Chapter 15 निरोप(कविता)

Day
Night

Chapter 15 निरोप(कविता)

Textbook Questions and Answers

1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:

प्रश्न (अ)
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण
1. मुलाचा वाढदिवस आहे.
2. तो रणांगणावर जाणार आहे.
3. त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे.
4. त्याने क्रीडास्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे.
उत्तर:
कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करते आहे; कारण तो रणांगणावर जाणार आहे.

2. खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:

प्रश्न (अ)
खालील शब्दांतून सूचित होणारा अर्थ लिहा:
अशुभाची साउली.
उत्तर:
अशुभाची साउली: शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात, तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते. लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील, याचा नेम नसतो. या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजे वाईट छाया असे म्हटले आहे.

प्रश्न (आ)
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण.
उत्तर:
पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण: रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे, म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात. इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा, अशी मनापासून इच्छा आहे. म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून ‘पंचप्राणांच्या ज्योतींचे औक्षण’ असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे.

3. कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:

प्रश्न 1.
कवितेच्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा:


उत्तर:

कवितेचा विषय

कवितेची भाषा

कवितेतील पात्रे

कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती

आईने व्यक्त केलेली इच्छा

रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे.

ओजस्वी

आई व मुलगा

जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज

विजयी होऊन आलास
की माझ्या हाताने दूधभात भरवीन.

4. काव्यसौंदर्य:

प्रश्न (अ)
‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी,’ या काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला धीराने निरोप देताना आई म्हणते – तुझ्यावर अशुभाची सावली पडणार नाही. तू लढताना श्रीछत्रपती शिवरायांचा पराक्रम आठव. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर. शिवरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानीमातेने आशीर्वाद दिला होता, तशीच तुझ्या शस्त्रांना-अस्त्रांना भवानीमाता शक्ती देईल. बाळाला निरोप देताना विकल न होणाऱ्या वीरमातेचे दर्शन व तिची मनोकामना या ओळींतून व्यक्त होते.

प्रश्न (आ)
‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन,’ या काव्यपंक्तींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही. तिला स्वत:च्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे. ती महाराष्ट्रकन्या आहे. वीरमाता आहे. काही अशुभ घडणार नाही, याची तिला खात्री आहे. शिवरायांचे स्वरूप आठवून झुंज दे व भवानीमातेचा वरदहस्त तुझ्यावर आहे, हे मनात ठसव, अशी ती निर्धाराने सांगते. आपला बाळ विजयी होऊन घरी नक्की पोहोचेल. तो विजयी होऊन येईल तेव्हा आईला आपण बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल. मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दूधभात भरवायची तशी आताही भरवील. आईची बाळाच्या कर्तृत्वावर असलेली खात्री आणि शाश्वत निरंतर माया या ओळींतून दिसून येते.

5. अभिव्यक्ति:

प्रश्न (अ)
कवितेतील वीरमातेच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई, ही सामान्य आई नाही. ती वीरमाता आहे. ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते. पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते. ती बाळाला म्हणते – तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वतंत्रतेचे रक्षण तुला करायचे आहे. तुझ्या खांदयावर भविष्यातील सुखशांती विसावलेली आहे. माझ्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत की गळ्यात हुंदकाही दाटणार नाही.

मी वीरांचा धर्म जाणणारी महाराष्ट्रकन्या आहे. मला जिजाई व राणी लक्ष्मीबाईंचा वारसा लाभला आहे. मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. तुझ्यावर कोणत्याही संकटाची सावलीदेखील पडणार नाही. तू शिवरायांचे कर्तृत्व स्मर. माय भवानी तुला शक्ती देईल. विजयी होऊन ये, मग मला तुला जन्म दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. माझ्या हातांनी माझ्या बाळाला मी दूधभात भरवीन. हिंमत, ठाम निर्धार व माया यांचे दर्शन वीरमातेच्या बोलण्यातून व्यक्त झाले आहे.

प्रश्न (आ)
‘भारतभू ही वीरांची भूमी आहे,’ याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर:
भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. रामायण-महाभारत काळापासून याची साक्ष आपणांस मिळते. दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत. या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली; पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले. बलाढ्य इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी । दिलेला लढा अद्वितीय असाच आहे. अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे.

उपक्रम:

प्रश्न 1.
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.

भाषा सौंदर्य:

मुलींची कन्याशाळा, केसांची हेअरस्टाइल, ठंडा कोल्ड्रिंक, वटवृक्षाच्या झाडाखाली, शब्दाखाली अधोरेखित, हाय वे रोड, रायटिंगमध्ये लिहून दया, शेवटी एन्ड मस्त केलाय, पिवळा पितांबर.

शब्दांच्या या रचनेची ही गंमत पाहा. खरं म्हणजे भाषिकदृष्ट्या व अर्थाच्या दृष्टीने ही रचना चुकीची आहे; परंतु आपण बोलताना सहजगत्या अशा चुका वारंवार करतो. इतर भाषांच्या प्रभावामुळे हे असे घडत असले, तरी बोलण्यातील भाषिक चुका आपण लक्षात घ्यायलाच हव्यात. आमच्या घरी वर्तमानपत्र दररोज येते अशा वक्तव्याला एखादी मुलगी सहजपणे आमच्याही घरी मासिक/साप्ताहिक रोज येते, असे म्हणते तेव्हा नक्कीच हशा पिकणार.

अशा विविध रचनांतील चुका लक्षात घेऊन टाळण्याची सवय आपण आपल्याला लावून घेतली तर सुयोग्य भाषिक रचनेचा वापर आपण बोलताना करू शकतो.

Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती 1 : (आकलन)

प्रश्न 1.

उत्तर:

प्रश्न 2.

उत्तर:

प्रश्न 3.

उत्तर:

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.

अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
जिजा-लक्षुमींशी नाते.

याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांदयावरी या विसावे
शांति उदयाच्या जगाची.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.

धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!

नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

कृती 2 : (आकलन)

प्रश्न 1.
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी
1. पाय
2. डोळे
3. हात
4. कान.
उत्तर:
स्वतंत्रता राखणारे बाळाचे विक्रमी हात.

प्रश्न 2.
बाळाच्या खांदयावर विसावणारी ………………………..
1. उदयाच्या जगाची क्रांती.
2. भविष्यातील जगाची शांती.
3. आजच्या जगाची शांती.
4. आजची क्रांती.
उत्तर:
बाळाच्या खांदयावर विसावणारी भविष्यातील जगाची शांती.

2. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.

 1. शस्त्रांना शक्ती देणारी – [ ]
 2. आई स्वत:ला याची कन्या समजते – [ ]
 3. आईने धार लावून ठेवलेली – [ ]
 4. बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे – [ ]

उत्तर:

 1. भवानीमाता
 2. महाराष्ट्रकन्या
 3. तलवार
 4. शिवरायांचे

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
बाळ चाललास रणा घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी तुज करिते औक्षण
उत्तर:
सीमेवर लढावयास जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आई म्हणते-बाळा, तू रणांगणात लढायला चालला आहेस. या शुभकार्याच्या वेळी मी आनंदाने घराला तोरण बांधते आहे. माझ्या पंचप्राणांच्या उजळलेल्या ज्योतींनी मी तुला ओवाळते आहे.

कृती 4 : (विचारसौंदर्य | भावसौंदर्य / अर्थसौंदर्य / रस)

1. पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – निरोप.
उत्तर:
निरोप
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → मराठीतील प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता आहे.
2. कवितेचा विषय → रणांगणावर जाणाऱ्या मुलाला युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या वीरमाउलीच्या मनातल्या विविध भावनांचे चित्रण करणे, हा या कवितेचा विषय आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

 1. घर = सदन
 2. औक्षण = ओवाळणी
 3. बाहू = हात
 4. डोळा = नेत्र
 5. मुख = तोंड
 6. सावली = छाया
 7. शक्ती = बळ
 8. हात = हस्त.

4. कवितेतून मिळणारा संदेश → वीरमातेच्या मनोगतातून कवयित्रींना मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे. तसेच मातेचे मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, याची ग्वाही देणारी ही कविता आहे.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → देशरक्षणासाठी मुलाला रणात पाठवणाऱ्या वीरमातेचे दृढ निश्चयी व तितकेच प्रेमळ मन या कवितेत प्रकर्षाने दृष्टीस पडते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ:
धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!
→ रणात चाललेल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते-तू माझ्यापोटी जन्मलास ती माझी कूस तू कृतार्थ कर. तू विजयी होऊन आलास की माझ्या हातांनी अगदी मायेने मी तुला दूधभात भरवीन.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → रणांगणावर जाणाऱ्या पुत्राला निरोप देणाऱ्या आईचे गलबललेले मन व तेवढीच तिच्या मनाची कणखरता याचे मनोज्ञ दर्शन या कवितेत कवयित्रिंनी केले आहे. तसेच श्रीशिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यास सांगून आपणही महाराष्ट्रकन्येचा वारसा चालवत आहोत, असे ठामपणे सांगणाऱ्या आईच्या मनःस्थितीचे यथार्थ चित्रण या कवितेत केले असल्यामुळे, मनात आर्तता व वीरता जागवणारी ही कविता मला अत्यंत आवडली.

1. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन!’
उत्तर:
आशयसौंदर्य: रणांगणावर शत्रूशी लढायला जाणाऱ्या आपल्या मुलामध्ये वीरश्री जागृत करणाऱ्या वीरमातेच्या मनातील विविध भावनांचे आर्त चित्रण कवयित्री पद्मा गोळे यांनी ‘निरोप’ या कवितेत केले आहे. वीरमाउलीच्या मनोगतातून कवयित्रींनी प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना शौर्याची शिकवण दिली आहे. तसेच आईचे वात्सल्यपूर्ण मृदू हृदय प्रसंगी किती कणखर असते, या आशयाचीही अभिव्यक्ती केली आहे.

काव्यसौंदर्य: युद्धाला निघालेल्या आपल्या बाळाचे औक्षण करताना व त्याची वीरश्री जागृत करताना त्याला गतकालीन वीरांचे व महाराष्ट्रकन्यांचे स्मरण देते. या उज्ज्वल परंपरेचा तू पाईक आहेस. तुझ्या शस्त्रांना भवानीमाय शक्ती देईल, अशा भावपूर्ण उद्गाराने बाळाची आई त्याचे मन ओजस्वी करते. शेवटी माउली म्हणते – तू विजयी होऊन ये. माझ्यापोटी तू जन्म घेतलास याची धन्यता मला वाटेल; त्या वेळी मी प्रेमाने माझ्या हाताने तुला दूधभात भरवीन. प्रस्तुत है ओळींमध्ये वीरश्री व ममता यांचा अनोखा संगम आपल्या प्रत्ययास येतो.

भाषिक वैशिष्ट्ये: प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असलेल्या या कवितेचा अष्टाक्षरी छंद हा वीरमातेच्या भावना यथार्थपणे प्रकट करण्यास पूरक ठरला आहे. या कवितेची रचना यमकप्रधान असून, त्यामुळे या कवितेतून गेयता व नादानुकूलता दिसून येते. शब्दकळा वीररसात्मक असल्यामुळे या कवितेत वीररसाला प्राधान्य आहे. शेवटच्या कडव्यात आईची ममता व वात्सल्य ओतप्रोत भरले आहे. भावनांची आंदोलने टिपणारी ओजस्वी भाषा कवितेला लाभली आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले शब्द अभ्यासा.

1. समास:

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा आणि समासाचे नाव लिहा:

 1. पंचप्राण
 2. महाराष्ट्र
 3. रणांगण
 4. दूधभात.

उत्तर:

 1. पंचप्राण : पाच प्राणांचा समूह -द्विगू.
 2. महाराष्ट्र : महान असे राष्ट्र-कर्मधारय.
 3. रणांगण : रण हेच अंगण-कर्मधारय.
 4. दूधभात : दूध आणि भात -इतरेतर द्वंद्व.

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

 1. सावली
 2. दुःख
 3. स्वतंत्रता
 4. विजय.

उत्तर:

 1. सावली × ऊन
 2. दुःख × सुख
 3. स्वतंत्रता × परतंत्रता
 4. विजय × पराजय.

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा: (उत्तरे ठळक अक्षरांत दिलेली आहेत.)
उत्तर:

एकवचन

हुंदका

ज्योत

शस्त्र

डोळा

अनेकवचन

हुंदके

ज्योती

शस्त्रे

डोळे

प्रश्न 3.
पुढील शब्दांपासून तयार होणारे चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
1. चाललास
2. तलवारीला.
उत्तर:
1. चाललास – चाल, लस, सल, लाल.
2. तलवारीला – तरी, वारी, वाल, रीत.

2. लेखननियम:

प्रश्न 1.
पुढील अशुद्ध शब्द लेखननियमानुसार शुद्ध लिहा:

 1. ओक्षन
 2. वीक्रमि
 3. स्वरुप
 4. वीजयि.

उत्तर:

 1. औक्षण
 2. विक्रमी
 3. स्वरूप
 4. विजयी.

3. पारिभाषिक शब्द:

प्रश्न 1.
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:

 1. Lyric
 2. Action
 3. Exchange
 4. Exhibition.

उत्तर:

 1. भावगीत
 2. कार्यवाही
 3. देवाण-घेवाण
 4. प्रदर्शन.

Summary in Marathi

कवितेचा आशय:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या सैनिक मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवयित्रींनी ओजस्वी शब्दांत घडवले आहे.

शब्दार्थ:

 1. रणा – रणांगणात.
 2. तोरण – शुभपताकांची माळ.
 3. विक्रमी – पराक्रमी.
 4. बाहू – हात.
 5. राखायची – रक्षण करायची.
 6. विसावे – विश्रांती घेते, थांबते.
 7. जाणते – उमगते, समजते.
 8. हुंदका – गहिवर.
 9. मुखावाटे – तोंडातून.
 10. अशुभ – वाईट गोष्ट.
 11. साउली – सावली.
 12. माझिया – माझ्या.

टिपा:

 1. औक्षण – पंचारतीने ओवाळणे.
 2. महाराष्ट्रकन्या – महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता, पराक्रमी स्त्रिया.
 3. जिजा – शिवछत्रपतींची आई, जिजामाता.
 4. लक्षुमी – झाशीची राणी लक्ष्मीबाई.
 5. भवानी – श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत, भवानीमाता.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ:

 1. निरोप देणे – जाण्यासाठी परवानगी देणे.
 2. अशुभाची सावली पडणे – विपरीत घडणे, अमंगल घडणे.
 3. कूस धन्य करणे – जन्म सार्थकी लागणे.

कवितेचा भावार्थ:

सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई म्हणते – बाळा, तू रणांगणावर चालला आहेस हा शुभशकुन आहे. मी आनंदाने घराला तोरण लावते आहे. माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करते आहे. तुझे शुभ चिंतते आहे. तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तुझ्या बळकट खांदयांवर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तुझ्या पराक्रमाने तू उदयाच्या जगाचा शांतिदूत ठरणार आहेस. म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही. माझे डोळे आसवांनी ओथंबले नाहीत. मी सुद्धा महाराष्ट्रकन्या आहे. मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे. वीरमातेचा वारसा माझ्याकडे आहे.

तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून हुंदका फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला (शस्त्राला) धार मीच लावून ठेवली आहे. (संगीन मी स्वतः तुझ्या हाती सोपवली आहे.)

अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही. वीरमाता जिजाई आणि झाशीची लढवय्यी राणी लक्ष्मीबाई यांच्याशी माझे नाते आहे. तुझ्या शस्त्रांना (बंदुकांना) अस्त्रांना माय भवानी उदंड शक्ती देईल. भवानीमातेचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. रणांगणावर लढताना तू श्रीछत्रपती शिवाजी महारांजाच्या पराक्रमाचे स्मरण कर. विजयी होऊन ये नि माझ्यापोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल. तू आलास की माझ्या हातांनी प्रेमाने मी तुला दूधभात भरवीन.