली. दरम्यान गुरुजींना ‘आदर्श शिक्षका’चे पारितोषिक मिळाले. त्यांनी पारितोषिकाच्या रकमेतून वाचनालय सुरू केले. लहानसे बोर्डिंग चालू केले.
- बोर्डिंगातील मुलांचे ते लाडके गुरुजी झाले. बोर्डिंगाची पूर्ण काळजी गुरुजी घेत होते. मुलांना ते स्वतःची लेकरेच समजत. बोर्डिंगातला संपती तर त्यांचा मानलेला मुलगा बनला. गावात दवाखाना नव्हता. संपती पटकीच्या रोगाला बळी पडला.
- गुरुजींना गावात दवाखाना आणण्याची स्वप्ने पडू लागली. त्यांनी गावात पोस्ट आणले. पण उचापत्या लोकांमुळे पोस्ट गावातून गेले. सडक येऊ घातली, पण त्याच लोकांनी सडक होऊ दिली नाही. या गोष्टीचे गुरुजींना खूप दुःख झाले, त्यांची उमेद खचू लागली. दरम्यान वाननदी सुकत गेली. तिने पात्र बदलले.
- गुरुजींचा मुलगा आजारी पडला. तापाने फणफणला, पण गुरुजींनी तिकडे लक्ष दिले नाही. मुलगा आजाराला बळी पडला. गुरुजी गळून गेले. पण बोर्डिंगचे, शाळेतले आजीमाजी विदयार्थी गुरुजींचा खूप आदर करीत.
- गाव खचत गेला. गुरुजीसुद्धा खचत गेले. आजच्या कार्यक्रमाचे म्हणूनच त्यांना कौतुक नव्हते. त्यांच्या अंगातले त्राण संपत चालले. पाय लटलट कापत होते. पाय उचलला की भोवळ येई. आपण काय करू पाहत होतो आणि काय घडले? गुरुजींना याचा विषाद वाटला.
गढी शब्दार्थ :
- दुपटा – दोन रस्ते मिळतात ती जागा; जेथे पारावर गावकरी जमतात,
- वसेल – वसलेले. व्हतं – होते.
- गावासेजून – गावाजवळून.
- झुममूय – झुळुझुळु,
- वायता वायता – वाहता वाहता.
- वान नाही – वानवा नाही, कमतरता नाही.
- कायीशार – काळीशार,
- लोन्यावानी – लोण्याप्रमाणे,
- भरूभरू – भरभरून.
- कवतीक – कौतुक.
- कराळी – काठावर,
- झाळ – झाड.
- पायत – पाहत.
- उनाये-पावसाये – उन्हाळेपावसाळे,
- वाळा पळल्यानं – वाडा पडल्यानं.
- पांढ्ढी पांढ्ढी – पांढरी पांढरी.
- उघळी पळली – उघडी पडली.
- कारुन – का म्हणून.
- गावाले – गावाला,
- गोठ – गोष्ट.
- बयठकीतल्या – बैठकीतल्या.
- त्याइच्या – त्यांच्या.
- आवतन – आमंत्रण.
- गाववाल्याइनं – गाववाल्यांनी.
- कऱ्याचं – करायचे.
- ठरोल – ठरवले.
- काइच – काहीच.
- नोतं – नव्हतं.
- रावूरावू – राहून राहून.
- रगत आटोलं – रक्त आटवले.
- मातर – मात्र.
- लानपनी – लहानपणी.
- शाया – शाळा.
- गळीवरला – गढीवरील.
- शेजीच – शेजारीच.
- लाळ – लाड.
- सापळत – सापडत,
- गरिबाले – गरिबाला,
- कोळलंच – कोरडेच.
- फकत – फक्त.
- इतले – इतके.
- शिकेल – शिकलेला.
- गळी – गढी.
- शयरात – शहरात.
- नवकरीले – नोकरीला.
- नासकुल्या – क्षुल्लक, सामान्य.
- पायनं – पाहणे, हू
- लागलं – होऊ लागले.
- डोयात – डोळ्यात.
- पोयता पोयता – पोहता पोहता.
- वान देल्लं – वाण दिले.
- वावटयीत – वावटळीत.
- सवतंतर – स्वतंत्र.
- झकास – विकास.
- पेरमानं – प्रेमाने.
- व्हयेल गळी – झालेला गडी.
- पानी पावावं – पाणी पाहावे (किती खोल सुरक्षित आहे, वगैरे).
- पख पारखावं – पंख पारखावेत,
- उळावं – उडावं.
- हे बी तं – हीसुद्धा तर.
- आंदी – आधी.
- वतून – ओतून.
- कई पा – कधीही बघा.
- लकषुमीच – लक्ष्मीच.
- पावू पावू – पाहून पाहून,
- सेल्यासेवटी – सरतेशेवटी.
- धाळून – धाडून, पाठवून,
- जियाले – जेवायला.
- आकळ्याइले – आकड्याला (आकड्याइतका).
- तसीई – तशीही.
- पोट्याइची – मुलांची.
- नोती – नव्हती,
- जीतून – जिंकून.
- उचापती मानसाइले – उपद्व्यापी.
- नायी कोई सादलं – काही साधले नाही, जमले नाही.
- जयताळेपना – जळफळाट.
- हळ्याच्या सरपानं – गवताच्या सापानं,
- पयस्याचं – पैशाचे.
- लानसक – लहानसे.
- खळकूई – कवडीही.
- लळले – रडले.
- धुवारी – धार (पाण्याची).
- पयलमसुट्ट्या – पहिल्या फटक्यात.
- गढीलोग – गढीपर्यंत.
- तपेल फफूटातून – तापलेल्या फुफाटातून.
- सईन व्हईन – सहन होईल?
- मऱ्याच्या – मरणाच्या.
- आताई – आताही, आतासुद्धा.
- लेकराची गुळी – लेकराचा गोडवा, बाळ जन्मल्याची गोड बातमी.
- लोये तोळत – गोळे तोडत.
- काऊन कयत नसीन – का बरे कळत नसेल?
- इरल्यावानी – विरून गेल्यासारखे.
- उजिळात – उजेडात.
- झाकुल्यात – पहाटेला.
- आखीन – आणखी.
- इस्त्यावानी – विस्तवासारखा.
- पालट पळना नाही – फरक पडला नाही.
- अवकानी – अवकाळी,
- गढीलेई झोळलं – गढीलाही झोडले.
- चवूभवताल – चारही बाजूंनी.
- अखाळीला – आषाढीला (आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा),
- सळक – सडक.
- पळीत – पडीत, पडीक,
- कायले – कशाला,
- अथी – इथे.
- दुकळीत – गंजिफाच्या खेळातील दुक्कलीत.
- भळकोनारा – भडकवणारा,
- सवतंतरानई – स्वातंत्र्याने, स्वातंत्र्यात.
- गाटापान्याचं – चिखल–पाण्याचे.
- जीव सोळत होते – जीव सोडत होते, मरण पावत होते.
- इव्यानं – विळ्याने.
- सारोयाले – सारवायला.
- पातरच – पात्रच.
- कोळली पळत – कोरडी पडत.
गढी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- मन तिळतिळ दुखने – दु:खाने व्याकूळ होणे.
- ठान मांडून उबी रायने – पाय रोवून उभे राहणे.
- रगत आखणे – खूप कष्ट घेणे.
- ऊर भरभरून येणे – अभिमान/कौतुक/आनंद मनात दाटणे.
- लाळ करने – खूप प्रेमाने वागवणे.
- चटणीवर तेल न सापळणे – खूप गरिबी असणे.
- सपन डोळ्यात फुलने – भविष्याविषयी मनात आशावादी चित्र निर्माण होणे.
- जीव वतने – खूप मनापासून कष्टपूर्वक काम करणे.
- शाननं उबं व्हने – आनंदाने व आत्मविश्वासाने वागणे.
- मायेची वाकय घालने – खूप माया करणे.
- हिंमत बांदून उटने – हिमतीने लढायला सिद्ध होणे.
- लोये तोळणे – एक एक तुकडा तोडावा तशा वेदना देणे.
- पोटापान्याला लागणे – कामधंदा मिळणे.
- पदरात पळने – (एखादी गोष्ट) न मागता, फार हवीशी नसताना मिळणे.