Bhag 4.1 सूत्रसंचालन

Day
Night

Bhag 4.1 सूत्रसंचालन

Textbook Questions and Answers

कृती

खालील कृती करा.

प्रश्न 1.
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
उत्तरः

सूत्रसंचालनासाठी वाचन, श्रवण-निरीक्षण, चिंतन-मनन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करावी लागतात. कोणत्याही सूत्रसंचालकाला प्रभावी सूत्रसंचालन करण्यासाठी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करावी लागतात. सूत्रसंचालकाचा आवाज भारदस्त असावा. आवाजात सष्टपणा असावा. तो बोलताना कुठेही अडखळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्याची भाषा साधी, सोपी व श्रोत्यांना समजणारी असावी.

अतिशय बोजड किंवा फार आलंकारिक भाषेचा वापर करू नये. सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न असावे. त्याचा व्यासपीठावरील वावर आत्माविश्वासपूर्ण असावा. कार्यक्रमात निवेदन करताना व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मानपूर्वक परिचय करून देण्याचे व त्यांचा यथोचित नामोल्लेख व त्यांना अभिवादन करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असणे गरजेचे आहे. कार्यक्रमात समयसूचकता, हजरजबाबीपणा, मिस्किलपणा असावा.

कार्यक्रमात आयत्या वेळी बदल करताना तो लीलया आणि सहजपणे करण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाकडे असावे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार असल्याने वक्ते, कलावंत यांना प्रोत्साहित करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. समोरचा वयोगट लक्षात घेऊन भाषाशैली, उदाहरणे, काव्यपंक्ती यांचा सुव्यवस्थित वापर करावा लागतो. आवाजाबरोबरच ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव असणे अपेक्षित आहे.

कार्यक्रम हा बंदिस्त सभागृहात आहे की खुल्या मैदानावर यावर सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्या बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून त्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेता आले पाहिजे. उत्तम सूत्रसंचालक हा चांगला निवेदक, वक्ता असावा. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालकाला तो-तो विषय समजला पाहिजे. उदा. सांगितिक कार्यक्रमात संगीताची जाण त्याला असणे गरजेचे आहे. सूत्रसंचालकाचे भाषेवर प्रभुत्व असावे.

सूत्रसंचालकाचा उदंड आत्मविश्वास हा त्याच्या सूत्रसंचालनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. थोडक्यात सूत्रसंचालकाकडे प्रवाही भाषा, आत्मविश्वास, समयसूचकता, हजरजबाबीपणा, व्यासंग, देहबोली ही गुणवैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे आणि याच कौशल्यांतून तो उत्तम सूत्रसंचालक होऊ शकतो.

प्रश्न 2.
‘वसुंधरा दिनानिमित्त’ होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका तयार करा.
उत्तरः

जागतिक वसुंधरादिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम पत्रिका

दि. २२ एप्रिल

  • पूर्वकथन :
  • दीपप्रज्वलन :
  • वसुंधरा गीत :
  • पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे स्वागत :
  • प्रास्ताविक :
  • ‘चला वसुंधरा वाचवू या’ शपथः
  • मा. उद्घाटक मनोगत :
  • स्पर्धकांचे सादरीकरण :
  • परीक्षकांचे मनोगत :
  • स्पर्धेचा अंतिम निकाल :
  • पारितोषिक वितरण :
  • मा. अतिथी मनोगत :
  • अध्यक्षीय मनोगत :
  • आभारप्रदर्शन :

प्रश्न 3.
‘सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः

कोणत्याही कार्यक्रमाचा मुख्य आधार ही त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका असते. कार्यक्रम पत्रिका ही संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणारी असते. कार्यक्रम पत्रिका ही कार्यक्रमाची खरी ओळख व त्याचे स्वरूप मांडणारी असते. कार्यक्रम पत्रिकेनुसार कार्यक्रम पुढे-पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेची अस्सल ओळख असणे गरजेचे असते. सूत्रसंचालकाला कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी कार्यक्रम पत्रिका समजून घेणे गरजेचे असते.

प्रत्येक कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका वेगळी असते. त्याची संहिता वेगळी असते. कार्यक्रम पत्रिकेतील घटकांनुसार कार्यक्रम पुढे जात असतो. सूत्रसंचालकाला कार्यक्रम पत्रिकेमुळे कार्यक्रमाची मांडणी, गुंफण करणे सोपे जाते.

कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकाला त्याचे निवेदन करताना मार्गदर्शक ठरते. कोणता भाग झाल्यावर पुढे काय करायचे याची दिशा देण्याचे काम सोपे होते. दोन भाग, कार्यक्रम जोडण्याची संधी सूत्रसंचालकाला मिळते. कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार कार्यक्रम पुढे-पुढे नेता येत असल्याने सूत्रसंचालकाला फार मेहनत घ्यावी लागत नाही. थोडक्यात कार्यक्रम पत्रिका ही सूत्रसंचालकासाठी मार्गदर्शक व दिशादर्शक असते.

कार्यक्रम पत्रिका नसेल तर सूत्रसंचालकाला सूत्रसंचालन करणे अवघड होईल. कार्यक्रम पत्रिकेशिवाय कार्यक्रम पुढे कसा न्यायचा? कशानंतर काय? अशी संदिग्धता सूत्रसंचालकाच्या मनात निर्माण होऊन ऐनवेळी कार्यक्रमात गोंधळ होऊ शकतो हे टाळण्यासाठी सूत्रसंचालकाच्या हाती कार्यक्रम पत्रिका असणे गरजेचे आहे. म्हणून कार्यक्रम पत्रिका ही कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते.

विशेष म्हणजे सूत्रसंचालन करणाऱ्या सूत्रसंचालकाने संबंधित कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करणे अभिप्रेत असते. त्यामुळे तो संपूर्ण कार्यक्रम सूत्रसंचालकाला समजणे सापे जोते.

प्रश्न 4.
‘सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते’, या विधानाची सत्यता पटवून दया.
उत्तरः

कोणत्याही कार्यक्रमाची यशस्विता ही त्याच्या पूर्वतयारीवर अवलंबून असते. सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तर उत्तम सूत्रसंचालन होऊ शकते. सूत्रसंचालकाला पूर्वतयारी करताना चौफेर वाचन करायला हवे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत सर्वच क्षेत्रांची माहिती असली तर चांगली तयारी करून सूत्रसंचालनात आपली छाप पाडता येते. पूर्वतयारी नसेल, त्या त्या क्षेत्राची माहिती नसेल तर सूत्रसंचालन प्रभावी होणार नाही. पूर्वतयारी करताना कवितेच्या ओळी, अवतरणे, विनोद यांचा संग्रह सूत्रसंचालकाकडे असेल तर कार्यक्रमाच्या वेळी उपयोगी पडतो.

शब्दफेक, भाषेवर प्रचंड प्रभुत्व या सूत्रसंचालकाच्या जमेच्या बाजू आहेत. त्याची तयारी असेल, सराव असेल तर सूत्रसंचालन उत्तम होते. तयारी करताना देहबोली, सभाधीटपणा, आवाजाची लय, श्वासावर नियंत्रण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे लागते. वेगवेगळ्या वाहिन्यांवरील कार्यक्रमातील सूत्रसंचालन बघून सराव करता येतो. आपल्यातील त्रुटी, उणीवा दूर करता येतात. या सर्व गोष्टी एका दिवसात आत्मसात करता येत नाहीत. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सूत्रसंचालनात ध्वनिवर्धकाचा उत्तम सराव करावा लागतो. ध्वनिवर्धक किती अंतरावर असावा.

आवाजातील चढ उतार, लय यांचा अभ्यास करून तयारी केली तर एकूण चांगला परिणाम साधता येतो. थोडक्यात कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी कार्यक्रमाचे स्वरूप, विषय, श्रोता, ठिकाण या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून पूर्वतयारी केली तर कार्यक्रमात अतिशय प्रभावी व उठावदार सूत्रसंचालन करता येते.

प्रकल्प.

प्रश्न 1.
कनिष्ठ महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या कविकट्ट्यासाठी सूत्रसंचालनाची संहिता तयार करून सादरीकरण करा.
उत्तरः

प्रकल्प विदयार्थ्यांनी स्वतः करा.

Additional Important Questions and Answers

कृती : २ आकलन कृती

1. खालील उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न अ.
पुढील आकृतिबंध तयार करा.


उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.1 सूत्रसंचालन 2

सूत्रसंचालन : एक वलयांकित ………………………………….. सामान्यज्ञान अदययावत राहते. (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.८९)

प्रश्न आ.

उत्तरः

प्रश्न इ.
कारण लिहा.

अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण ….
उत्तरः
अनेक युवक-युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे कारण काही अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवत आहेत.

प्रश्न ई.

उत्तरः

स्वमत :

प्रश्न  1.
“सूत्रसंचालन – एक वलयांकित व्यवसाय’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः

आज युवक-युवती यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. बदलत्या काळाची पाऊले ओळखून अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. मळलेल्या वाटा सोडून नवनवीन क्षेत्रे आज युवक-युवतींना खुणावत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या प्रत्येक कार्यक्रमासाठी सूत्रसंचालकाची आवश्यकता असते. या कार्यक्रमांतून सूत्रसंचालकाला चांगले मानधन तर मिळतेच पण त्याचबरोबर स्वत:ची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होते.

सार्वजनिक कार्यक्रमाबरोबरच आज दूरचित्रवाणीवर विविध कार्यक्रम सादर होतात. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रम, रिअॅलिटी शो, पुरस्कार प्रदान सोहळे इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या सादरीकरणात सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. किंबहुना काही कार्यक्रम सूत्रसंचालकाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले आहेत. पूर्वीच्या काळी सूत्रसंचालन केवळ छंद, हौस, आवड म्हणून केले जाई.

पण आज सूत्रसंचालन केवळ छंद न राहता तो एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. पूर्ण वेळ सूत्रसंचालन करणाऱ्या अनेक सूत्रसंचालकांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज अनेक अभिनेते आणि अभिनेत्री उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून वेगळा ठसा उमटवित आहेत. थोडक्यात सूत्रसंचालन हा एक वलयांकित व्यवसाय झाला आहे. या व्यवसायातून अनेकांना प्रतिष्ठा, सन्मान व उत्तम करिअरचा मार्ग खुला झाला आहे.

स्वाध्यायासाठी कृती खालील कृती करा.

(१) खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण व श्रवण कौशल्ये कशी विकसित करता येतील ते लिहा.

  • व्याख्याने, मुलाखती आस्वाद
  • शक्तीस्थळे, त्रुटी, अभ्यास
  • दूरचित्रवाणी
  • आकाशवाणी कार्यक्रम
  • नामवंत सूत्रसंचालक शैली
  • यु ट्यूब
  • स्वत:ची निवेदन शैली

(२) उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक बाबी तुमच्या शब्दात लिहा.
(३) ‘राष्ट्रीय साक्षरता दिन” निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेची कार्यक्रम पत्रिका तयार करा.
(४) प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाने कोणती पथ्ये पाळावीत स्पष्ट करा.

कृती-१. सरावासाठी काही कार्यक्रम पत्रिका नमुने.

शिक्षकदिन समारंभ

  • पूर्वकथन
  • दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यान
  • मान्यवरांचे मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ

  • पूर्वकथन
  • पाहुण्यांचा परिचय व स्वागत
  • प्रास्ताविक
  • गुणवंत विदयार्थी सत्कार
  • मनोगत
    • गुणवंत विदयार्थी
      १ ……………….., २ ………………..
    • मान्यवर मनोगत
      १ ……………….., २ ………………..
  • प्रमुख अतिथी मनोगत
  • अध्यक्षीय मनोगत
  • आभार प्रदर्शन

कृती-२.

प्रश्न 1.
‘गुरुपौर्णिमा’ या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचा नमुना तयार करा.
उत्तरः

महाविदयालयात संपन्न झालेल्या ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालन नमुना पुढीलप्रमाणे –

कार्यक्रमपत्रिका

सूत्रसंचालकाचे निवेदन

मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन

सुस्वागतम्! सुस्वागतम् !
………….. एज्युकेशन संस्थेचे, नूतन कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविदयालयात आज गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व आपल्याला शिकवणाऱ्या सर्व गुरुजनांचे मी, (स्वतःचे नाव ………………………..) मन:पूर्वक स्वागत करतो/करते.
विदयार्थी मित्र, मैत्रिणींनो आज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या दिवसालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
महर्षी वेदव्यास यांना आदयगुरु म्हणून संबोधले जाते. वेदांची सूत्रबद्ध विभागणी, ब्रम्हसूत्रे व महाभारत ग्रंथाचे लेखन महर्षी व्यासांनी केले. महान, ज्ञानी व्यासमुनींना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा एक महत्त्वपूर्ण दिवस.
आपले आई-वडील हे आपले आयगुरु. बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. शालेय जीवनापासून आपले शिक्षक आपल्याला ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. 

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवतुल्य मानले आहे. ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’, ‘आचार्य देवो भव’ चा संस्कार आपल्या मनावर आहे. म्हणूनच कार्यक्रमाच्या प्रारंभी देवरूपातल्या गुरुंची सर्वजण मिळून प्रार्थना करूया.
गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु
 साक्षात् परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः।।
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन करून पुन:श्च एकवार उपस्थित सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया.

अध्यक्षीय सूचना

कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना मांडत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी (GS) ………………………..

अनुमोदन

अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन देत आहे आपल्या कनिष्ठ महाविदयालयाची विदयार्थिनी प्रतिनिधी (LR) कु. ………………………..

गुरुंना मानवंदना

आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सन्माननीय जगदीश खेबुडकरांच्या लेखणीतून साकारलेले, प्रभाकर जोग यांनी संगीत साज चढविलेले, अनुराधा पौडवाल व सुधीर फडके यांनी गायलेले ‘कैवारी’ चित्रपटातील एक अजरामर गीत.
“गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” आपल्या गुरुजनांना गीतरूपात मानवंदना देत आहेत इ. ११वी विज्ञान वर्गातील विदयार्थीनी, कु. …………., कु. …………., कु. …………., कु.
ज्ञानरूपातला हा वारसा समर्थपणे मला, तुम्हाला नव्हे आपल्या सर्वांना पुढे चालवायचा आहे. ज्ञानसंपन्न होऊन राष्ट्राच्या प्रगतीत आपल्यालाही खारीचा वाटा उचलायचा आहे.

प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन

आजच्या कार्यक्रमाचे तथा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे, कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्मा. संजयजी थोरात सर व व्यासपीठावरील इतर मान्यवर यांना विनंती आहे की, विदयेची देवता सरस्वती व महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून, दीपप्रज्ज्वलन करावे.
धन्यवाद सर! 
अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. ‘गुरु बिन कौन बताये बाट, बड़ा विकट यमघाट’ अशा परिस्थितीत योग्य रस्ता दाखवण्याचे काम आपले गुरुजन, प्राध्यापक करीत असतात.

स्वागत व प्रास्ताविक

व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य सन्माननीय संजयजी थोरात सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर.
भारतीय संस्कृतीतील गुरुपरंपरा आपण आम्हास ज्ञात करून दिली. एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

मान्यवरांचा व गुरुजनांचा सत्कार

….संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांचा सत्कार महाविदयालयाचे प्राचार्य संजयजी थोरात सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय अशोकराव कडलग यांचा सत्कार उपप्राचार्य शिंदे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
महाविदयालयाचे प्राचार्य माननीय संजयजी थोरात सरांचा सत्कार कनिष्ठ महाविदयालयाचा जनरल सेक्रेटरी संदीप पाटील याने करावा अशी मी त्यास विनंती करतो.
विदयार्थी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व्यासपीठावर व विदयार्थ्यांमध्ये बसलेल्या गुरुवर्यांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन जागेवर जाऊन करावा अशी सर्वांना विनंती आहे.

मनोगत

कनिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. शिंदे सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर!
पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा प्रकाश. गुरु वा शिक्षक आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश दाखवून परिपूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न करतात हेच खरे.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब शेटे यांना विनंती आहे की, त्यांनी आम्हांस मार्गदर्शन करावे. धन्यवाद अध्यक्ष साहेब! 

जीवनातील गुरुंचे, शिक्षकांचे महत्त्व आपण अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. माऊली ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सद्गुरु सारीखा असता पाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी’ संसारसागरातून तरून जाण्याचा मार्ग सद्गुरू दाखवतात तर आपले शिक्षक, प्राध्यापक ज्ञानसागर तरून जाण्याचा, योग्य ज्ञानाचा मार्ग दाखवतात हेच खरे!

आभार प्रदर्शन

आभाराचे भार कशाला
सत्काराचे हार कशाला
हृदयामध्ये घर बांधूया
त्या घराला दार कशाला
मनात राहू परस्परांच्या
तिसऱ्याचा आधार कशाला :-
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. वाकचौरे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो.

पसायदान

कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने होत आहे. पसायदानासाठी सर्वांनी हात जोडून बसावे.
सूचना : यानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे कोणतेही तास होणार नाहीत. उदया नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार वर्गांचे तास होतील.
धन्यवाद! जय महाराष्ट्र!!!

सूत्रसंचालन प्रास्ताविक:

जिथे जिथे श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम सादर केला जातो तेथे तेथे सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका असते. आजच्या युगात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांची नेटकेपणाने व सुव्यवस्थितपणे मांडणी करणे आवश्यक असते.

उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची उंची वाढून तो श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. कोणत्याही कार्यक्रमाचा आलेख चढता ठेवण्यासाठी सूत्रसंचालक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. ‘नियोजित कार्यक्रमात प्रेक्षकांपुढे सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी मधूनमधून क्रमश: केलेले निवेदन म्हणजे सूत्रसंचालन होय.’ एखादा नियोजित कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने व कुठेही तुटकपणा न जाणवता सलगपणे शिस्तबद्धतेने पूर्ण करणे हे खरे सूत्रसंचालकाचे कौशल्य असते.

प्रत्येक कार्यक्रमात खर तर सूत्रसंचालक हा दुवा असतो दोन घटकांना जोडणारा. कार्यक्रमाचे स्वरूप, वक्ते, व्याख्याने, कलावंत या सर्वांना एका धाग्यात गुंफण्याचे काम सूत्रसंचालक करत असतो. पण अनेकदा एखादा कार्यक्रम यशस्वी होतो तो मुख्य कार्यक्रमाबरोबरच सूत्रसंचालकाच्या अप्रतिम निवेदनाने आणि सादरीकरणाने. कधी कधी कार्यक्रमापेक्षा सूत्रसंचालकच त्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरत असतो तो त्याच्या प्रतिभेने.

  • सूत्रसंचालन ही कला आहे तसेच शास्त्रही आहे. कार्यक्रमाचे स्वरूप, क्रम, औपचारिकता, श्रोत्यांचा वयोगट, कार्यक्रमाचे रसग्रहण या दृष्टीने सूत्रसंचालन हे शास्त्र आहे.
  • सूत्रसंचालकाच्या शब्दोच्चारात स्पष्टता अधिकाधिक हवी. आवाजातील आरोह – अवरोहाने शब्दांतील भाव – भावनांचा अचूक परिणाम साधला जातो. कार्यक्रमात स्वत: न गुंतता श्रोत्यांना कार्यक्रमात रंगवून कार्यक्रम पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य सूत्रसंचालकात असावे.
  • केवळ कार्यक्रमाचे स्वरूप, व्यक्तींचा उल्लेख करून कार्यक्रम पुढे न नेता अतिशय प्रभावी, अल्प प्रस्तावनेतून वक्ता, कलावंत यांना सादरीकरणासाठी प्रेरणा देणे. त्यांना प्रोत्साहित करून कार्यक्रम खुलविणे हे सूत्रसंचालकाचे खरे कौशल्य असते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : वेगवेगळ्या क्षेत्रांत श्रोत्यांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची असते. सभा, संमेलनांपुरते मर्यादित असणारे सूत्रसंचालनाचे क्षेत्र आज व्यापक स्वरूपात, विविध कार्यक्रमांत दिसून येते. स्नेहसंमेलने, परिसंवाद, मेळावे, बैठका, पारितोषिक वितरण, नाट्यसंमेलन, ग्रंथप्रकाशन, वाढदिवस इ. कार्यक्रमात सूत्रसंचालन आवश्यक झालेले दिसून येते.

सूत्रसंचालनाची क्षेत्रे : सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, शासकीय, कौटुंबिक, व्यवसाय, धार्मिक, आरोग्य, क्रीडा, कला संगीतविषयक, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी. सूत्रसंचालनाचे कार्यक्रम : चर्चासत्रे, संमेलने, संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, निरोप समारंभ, वाढदिवस, वर्धापनदिन, विवाह सोहळे, परिसंवाद, कार्यशाळा, उद्घाटन समारंभ, गौरव समारंभ, मेळावे, जयंती, स्मृतिदिन, स्पर्धा, काव्यमैफील.

‘सूत्रसंचालन : एक वलयांकित व्यवसाय’ : छंद किंवा हौस म्हणून सूत्रसंचालन करता करता अनेक निवेदक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. उत्तम सूत्रसंचालन करता करता त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. अनेक कलावंत उत्कृष्ट निवेदन करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अनेकांसाठी उत्तम व्यवसाय व रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झाले आहे.

सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी : उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी श्रवण, वाचन, चिंतनशीलता, सराव यांची आवश्यकता असते.

वाचन : सूत्रसंचालकाचे वाचन चौफेर हवे. वर्तमानपत्रे, कथा, कादंबरी, काव्य, नाटक ललित, नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे यांच्या वाचनातून शब्दसंग्रह व वाक्याची जुळणी सहजपणे करता येते. वाचन करताना महत्त्वाचे प्रसंग, सुवचने, किस्से यांची टिपणे काढावीत. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू भाषेतील काव्यपंक्ती, शेरोशायरी यांचा संग्रह करून आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करावा. त्यांच्या वापराने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुलविता येते.

श्रवण आणि निरीक्षण : सूत्रसंचालन करण्यापूर्वी सूत्रसंचालकाने विविध क्षेत्रांतील सूत्रसंचालनाचे कार्यक्रम पहावेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करावा. आकाशवाणी, दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांतील सूत्रसंचालन मार्गदर्शक ठरत असते, त्यांचा अभ्यास करावा. प्रभावी निवेदक, सूत्रसंचालक यांच्या कार्यक्रमाच्या निरीक्षणातून त्यांची शैली, आत्मविश्वास, सहजता, शब्दफेक, प्रसांगावधान, सभाधीटपणा ही कौशल्ये सूत्रसंचालकाला शिकता येतात.

आवाजाची जोपासना : सूत्रसंचालकाचा आवाज हा भारदस्त असावा. प्रकट वाचन, पठन, अभिवाचन, कविता वाचन यांमधून उच्चारातील स्पष्टता, आवाजातील आरोह-अवरोह यांचा सराव करावा. आवाजाची ताकद हीच सूत्रसंचालकाची जमेची बाजू असते. त्यासाठी योग आणि प्राणायाम यांचा उपयोग होतो.

ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव : सूत्रसंचालन करताना ध्वनिवर्धकाचा सराव असावा. कार्यक्रम सभागृह किंवा खुले मैदान यांत असेल तर आवाजाचे स्वरूप बदलावे लागते. त्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्यात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यास सूत्रसंचालक म्हणून प्रभुत्व मिळविता येते.

सूत्रसंचालन करण्यापूर्वीची तयारी :

  • कार्यक्रमाचा विषय, वेळ, स्थळ, स्वरूप, अध्यक्ष, अतिथी, श्रोता, कलावंत इत्यादींबाबत सविस्तर माहिती मिळवावी.
  • कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.
  • कार्यक्रमाचा श्रोतृवर्ग, त्यांची आवड, वयोगट यांचा अभ्यास करावा
  • निवेदनाची तयारी करावी. काव्यपंक्ती, संदर्भ, अवतरणे सुभाषिते, चुटके यांचा वापर करावा पण त्यांचा अतिरेक नको.

सूत्रसंचालन करताना घ्यावयाची काळजी :

  • कार्यक्रमाच्या आरंभी सर्वांना अभिवादन करून श्रोत्यांना कार्यक्रमाकडे आकर्षित करावे.
  • व्यासपीठावर सर्व अतिथींचा योग्य पदानुसार आदरपूर्वक नामोल्लेख करावा.
  • निवेदनात सहजता, स्पष्ट उच्चार, आवाजातील चढ-उतार, आत्मविश्वास, प्रभावी निवेदन शैली असावी.
  • समयसूचकता, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान असावे.
  • भाषा साधी, सोपी, प्रवाही असावी.
  • निवेदनात पाल्हाळ नसावे तसेच त्यात अनावश्यक हालचाली नसाव्यात.
  • आत्मप्रौढी टाळावी, वाक्ये, शब्दांची पुनरुक्ती नको.
  • एखादया त्रुटीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी.
  • वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये.

उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी वाचन, चिंतन, निरीक्षण, सराव, आत्मविश्वास यांची आवश्यकता असते. चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, आवड यांतून सूत्रसंचालन फुलविता येते.