Bhag 3.2 ध्यानीमनी
Textbook Questions and Answers
कृती
1. खालील कृती करा.
(अ) शालूवहिनीची स्वभाववैशिष्ट्ये
प्रश्न 1.
उत्तरः
प्रश्न 2.
उत्तरः
प्रश्न 3.
उत्तरः
2. स्पष्ट करा.
प्रश्न अ.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
उत्तर :
शालूवहिनाला स्वत:चे मूल नाही. त्यामुळे सामाजिक उपेक्षांचा तिला सामना करावा लागतो. या सामाजिक अवहेलनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. यावर उपाय म्हणून ती ‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरू पाहते. त्याच्या जन्मापासूनच त्या मुलासाठी खूप त्रास ती सहन करायची. नऊ महिने त्याचे ओझे तिने पोटात वाहिले आहे. त्याची शी-शू पुसायची. त्याला अंघोळ घालायची आहे.
टाळूवर तेल टाकून ती त्याला लहानपणी शांतपणे झोपवायची त्याच्या वस्तूंचा घरभर पसरलेला पसारा पाहून ती आनंदित व्हायची. त्याच्या कपड्यांचा, घामाचा गंध तिला आवडायचा. खेळून घरी आला की त्याचे चिकचिकित अंग बघून तिला त्याच्या खेळण्याचे कौतुक वाटायचे. त्याचे अक्षर चांगले नाही त्याबाबतीत तो बापाच्या वळणावर गेलाय याचेही ती कौतुक करायची. त्याच्यासाठी साजूक तुपाचा शिरा आणि चपातीचे लाडू बनवायची. त्याचे कपडे धुवायची. थोडक्यात वात्सल्य भावना तिच्यात ओतप्रोत भरलेली होती. आपल्या मुलावर त्याच्या बाललीलांवर तिचे अतोनात प्रेम होते.
प्रश्न आ.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
उत्तर :
सदा आणि शालन या जोडप्याला स्वत:चे मूल नाही. सामाजिक उपेक्षांना सामना करण्याची ताकद नसलेली शालू कल्पनेच्या विश्वात ‘मोहित’ या मुलाला जन्म देते. तिच्या रंगहीन जीवनात त्यामुळे आनंद फुलतो. हा आनंद तिच्याकडून हिरावून घेतला तर ती मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होईल हे लक्षात घेऊन सदानंद तिला या आभासी विश्वात तसाच जगू देतो. हळूहळू तोही या विश्वात रमायला लागतो. तो म्हणतो संसारात एकमेकांच्या इच्छेसाठीच तर जगायचं असतं आणि इच्छेला शरीर असायलाच हवं असा काही नियम नाही. काल्पनिक मोहित दोघांच्या रुक्ष जीवनात प्राण ओततो.
त्याचं खेळणं-पडणं, चिखलात लोळणं, त्याचे कपडे-लत्ते, त्याच्या वस्तूंचा पसारा हा त्या दोघांच्या भावविश्वाचा एक भाग बनतो. मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सर्वांपासून दूर त्यांनी स्वतःचे वेगळे विश्व निर्माण केले आहे. या विश्वात चैतन्य निर्माण करणारा जीवनरस म्हणजे मोहित. रडत, भेकत, कण्हत, कुंथत, कोरडं आयुष्य जगण्यापेक्षा जे ‘नाही’ ते ‘आहे’ हे समजून जीवन जगण्याचा सोपा मार्ग त्या दोघांनी निवडला आहे. मोहित त्यांच्या जगण्याचे जीवनसत्त्व आहे. तो नसेल तर त्यांचे अस्तित्व बर्फाच्या ठिसूळ पांढऱ्या गोळ्यांप्रमाणे होईल.
3. उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न अ.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
उत्तर :
अपत्यहीन जोडप्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतेचाच असतो. सदानंद आणि शालन या जोडप्यामध्येसुद्धा मूल नसल्यामुळे नात्यात कोरडेपणा आला होता. यावर उपाय म्हणून शालन मोहित नावाच्या काल्पनिक मुलाला जन्म देते आणि मातृत्वाचे रंग आपल्या जीवनात भरते. वास्तविक तिचा हा प्रवास मनोरुग्ण या दिशेने चाललेला असतो. पण तरीही तिला त्यातून आनंद मिळतोच हे जाणवून सदानंद या मुलाला स्वीकारतो.
त्यांच्या जन्मापासूनच्या सगळ्या गोष्टीत तो शालनला साथ देतो. पूर्वी दुःखी असणारी, मनाने उद्ध्वस्त झालेली शालन परत जीवन समरसून जगतेय हे बघून तो तिला या नात्यात साथ देतो. ही नवीन जबाबदारी त्याच्यावर येते. ही जबाबदारी दुहेरी आहे. एक म्हणजे शालनला तिच्यात आभासी विश्वात रमायला देणे. दुसरे आभासी दुनियेतील काल्पनिक मुलाबरोबर स्वत:चे भावविश्व निर्माण करणे. त्यामुळे या दुहेरी जबाबदारीने मी वाकलो आहे असे तो म्हणतो.
प्रश्न आ.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
उत्तर :
मूल नसल्यामुळे सतत सामाजिक अवहेलना-अपमान, तिरस्कार या भावनांना सामोरी जाणारी शालू हळूहळू मनोरुग्ण होत जाते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याला दुंभगलेले व्यक्तिमत्त्व असे म्हणतात. आपल्या जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी शालूचे मन काल्पनिक विश्वात रमू लागते. या विश्वात तिचा स्वत:चा मुलगा आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जन्माला आला तेव्हापासून ती वात्सल्य भावनेचा अनुभव घेत आहे. त्याचे मोठे होते जाणे, शाळेत जाणे या सगळ्याच गोष्टी वास्तव जीवनातील मुलांच्या जीवनात ज्या प्रमाणे घडतात. त्याचप्रमाणे त्या मोहितच्या जीवनात घडतात.
इथे शालन वास्तव आणि आभास यांतील सीमारेषा पुसून टाकते. मोहितचं कल्पनेतील विश्व वास्तवात डोकावायला लागते. त्याचे सामान, त्याची खेळणी, कपडे घरभर पसरायला लागतात. त्याच्या घामाचा-शरीराचा गंध तिला वास्तवात जाणवायला लागतो. त्याच्यासाठी खादयपदार्थ घरात तयार व्हायला लागतात. तिचा पती सदानंद तिच्यात होणारे सर्व बदल पाहत असतो. आधी दुःखी, एकाकी असणारी शालन आता खूप आनंदात जीवन जगते.
हाच त्याच्याही जगण्याचा आधार आहे. त्याचा डॉक्टर मित्र समीर करंदीकर जेव्हा त्याला शालनला ‘या जगण्यातून बाहेर काढ, तिला वास्तवाची जाणीव करून दे’ असा सल्ला देतो तेव्हा सदानंद उद्विग्नतेने म्हणतो, “तिचा जीवनरस संपवून तिला मारून टाकण्यात काय अर्थ आहे?” तो समीरला सांगतो की स्वत:चे मूल हवे ही तिची इच्छा होती. ती तिने काल्पनिक विश्वात पूर्ण केली आहे. आता ती आनंदी आहे. मग त्या इच्छेला वास्तव शरीर नसेल तरी चालेल. तिचा आनंद हाच महत्त्वाचा आहे.
4. स्वमत,
प्रश्न अ.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
शालूचे वागणे हे अयोग्य आहे. वात्सल्य भावना ही ‘स्त्री’ ची नैसर्गिक भावना आहे, हे जरी खरे असले तरी स्त्री जीवनाचे सार्थक ‘माता होणे’ एवढेच नाही. आज स्त्रियांनी डॉक्टर, इंजिनिअर ते थेट वैमानिक, अंतराळ संशोधन, अवकाश यात्री इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. शिक्षणाने तिला पारंपरिक जोखडातून मुक्त केलं आहे. ज्ञानाची नवीन कवाडं तिच्यासाठी उघडी झाली आहेत. असे असताना उच्च शिक्षित असणारी शालन कल्पनेच्या दुनियेत आभासी मूल निर्माण करून एक खोटे जीवन जगते हे योग्य वाटत नाही. जीवनातला आनंद अनेक गोष्टीमध्ये शोधता येतो. कोणी झाडांना-फुलांना आपली मूलं मानून निसर्गात रमतात तर सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या स्त्रिया शेकडो मुलांच्या आयुष्यात रंग भरताना दिसतात.
लोकसंख्या वाढ ही भारताची प्रमुख समस्या असताना स्वत:चे मूल नाही म्हणून खंत करत बसण्यापेक्षा गरीब मूल दत्तक घेऊन त्याच्या जीवनाला आकार देणे हे केवढे तरी मोठे समाज कार्य ठरू शकते. त्यात शालन ही उच्चशिक्षित आहे. तिच्या ज्ञानाचा उपयोग इतर मुलांना करून देण्याऐवजी ते ज्ञान ती फुकट घालवते आहे. मातृत्वाचा इतका ध्यास घ्यायला हवा की विश्वातील सगळ्या अनाथ मुलांमध्ये आपले मूल शोधता आले पाहिजे. दुर्दैवाने शालन मात्र पारंपरिक मूल्य, संकल्पनांना बळी पडलेली दिसते.
प्रश्न आ.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
पुत्रप्रेम हे सजीव प्राण्यांचं फार मोठं स्वभाव-वैशिष्ट्य आहे. पशु-पक्षी-प्राणी हे देखील त्याला अपवाद नाहीत. मानवी समूहात स्त्री-पुरुष आणि त्यांची कर्तव्ये ही परंपरेतून निर्माण झाली आहेत. त्यामुळे संसार करणे, मूल जन्माला घालणे, त्यावर मातृत्वाचा वर्षाव करणे, त्याचे संगोपन करणे, त्याला वाढविणे या सगळ्या गोष्टी स्त्रियांची आदयकर्तव्ये ठरवली गेली आहेत. मुलगा-मुलगी मोठे होत असतानाच त्यांना त्यांच्या कर्तव्याची, भूमिकेची जाणीव करून दिली जाते. पुरुषाने अर्थार्जन करणे आणि ‘स्त्री’ ने ‘चूल-मूल’ सांभाळणे या भूमिका परंपरेने लादल्या आहेत.
‘वात्सल्य-पुत्रप्रेम’ हे पुरुषांतही तितकेच तीव्र असते ही गोष्ट आधुनिक विज्ञानाने स्पष्ट केली आहे. म्हणूनच पाश्चात्य देशात बाल संगोपन रजा ही स्त्रियांबरोबर पुरुषांनाही मिळते. म्हणजेच ही भावना निसर्गनिर्मित आहे. पण त्याचा आविष्कार स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जास्त आढळतो कारण सामाजिक रचना-व्यवस्था तशी आहे. थोडक्यात स्त्रियांच्या बाबतीत पुत्रप्रेम ही भावना नैसर्गिकआणि मानवनिर्मित दोन्ही आहे.
प्रश्न इ.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
उत्तर :
शालन मोहितच्या कपड्यांचे वर्णन करताना म्हणते मोहित आता मोठा होतोय. वाढणाऱ्या वयामुळे तो आता उंच होत आहे. त्यामुळे त्याचे कपडे आखूड होत आहेत. त्याचे बरेचसे कपडे, त्याचे शर्ट,पँट, टॉवेल, बनियन, बूट हे त्याच्या आजोबांनी म्हणजे शालन वहिनीच्या बाबांनी त्याला दिले आहेत. त्याचे मोजे रोज व्यवस्थित धुवावे लागतात. त्याच्या कपड्यांना त्याच्या घामाचा शरीराचा गंध येतो. तो सतत चिखलात-मातीत खेळायला जातो. त्यामुळे त्याचे कपडे खूप खराब होतात. कधी खेळताना पडून एखादी जखम होते. तेव्हा कपड्यांना रक्ताचे डागही लागलेले असतात. थोडक्यात त्याच्या कपड्यांचा अस्ताव्यस्त पसारा सगळीकडे घरभर पसरलेला असतो.
5. अभिव्यक्ती.
प्रश्न अ.
शालूला सदाने साथ का दिली असावी ते स्पष्ट करा.
उत्तर :
वात्सल्य भावना ही शालीनीमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मूल हवे आहे. तिची बुद्धी तोकडी नाही. ती उच्चशिक्षित आहे. पण प्रत्येक क्षणाला ती खळखळ हसऱ्या बाळाचे स्वप्न पाहतेय. यामुळे स्वप्न हेच सत्य समजून ती जीवन जगू लागते. या स्वप्नात तिचे मूल जन्माला आले आहे. त्याचे नाव मोहित आहे. तो जसा जसा मोठा होतोय शालन त्याच्या बाललीलांनी हरखून जाते. तिच्या निराशेने भरलेल्या जीवनात नवीन आशेचा किरण निर्माण झालाय. तो किरण खोटा आहे. सदानंदाला कळत आहे. पण बायकोला या स्वप्नातून बाहेर काढणे म्हणजे तिला जिवंतपणी मरणयातना देणे हे त्याला माहीत आहे. इच्छा नसूनही तो आधी या खोट्या जगात तिची साथ देत राहतो. हळूहळू तोही या कल्पनेच्या दुनियेत रमू लागतो.
अस्तित्वात नसलेला मोहित त्या दोघांचे जीवनसत्त्व होते. त्यांच्या रुक्ष जीवनात भावनेचा ओलावा निर्माण होतो. शालन यामुळे आनंदी होते. सामाजिक अवहेलनेने, वांझपणाच्या भावनेने आतून तुटलेली शालन परत एकदा नवीन स्वप्नात रममाण होऊन आनंदाने जीवन जगते आहे. तिचा आनंद हिरावून कशाला घ्या? तिला परत दुःखात लोटण्याला काय अर्थ आहे? या विचाराने शालूला सदाने साथ दिली असावी.
प्रश्न आ.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तर :
वरील विधान हे अर्धसत्य आहे. कारण हे विधान सत्य मानलं तर ‘शिना वोरा’ सारखे प्रकरण या देशात घडलेच नसते. सख्ख्या आईने पैशासाठी मुलीचा जीव घेतला ही मातृत्वाला काळीमा फासणारी घटना याच देशातील आहे. जिथे ‘श्यामच्या आई’ सारखी कालातीत पुस्तके जन्माला येतात, तिथे पुत्रप्रेम-वात्सल्य या स्त्रियांमधील सार्वत्रिक भावना असल्या तरी स्वत:चे करियर घडविण्यासाठी अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही एकीकडे वाढत आहे. दुसरीकडे अविवाहित राहून मूल दत्तक घेऊन आपली मातृत्वाची तहान भागविणाऱ्या स्त्रिया सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत नवा पायंडा निर्माण करताहेत.
म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढणाऱ्या पुत्रांमुळे, “किती आंधळेपणाने मुलांवर प्रेम करायचे?” हा ही प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. आताच्या काळातील स्त्रिया या पुढारलेल्या आहेत. पुत्रप्रेमाच्या पलीकडे जाऊन व्यवहाराचा विचार करून सगळ्याच गोष्टी त्या मुलांवर उधळून टाकत नाहीत हेही सत्य या आधुनिक जगात पाहायला मिळते. म्हणजेच पुत्रप्रेमाची नैसार्गिक भूक जरी प्रत्येक स्त्रीकडे असली तरी आधुनिक काळात त्याला व्यवहार ज्ञानाने मोजण्याची रीतही रूढ झालेली आहे.
प्रश्न इ.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
‘मोहित’ या काल्पनिक मुलाच्या रूपाने आपल्या जीवनात मातृत्वाचे रंग भरणारी शालू आणि काल्पनिक जग कोणते व वास्तव कोणते या विचाराने गोंधळलेला सदा या दोघांच्या मनातील घालमेल या नाटकात नाट्यरूपाने प्रकट होते. एका बाजूला मूल नसल्यामुळे नात्यात आलेला कोरडेपणा तर दुसऱ्या बाजूला कल्पनाविश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे मनाची पकड घेत नाटकाचे कथानक गतिमान होते. मूल असल्याशिवाय आयुष्याची परिपूर्ती नाही अशा खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालन मनोरुग्ण होते. काल्पनिक विश्वात जगायला लागते. त्या विश्वात स्वत:चे खोटे मूल आकाराला आणते आणि त्या मुलाच्या संगोपनात गुंतून जाते. त्यात ती आनंद शोधते.
पण हा आभासी फुगा जेव्हा फुटेल तेव्हा शालन ठार वेडी होईल हे सत्य डॉक्टर समीर करंदीकर सदानंदला सांगू पाहतात. पण सदानंद त्यांना निरुत्तर करतो. मला शालनचे सुख हिरावून घ्यायचे नाही. तिला पुन्हा दु:खाच्या गर्तेत मला लोटायचे नाही असे तो निक्षून सांगतो. शेवटी मीही आता या आभासी काल्पनिक दुनियेत रमलो आहे हे कबुल करतो. अस्तित्वात नसलेल्या या दोघांचा मुलगा त्यांचा जीवनरस आहे हे तो समीरला सांगतो. हा रस गेला तर आम्ही दोघे संपून जाऊ अशी भीती तो व्यक्त करतो. या शेवटामध्ये एक प्रकारची हतबलता आहे. परिस्थितीला शरण जाणारी नाउमेद मानसिकता आहे.
सत्याला सामोरे जाण्याऐवजी त्यापासून पयालन करायचा पलायनवाद यात दिसून येतो. त्यापेक्षा अपत्यहीनतेवर मात करून एखादया मानवतावादी ध्येयाला या जोडप्याने वाहून घ्यायला हवे होते. स्वप्नातून बाहेर येऊन नवीन जीवनाची सकारात्मक सुरुवात करायला हवी होती. शिक्षणाने आलेलं शहाणपण वास्तव जीवनात वापरता आले नाही तर त्या शिक्षणाला अर्थ नाही असे वाटत राहते. म्हणून शेवट विषष्ण करणारा आहे असे वाटते.
Additional Important Questions and Answers
कृती : १
प्रश्न 1.
वरील परिच्छेदात व्यक्त झालेल्या विषमता.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) [सामाजिक विषमता,]
(b) [नैसर्गिक विषमता,]
(c) [आर्थिक विषमता आर्थिक]
कृती – २.
प्रश्न 2.
प्रत्येक विषमतेचं वैशिष्ट्य
उत्तर :
(a) नैसर्गिक विषमता [ ]
(b) सामाजिक विषमता। [ ]
(c) आर्थिक विषमता [ ]
उत्तर :
(a) सर्वच नैसर्गिक विषमता वैदयकीय मार्गाने दूर होऊ शकत नाही.
(b) सामाजिक विषमतेचं रस्त्यावर प्रदर्शन मांडता येतं.
(c) आर्थिक विषमता सरकारी धोरणांमुळे अस्तित्वात येते.
समीर : एक माणूस म्हणून मला तुमच्या ………………………………………………………………………………………….. निघा तुम्ही आता. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ७८-७९) |
कृती-३.
प्रश्न 1.
रडत-थकत किंवा कण्हत-कुंथत या शब्दांच्या जोड्यांमधील दोन्ही शब्दांचे अर्थ जवळजवळ सारखेच आहेत अशा तुम्हाला माहीत असलेल्या शब्दांच्या जोड्या.
(a) [ ]
(b) [ ]
(c) [ ]
उत्तर :
(a) रमत गमत
(b) इमाने इतबारे
(c) धावत पळत
स्वमत :
प्रश्न 1.
विषमतेच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या उल्लेखातून सदानंद याला काय सांगायचे आहे ते स्पष्ट करा.
उत्तर :
या परिच्छेदात तीन प्रकारच्या विषमतेचा सदानंद उल्लेख करतो आहे. या तिन्ही विषमता वेगवेगळ्या आहेत व त्यामागे असणारी कारणेही भिन्न आहेत.
समाजामध्ये श्रीमंत-गरीब ही दरी असणे म्हणजे आर्थिक विषमता होय. प्राचीन भारतात विकासाची संधी सर्वांना समान उपलब्ध नव्हती. शिक्षणाची संधीही काही मूठभर लोकांना उपलब्ध होती. त्यातून एक वर्ग प्रगती करत गेला तर दुसरा वर्ग अज्ञानाच्या अंधकारात लोटला गेला त्यातून समाजात आर्थिक विषमता निर्माण झाली. जाती-व्यवस्थेमुळे उच्च जाती-नीच जाती असे भेदभाव निर्माण झाले. त्यातून मग सामाजिक भेद निर्माण झाले. नैसर्गिक भेद हे निसर्गामधूनच येतात. कोणी प्रचंड बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतो तर कोणी मंदबुद्धी म्हणून जन्माला येतो. तसेच काही जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते तर काही अपत्यप्राप्तीसाठी तळमळत राहतात. सदानंद म्हणतो सामाजिक-आर्थिक विषमता दूर होऊ शकते पण शालन आणि मला मिळालेली
अपत्यहीनतेची देणगी वैदयकीय मार्गानेही दूर होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातील कमतरता तो या वाक्यातून अधोरेखित करतो.
स्वाध्यायासाठी कृती
- ‘मोहित हे आमचं जीवनसत्त्व आहे’ या वाक्यातून प्रकट होणाऱ्या सदानंदाच्या मनातील भावना स्पष्ट करा.
ध्यानीमनी प्रस्तावनाः
वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर अर्थपूर्ण लेखन करणारे मराठी नाट्यसृष्टीतील हरहुन्नरी नाटककार म्हणजे अर्थातच प्रशांत दळवी. केवळ नाटकच नव्हे तर चित्रपट-लेखन या सर्वच प्रांतात आपल्या आगळ्या-वेगळ्या लेखन शैलीने त्यांनी आपला वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटविला आहे. ‘खिडक्या’ हा त्यांचा कथासंग्रह तर ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘गेट वेल सून’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ या सगळ्याच नाटकांमधून त्यांनी मानवी भावभावनांचा, मनातील मानसिक आंदोलनांचा आशयपूर्ण पट चितारला आहे. विशेषतः माणसांच्या जगण्याचा, त्यांच्या कृती-उक्ती मागे असलेल्या कारणांचा त्यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वेध घेत एकूणच मानवी मनाची गुढता उलगडून दाखवलेली आहे. ‘बालगंधर्व पुरस्कार’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार’, ‘जयवंत दळवी पुरस्कार’ इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवांकित करण्यात आले आहे.
ध्यानीमनी पाठाचा/नाटकाचा परिचय :
प्रस्तुत नाटकाचा वेचा हा ‘ध्यानीमनी’ या नाटकातून घेतला आहे. या नाटकात दोन जोडपी आहेत. सदानंद-शालन आणि समीर-अपर्णा. प्रस्तुत वेचामध्ये मात्र तीन पात्रांचे अस्तित्व आपल्या समोर येते. ते म्हणजे डॉक्टर असणारा समीर आणि मूल-बाळ नसलेले जोडपे सदानंद आणि शालन!
आज समाज कितीही पुढे गेला तरी समाज स्त्रीकडे पाहताना पारंपरिक दृष्टिकोनातूनच पाहतो हे सत्य आहे. ‘चूल-मूल’ या चौकटीतच स्त्रीचे कर्तृत्व शोधले जाते. त्यामुळे निपुत्रिक शालूला वेगवेगळ्या सामाजिक उपेक्षांना सामोरे जावे लागते. जणू मूल नसलेली स्त्री म्हणजे अपशकुनी स्त्री या नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. या सर्वांचा शालनच्या मनावर प्रचंड मानसिक आघात होतो. ती आपले मानसिक संतुलन हरवून बसते.
अपत्यहीनतेची ही जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी ती काल्पनिक विश्वाचा आधार घेते. जन्माला न आलेल्या मुलाला तो जन्माला आलाच आहे असे समजून वाढवू लागते. तिचे हे असे कल्पनेत रमणे, वास्तवापासून दूर जाणे तिचा पती हतबल होऊन पाहत राहतो. तिला सत्याची जाणीव करून दिली तर ती कदाचित ठार वेडी होईल आणि तिचे जगणेच संपून जाईल या भीतीने सदानंद तिच्या वागण्याचा स्वीकार करतो.
हळूहळू अस्तित्वात नसलेल्या या दोघांच्या मुलाने म्हणजे मोहितच्या अस्तित्वाने घर भरून जाते. त्याचे कपडे, त्याची शाळा, त्याचे खेळणे, त्याच्या घामाचा वास, त्याचे बूट, त्याचे टॉवेल या सर्व गोष्टींनी घर भरून जाते. जणू एक आभासी मूल त्या घरात जन्म घेते. या मुलाला वाढविताना पती-पत्नी जीवनाचा आनंद शोधू पाहतात.
समीर डॉक्टर आहे. होमसायन्समध्ये बाल मानसशास्त्राचा अभ्यास केलेल्या शालनचं असं तीळ तीळ तुटत जाणं, वास्तव जीवनापासून भरकटत जाणं हे सगळं त्याला भयानक वाटत राहतं. मनोरुग्ण झालेल्या शालनला तो यातून बाहेर काढू इच्छितो कारण डॉक्टर म्हणून त्याचे ते कर्तव्य आहे. पण शालन समीरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्याच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करते. त्यामुळे समीर सदानंदकडे आशेने बघतो की निदान तो तरी आपल्या पत्नीला वास्तवाची जाणीव करून देईल. पण सदानंद मात्र शांतपणे त्याला स्पष्टीकरण देतो, “सत्य सांगून शालूला अस्तित्वहीन करून तिचं एका हाडामासाच्या जिवंत पुतळ्यात रूपांतर करण्यापेक्षा आभासी दुनियेत आनंदाने रमणारी स्वप्नाळू शालू मला हवी आहे.”
एकीकडे मूल नसल्यामुळे आलेला नात्यातील कोरडेपणा तर दुसरीकडे कल्पना विश्वातील मुलाबरोबर रमताना येणारा भावनिक ओलावा यामुळे नाटक मनाची पकड घेते. मानवी मनातील अगम्य गुंते या निमित्ताने नाटककार उलगडून दाखवतो आणि सबोध मन-अबोध मन यातील वंद्व स्पष्ट करतो. सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने केलेली मानवी मनाची उकल या नाटकाच्या निमित्ताने लेखक स्पष्ट करतो आणि नाटक उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते.
ध्यानीमनी समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :
सायकॉलॉजी- मनाचा अभ्यास करणारे शास्त्र/मानसशास्त्र (psychology), वस्तुस्थिती – सत्य परिस्थिती (reality), जोजवणे – झोपवणे, भामटा – लबाड मनुष्य (deceitful person), आखूड – लहान, छोटे (short), कणीक – गव्हाचे पीठ (weat flour), तवंग – थर (a thin layer), मेडिकल टेस्ट – वैदयकीय तपासणी, वैदयकीय चिकित्सा, ओशाळणे – लाजणे (to shrink), तोळामासा – साधारण गोष्ट, सामान्य गोष्ट (very delicate, easily affected), पिसाळणे – वेडे होणे. (madden), जावळ – लहान मुलाच्या डोक्यावरील केस (hair of a child), स्वयंभू – स्वत:हून निर्माण झालेले (self born, self existent), तुकतुकीत – चकचकीत (smooth and shining), कण्हणे – रडणे (to groom), कुंथणे – वेदनेने कळवळणे (to moan).
ध्यानीमनी वाक्प्रचार :
चपापून पाहणे – दचकून पाहणे, ध्यास घेणे – एकाच गोष्टीचा सतत विचार करणे, कळा सोसणे – त्रास सहन करणे, पाठीला कळ लागणे – पाठ खूप दुखणे, चेहरा तांबूस पडणे – चेहरा लाल होणे, अस्ताव्यस्त पसरणे – इकडे तिकडे पसरणे, बेचिराख होणे – नष्ट होणे, घोटून घेणे – एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करून त्यात तरबेज होणे, धुगधुगती आशा असणे – थोडीफार आशा असणे, दत्तक घेणे – दुसऱ्याचे मूल आपले मूल म्हणून स्वीकारणे, अंतर न पडू देणे – दुरावा निर्माण न होऊ देणे, घालून पाडून बोलणे – अपमानकारक बोलणे, घुमा होणे – मनातल्या मनात कुढत राहाणे.