Chapter 16 आकाशी झेप घे रे (कविता)
Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
योग्य पर्याय ओळखा.
(अ) सुखलोलुप झाली काया म्हणजे …………………………………
(१) सुखाचा तिरस्कार वाटतो.
(२) सुखाबद्दल प्रेम वाटते.
(३) सुखाचे आकर्षण वाटते.
(४) सुख उपभोगण्याची सवय लागते.
उत्तर:
सुखलोलुप झाली काया म्हणजे – सुख उपभोगण्याची सवय लागते.
(आ) पिंजरा सोडून झेप घेतल्याने …………………………………
(१) काया सुखलोलुप होते.
(२) पाखराला आनंद होतो.
(३) आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
(४) आकाशाची प्राप्ती होते.
उत्तर:
पिंजरा सोडून झेप घेतल्याने – आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.
प्रश्न 2.
तुलना करा.
पिंजऱ्यातील पोपट – पिंजऱ्याबाहेरील पोपट पिंजरा
उत्तर:
पिंजऱ्यातील पोपट – पिंजऱ्याबाहेरील पोपट
(i) पारतंत्र्यात राहतो – स्वातंत्र्य उपभोगतो
(ii) लौकिक सुखात रमतो – स्वबळाने संचार करतो
(iii) कष्टाविण राहतो – कष्टात आनंद घेतो
(iv) जीव कावराबावरा होतो – सुंदर जीवन जगतो।
(v) मनात खंत करतो – मन प्रफुल्लित होते
प्रश्न 3.
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
उत्तर:
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने
प्रश्न 4.
कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा.
उत्तर:
(i) तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.
(ii) कष्टाविण फळ मिळत नाही.
प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
(आ) ‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
उत्तर:
‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे.
प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते, म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.
(इ) ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे. हे विधान स्पष्ट करा.
उत्तर:
जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।’ अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वत:च्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. ‘रयत शिक्षण संस्था’ निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.
(ई) ‘घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर:
कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. ‘दे रे हरी। खाटल्यावरी।’ असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वत:चा अनुभव सांगतो – ‘मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते. मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले. ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला ‘घर प्रसन्नतेने नटल्याचा व घामातुन मोती फुलले’ या विधानाचा अर्थ कळला.
Additional Important Questions and Answers
कृति
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…
प्रश्न. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
कृती १: (आकलन)
प्रश्न 1.
(i) देवाने पंख दिल्यामुळे – …………………………..
(१) हृदयात व्यथा जळते.
(२) जीव बिचारा होतो.
(३) सोन्याचा पिंजरा मिळतो.
(४) शक्तीने संचार करता येतो.
उत्तर:
देवाने पंख दिल्यामुळे – शक्तीने संचार करता येतो.
प्रश्न 2.
पुढील क्रियापदांपुढे कोठे, कोण, काय ते लिहा:
(i) झेप घे – …………………………..
(ii) सोडून दे – …………………………..
(iii) जळते – …………………………..
(iv) अवतरले – …………………………..
(v) नटले – …………………………..
(vi) खायला मिळते – …………………………..
उत्तर:
(i) झेप घे – आकाशात
(ii) सोडून दे – सोन्याचा पिंजरा
(iii) जळते – हृदयात व्यथा
(iv) अवतरले – श्रमदेव घरात
(v) नटले – प्रसन्नतेने घर
(vi) खायला मिळते – रसाळ फळ.
प्रश्न 3.
(i) एका किंवा दोन शब्दांत उत्तर लिहा: (सराव कृतिपत्रिका-३)
(अ) पोपटाचे राहण्याचे ठिकाण – …………………………..
(आ) पोपटाचे खादय – …………………………..
उत्तर:
(i) (अ) पोपटाचे राहण्याचे ठिकाण – पिंजरा (सोन्याचा)
(आ) पोपटाचे खादय – फळे
(ii) पुढील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा: (सराव कृतिपत्रिका-३)
‘तुज कळते परि ना वळते’
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
उत्तर:
‘तुज कळते परि ना वळते’ – एखादी गोष्ट कशी करायची हे समजते परंतु कृती करता येत नाही.
कृती २: (आकलन)
प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा: (सराव कृतिपत्रिका-३)
उत्तर:
प्रश्न 2.
पुढील गोष्टींचे परिणाम लिहा:
(i) काया होते – …………………………..
(ii) कष्ट केल्यावर – …………………………..
(iii) जीवनात येतो – …………………………..
(iv) कळते पण – …………………………..
(v) बिचारा जीव होतो – …………………………..
उत्तर:
(i) काया होते. – सुखलोलुप
(ii) कष्ट केल्यावर – फळ मिळते
(iii) जीवनात येतो – सुंदर योग
(iv) कळते पण – वळत नाही
(v) बिचारा जीव होतो – बावरा
कृती ३: (काव्यसौंदर्य)
प्रश्न 3.
“सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा” या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. (सराव कृतिपत्रिका-३)
उत्तर:
कवी जगदीश खेबुडकर यांनी ‘आकाशी झेप घे रे’ या कवितेमध्ये लौकिक गोष्टींमध्ये व नाशिवंत गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या सुखलोलुप माणसांना मोलाचा उपदेश केला आहे. कवी म्हणतात-मोह माया, पैसा, संपत्ती यांच्या लोभात माणूस गुरफटला की त्याची फसगत होते. प्रगती खुंटते. तात्पुरते हे फळ रसाळ वाटते, पण ते सुख नाशिवंत आहे. हे सुख फार काळ टिकणारे नाही. या सुखाला शरीर चटावते म्हणून यातून जागृत हो. या लौकिक सुखाचा आश्रय घेऊ नको. हा सोन्याचा पिंजरा सोडून भरारी घे, अशा प्रकारे या ओळीतून कवींनी सुखाला लालचावलेल्या माणसांना मौलिक संदेश दिला आहे.
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (आ) साठी…
प्रश्न.
पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा: कविता-आकाशी झेप घे रे.
उत्तर:
(१) प्रस्तुत कवितेचे कवी: जगदीश खेबुडकर.
(२) कवितेचा रचनाप्रकार: गीतरचना.
(३) कवितेचा काव्यसंग्रह: (एक चित्रपटगीत).
(४) कवितेचा विषय: स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.
(५) कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी) भाव: स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याचे मोल जाणत जगण्याची प्रेरणा देणारा भाव.
(६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक, तर पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक, दऱ्या-डोंगर, सरिता-सागर ही सर्व अडचणींची प्रतीके. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील, आशय थेट मनाला भिडेल, अशी ही सोपी, साधी प्रतीके कवींनी वापरली आहेत. ‘फळ रसाळ मिळते’ याप्रमाणे अनुप्रासांचा सुंदर उपयोग केलेला आहे. एकूण, ही कविता रसाळ, प्रासादिक बनली आहे.
(७) कवितेची मध्यवर्ती कल्पना: स्वत:च्या क्षमतेवर, स्वत:च्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवावा आणि त्या बळावर यशाच्या दिशेने दमदार पावले टाकीत पुढे जावे. ध्येयाकडे आपण पोहोचणारच याची मनोमन खात्री बाळगावी. तात्कालिक मोहाच्या गोष्टींमध्ये गुंतून पडू नये. स्वत:च्या मनाला मुक्त, स्वतंत्र ठेवावे. सुखलोलुपतेमध्ये मनाला अडकू देऊ नये. स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखले पाहिजे, अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे.
(८) कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसे अनेकदा दैवाच्या आहारी जातात. नशिबावर भरवसा ठेवतात. नशिबात असेल, तेच मिळेल; अधिक काहीही मिळणे शक्य नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते. कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात. त्यांच्या मते, माणसाने स्वत:चे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. कठोर परिश्रम केले, तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे.
(९) कवितेतील आवडलेली ओळ:
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
(१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे: ही कविता म्हणजे एक गाजलेले चित्रपट गीत आहे. त्याची चाल, संगीत चांगले आहे. गीत ऐकत राहावे असे वाटते. गीत दमदारपणे गायलेले आहे. ते लक्षातही राहते. मात्र एका ठिकाणी मन अडकते. अवतीभवती मोहाचा पसारा आहे; मन त्यात सहजपणे अडकते. हे सांगताना कवी म्हणतात, “तुजभवती वैभव माया/फळ रसाळ मिळते खाया.” पुढे, कष्ट केल्याशिवाय, खस्ता खाल्ल्याशिवाय फळ मिळत नाही. हे सांगताना कवी म्हणतात, “कष्टाविण फळ ना मिळते,” असे म्हटले आहे. यात काहीसा विरोध जाणवतो. हे थोडेसे खटकते.
(११) कवितेतून मिळणारा संदेश: माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे, ‘असेल हरी, तर देईल खाटल्यावरी’ असे मानू नये. नशिबाने काहीही मिळत नाही. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. तसेच, केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात, ती तात्कालिक असतात. ती चिरकाल टिकत नाहीत. आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे. त्यातच खरे सुख असते; असा संदेश ही कविता देते.
रसग्रहण
कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (इ) साठी…
प्रश्न.
पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा: ‘घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले.’
उत्तर:
आशयसौंदर्य: सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची ‘आकाशी झेप घे रे’ ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य: वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्ट्ये: ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘पिंजरा’ हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला ‘पक्षी’ म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
कर्मधारय समास
- कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे.
- कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये:
(i) कधी पहिले पद विशेषण असते.
(ii) कधी दूसरी पद विशेषण असते.
(iii) कधी दोन्ही पदे विशेषण असतात.
(iv) कधी पहिले पद उपमान असते.
उदा., कमलनयन → कमलासारखे डोळे
(v) कधी दुसरे पद उपमान असते.
उदा., बरसिंह → सिंहासारखा नर
(vi) कधी दोन्ही पदे एकरूप असतात.
उदा., विदयाधन → विदया हेच धन
१. समास:
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६२)
प्रश्न 1.
पुढील वाक्ये वाचून त्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्यांचा विग्रह करा:
उदा., तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे.
नीलकमल → नील असे कमल
(i) महाराष्ट्र राज्य समृद्ध आहे.
(ii) या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे. –
(iii) आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे.
उत्तर:
(i) महाराष्ट्र → महान असे राष्ट्र
(ii) भाषांतर → अन्य अशी भाषा (अंतर = अन्य)
(iii) पांढराशुभ्र → शुभ्र असा पांढरा
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 2.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:
(i) रक्तचंदन → ………………………….
(ii) घनश्याम → ………………………….
(iii) काव्यामृत → ………………………….
(iv) पुरुषोत्तम → ………………………….
उत्तर:
(i) रक्तचंदन → रक्तासारखे चंदन
(ii) घनश्याम → घनासारखा श्यामल
(ii) काव्यामृत → काव्य हेच अमृत
(iv) पुरुषोत्तम → उत्तम असा पुरुष
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 3.
पुढील वाक्ये वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा
व विग्रह करा: उदा., नेत्रांच्या पंचारतीनी सैनिकांना ओवाळले.
पंचारती → पाच आरत्यांचा समूह.
(i) असा माणूस त्रिभुवन शोधले तरी सापडायचा नाही.
(ii) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते.
(iii) शाळेत आता हिंदी सप्ताह चालू आहे.
उत्तर:
(i) त्रिभुवन → तीन भुवनांचा समूह.
(ii) नवरात्र → नऊ रात्रींचा समूह.
(iii) सप्ताह → सात दिवसांचा समूह (आह = दिवस).
(पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ६३)
प्रश्न 4.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:
(i) अष्टाध्यायी → ………………………….
(ii) पंचपाळे → ………………………….
(iii) द्विदल → ………………………….
(iv) बारभाई → ………………………….
(v) त्रैलोक्य → ………………………….
उत्तर:
(i) अष्टाध्यायी → आठ अध्यायांचा समूह.
(ii) पंचपाळे → पाच पाळ्यांचा समूह.
(iii) द्विदल → दोन दलांचा समूह. (दल = पान)
(iv) बारभाई → बारा भाईंचा समूह.
(v) त्रैलोक्य → तीन लोकांचा समूह.
२. अलंकार:
कृती करा: शिवप्रभू म्हणजे साक्षात तळपती तलवार होय.
उपमेय → [ ] उपमान → [ ]
अलंकार → [ ] अलंकाराचे वैशिष्ट्य → [ ]
उत्तर:
उपमेय → [शिवप्रभू]
उपमान → [तळपती तलवार]
अलंकार → [रूपक]
अलंकाराचे वैशिष्ट्य → [उपमेय व उपमान यांत अभेद आहे]
३. वृत्त:
‘मालिनी’ या वृत्ताची लक्षणे सांगून उदाहरण दया.
उत्तर:
लक्षणे – हे एक अक्षरगण वृत्त आहे. चार चरण, प्रत्येक चरणात १५ अक्षरे. गण – न न म य य यति -८व्या अक्षरावर उदाहरण: तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला तो त्याजपाशी नसे तो कठिण समय येता कोण कामास येतो.
४. शब्दसिद्धी:
प्रश्न 1.
पुढील शब्दांना आळ’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) रस – ………………………….
(ii) मध – ………………………….
उत्तर:
(i) रस – रसाळ
(ii) मध – मधाळ.
प्रश्न 2.
‘प्रति’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
(i) ……………………………….
(ii) ……………………………….
(ii) ……………………………….
(iv) ……………………………….
उत्तर:
(i) प्रतिबिंब
(ii) प्रतिदिन
(iii) प्रतिध्वनी
(iv) प्रतिकूल.
५. सामान्यरूप:
तक्ता पूर्ण करा:
शब्द – सामान्यरूप
(i) सामर्थ्याने – …………………….
(ii) कष्टाविण – …………………….
(iii) हृदयात – …………………….
(iv) प्रसन्नतेने – …………………….
उत्तर:
शब्द – सामान्यरूप
(i) सामथ्याने – सामर्थ्या
(ii) कष्टाविण – कष्टा
(iii) हृदयात – हृदया
(iv) प्रसन्नतेने – प्रसन्नते
६. वाक्प्रचार:
योग्य अर्थाची निवड करा:
(i) फळ मिळणे –
(अ) कार्य यशस्वी होणे
(आ) खायला मिळणे.
(ii) विहार करणे –
(अ) संचार करणे
(आ) फिरून येणे.
उत्तर:
(i) फळ मिळणे – कार्य यशस्वी होणे.
(ii) विहार करणे – संचार करणे,
आ (भाषिक घटकांवर आधारित कृती:
१. शब्दसंपत्ती:
(१) प्रत्येकी दोन समानार्थी शब्द लिहा:
(i) काया =
(ii) आकाश =
(iii) कष्ट =
(iv) देव =
उत्तर:
(i) काया = शरीर – देह
(ii) आकाश = आभाळ – गगन
(iii) कष्ट = श्रम – मेहनत
(iv) देव = ईश्वर – ईश
(२) पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा:
(i) तुजभवती –
(ii) जीवनात –
उत्तर:
(i) तुजभवती → तुज – भवती – भव – भज
(ii) जीवनात → जीव – जीना – जीत – वनात
(३) गटात न बसणारा शब्द लिहा:
(i) डोंगर, गिरी, अचल, टेकडी, पर्वत.
(ii) सागर, घागर, समुद्र, सिंधू, रत्नाकर.
(iii) रान, जंगल, झाडे, कानन, विपीन,
(iv) घर, गृह, सहवास, निवास, आलय.
उत्तर:
(i) टेकडी
(ii) घागर
(iii) झाडे
(iv) सहवास.
(४) पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा:
[ ] ← परी → [ ]
[ ] ← माया → [ ]
उत्तर:
परंतु ← परी → पंख असलेली देवता
पैसा ← माया → जिव्हाळा
२. लेखननियम:
अचूक शब्द निवडा:
(i) सर्वोच्च/सर्वोच/सरवोच्च/सर्वोच्य,
(ii) स्फूर्ती/स्फूर्ति/स्फुर्ती/स्फुर्ति.
(iii) सयूक्तिक/सयुक्तीक/सयुक्तिक/संयुक्तीक.
(iv) पश्चाताप/पश्चात्ताप/प्रश्याताप/पश्चत्ताप.
उत्तर:
(i) सर्वोच्च
(ii) स्फूर्ती
(iii) सयुक्तिक
(iv) पश्चात्ताप:
३. विरामचिन्हे:
पुढील ओळीतील विरामचिन्हे ओळखा:
दरि-डोंगर, हिरवी राने
उत्तर:
[ – ] संयोगचिन्ह
[ , ] स्वल्पविराम
४. पारिभाषिक शब्द:
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा:
(i) Category – ……………………………………
(१) अवर्ग
(२) प्रवर्ग
(३) निवडक
(४) सूचक.
(ii) Documentary – ……………………………………
(१) बोलपट
(२) चित्रपट
(३) माहितीपट
(४) रंगपट.
(iii) Honourable – …………………………………… (मार्च ‘१९)
(१) वंदनीय
(२) पूजनीय
(३) श्रवणीय
(४) माननीय.
(iv) Verbal – ……………………………………
(१) आर्थिक
(२) शाब्दिक
(३) आंतरिक
(४) सामाजिक.
उत्तर:
(i) प्रवर्ग
(ii) माहितीपट
(iii) माननीय
(iv) शाब्दिक.
५. अकारविल्हे / भाषिक खेळ:
प्रश्न 1.
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
पिंजरा → पक्षी → जायबंदी → सुटका.
उत्तर:
जायबंदी → पक्षी → पिंजरा → सुटका.
प्रश्न 2.
कृती करा:
उत्तर:
Summary in Marathi
आकाशी झेप घे रे कवितेचा भावार्थ
लौकिक विनाशी गोष्टीत गुंतलेल्या मनाला मोलाचा उपदेश करताना कवी म्हणतात –
हे पाखरा (हे माणसाच्या चंचल मना), तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी मार, सत्ता, संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे.
आता तू मोहमाया, पैसा, संपत्ती यांच्या गराड्यात घेरलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळते आहे. तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावलेले आहे. या सुखात तू लोळतो आहेस. पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. हे वेड्या मना, तू जागृत हो आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा त्याग कर.
हे पाखरा (मनपाखरा), ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखांतील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगर–दऱ्या, हिरवी राने, नया व समुद्र सारे (अडथळे) ओलांडून दिशांच्या पार जा.
कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते कोणतेही सुख मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते; हे तुला समजते पण कृतीमध्ये, आचरणात, वागणुकीत येत नाही. त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते, धुमसत राहते, स्वातंत्र्याची ओढ तर आहे; पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावराबावरा होतो, कासावीस होतो.
घाम गाळला की शेतात मोती पिकतात. पिके बहरतात. हा श्रमरुपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजेच श्रमदेवाचे घरात होणारे आगमन होय, त्या वेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड, सुंदर प्रसंग आयुष्यात येतो, हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण.
आकाशी झेप घे रे शब्दार्थ
- तुजभवती – तुझ्या भोवताली, आजूबाजूला.
- वैभव – समृद्धी.
- माया – पैसा, संपत्ती.
- रसाळ – रसपूर्ण, मधुर, गोड.
- सुखलोलुप – सुखाची आसक्ती, सुखाने घेरलेली.
- काया – शरीर.
- आसरा – आश्रय, निवारा.
- विहार – संचार,
- सामर्थ्याने – शक्तीने, बळाने.
- सरिता – नदी.
- सागर – समुद्र.
- कष्टाविण – मेहनतीशिवाय,
- परि – पण, परंतु.
- व्यथा – दुःख, वेदना.
- बिचारा – गरीब.
- बावरा – गोंधळलेला, बावरलेला.
- श्रमदेव – कष्टाचा ईश्वर.
- अवतरले – प्रकटले, आले.
- प्रसन्नता – टवटवीतपणा, उल्हसित.
- नटले – शोभले.
- योग – घटना, प्रसंग.
- साजिरा – सुंदर, सुरेख.
आकाशी झेप घे रे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
- आकाशी झेप घेणे : मन ध्येयाकडे उंच झेपावणे.
- विहार करणे : विहरणे, संचार करणे.
- फळ मिळणे : कार्य यशस्वी होणे.
- जीव बिचारा होणे : गोंधळून जाणे, गडबडून जाणे.
- घामातून मोती फुलणे : कष्टातून फळ (यश) मिळणे.
- जीवनात योग येणे : आयुष्यात सुखकारी घटना घडणे.
आकाशी झेप घे रे म्हण व तिचा अर्थ
कळते पण वळत नाही – एखादी गोष्ट किंवा तत्त्व समजते, परंतु त्याप्रमाणे आचरण होत नाही, कृती होत नाही.