Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

Day
Night

Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा.

प्रश्न 1.
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण …………….
उत्तर :
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात; कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पाहायचे आहे.

प्रश्न 2.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ……………..
उत्तर :
कवींनी आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले; कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

आ. खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. शेतातील हिरवीगार पिके [ ]
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती [ ]
  3. वेळूच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द [ ]
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द [ ]

उत्तर :

  1. शेतातील हिरवीगार पिके – कोमल पाचूंची शेते
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती – प्रवाळ माती
  3. वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द – इंद्रनीळ
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द – रत्नकळा

इ. एका शब्दात उत्तर लिहा.

प्रश्न 1.

  1. रोमांचित होणारी
  2. नव्याने फुलणारी
  3. लाजणाऱ्या

उत्तर :

  1. रोमांचित होणारी – थरारक
  2. नव्याने फुलणारी – नवे फुलले
  3. लाजणाऱ्या – लाजिरवाणे

ई. कृती करा.

प्रश्न 1.


उत्तर :

2. जोड्या लावा.

प्रश्न 1.

उत्तर :

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णा
उत्तर :

पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येईल, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल – स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
आश्लेषांच्या तुषारस्नानी
भिउन पिसोळी थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :

कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.

आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत.

फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी’ या ग्रामीण शब्दांने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रे थांब जरा आषाढघना
बघु दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंची ही शेतें
प्रवाळमातीमधली औतें
इंद्रनीळ वेळूची बेटे
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुली ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उत्तर :

आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.

काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात – हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.

भाषा वैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे ‘आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले’ यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी

अंत : करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. ‘लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी’ यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :

आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू ‘कालिदास जयंतीला’ मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. ‘शिवानी टेकडी’ ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.

आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते.

पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.

प्रश्न आ.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर…’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर :

आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?
मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा 40° ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर?आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल. सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजकता माजेल. याची भाषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

उपक्रम :

अ. पाच निसर्गकवितांचे संकलन करा आणि त्याचे वर्गात प्रकट वाचन करा.
आ. पावसाशी संबंधित पाठ्यपुस्तकाबाहेरील पाच कवितांचे सादरीकरण करा.

तोंडी परीक्षा.

रे थांब जरा आषाढघना’ या कवितेचे प्रकट वाचन लयीत करा.

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
क्रियापदाच्या रूपानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

  1. मुले शाळेत गेली. → [ ]
  2. ती खिडकी लावून घे. → [ ]
  3. विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. → [ ]
  4. मला जर सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन. → [ ]

उत्तर :

  1. स्वार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. संकेतार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (विधानार्थी करा.)
2. तू नियमित अभ्यास करावास. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
1. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला.
2. तू नियमित अभ्यास कर.

समास :

प्रश्न 1.
‘विग्रहावरून सामासिक शब्द लिहा :

  1. ज्ञानरूपी अमृत/ज्ञान हेच अमृत. → [ ]
  2. जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. → [ ]
  3. तीन कोनांचा समूह. → [ ]
  4. क्रमाप्रमाणे. → [ ]

उत्तर :

  1. ज्ञानामृत
  2. जितेंद्रिय
  3. त्रिकोण
  4. यथाक्रम

प्रयोग :

पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. शेतकऱ्याने कणसाला मातीतून उपटले. → [ ]
  2. कवी पावसाचे वर्णन करतो. → [ ]
  3. केशवने गाणे गायिले. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी → [ ]
2. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. → [ ]
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

रे थांब जरा आषाढघना Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

आषाढ महिन्यातील पावसामुळे चोहीकडे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद खुद्द आषाढमेघाने घ्यावा, अशी विनवणी करताना कवी म्हणतात – हे आषाढ मेघा, जरासा थांब. तुझ्या करुणेमुळे निर्माण केलेले सृष्टिसौंदर्य तुझ्यासह मला डोळे भरून पाहू दे. कोवळ्या नाजूक पाचूसारखी दिसणारी ही हिरवीगार शेते, पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये चालणारी नांगरणी, इंद्रनील रत्नासारखी ही बांबूची बने, हे सर्व सौंदर्य म्हणजे धरतीवर उमटलेल्या तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने ही सुवासिक केतकी रोमांचित झाली आहे. नव्याने फुललेली सोनचाफ्याची कळी झुलते आहे. तुला पुन्हा पुन्हा चोरून बघताना या जाईच्या मुली लाजून चूर झाल्या आहेत.

थोडीशी (न बरसता) उघडीप करून हे सूर्याचे घर उघडून खुले कर, हे आकाश स्वच्छ दिसू दे. तुझ्या जादूने नवीन कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन धरतीवर येऊ दे. ताटावर झुलणारे कणसाचे दाणे तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत आणि फुलांच्या देठात अलवार कोवळा मध साठू दे. आनंदाच्या गोड गाण्याचे बोल पक्ष्यांच्या गळ्यात येऊ देत. पक्ष्यांच्या किलबिल स्वरांनी गवत पात्यांवर आनंदाचा शहारा फुलू दे.

आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या अमाप थेबांची अंघोळ करणारी फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत राहू देत. भर दुपारी रत्नांची किरणे उधळीत ही एकत्र भिरभिरणारी फुलपाखरे या वनराईला निळ्या रंगात बुडवू दे.

काळोखाचे अश्रू पिऊन, ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत झाडांच्या कोवळ्या पानांतून उमललेल्या काजव्यांशी मला गुजगोष्टी करू दे. पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचे सौंदर्य न्याहाळीत मला काजव्यांशी हितगूज करू दे.

शब्दार्थ :

  1. घन – ढग, मेघ.
  2. दिठी – दृष्टी, नजर.
  3. करुणा – दया.
  4. प्रवाळ – पोवळे; (एक लाल रत्न).
  5. औत – नांगर.
  6. वेळूची बेटे – बांबूचे वन, पदविन्यास
  7. खुणा – पाऊलखुणा.
  8. रोमांचित – शहारलेली, सुखद शहारा आलेली.
  9. गंध – सुवास.
  10. सोनचंपक – सोनचाफा.
  11. लेकी – मुली.
  12. तुज – तुला.
  13. गगन – आकाश.
  14. घडिभर – थोडा वेळ.
  15. आसर – उघडीप, पाऊस थोडा वेळ थांबणे.
  16. वासरमणी – सूर्य.
  17. तव – तुझ्या.
  18. किमया – जादू.
  19. हळव्या – हळदीच्या पिवळ्या रंगांचे.
  20. कणस – कणीस.
  21. जिवस – पौष्टिक.
  22. अरळ – अलवार, कोमल.
  23. कंठ – गळा.
  24. खग – पक्षी.
  25. मधुगान – गोड, सुरेल गीत.
  26. तृणपर्ण – गवताचे पाते.
  27. तुषार – शिंतोडे.
  28. स्नान – अंघोळ.
  29. पिसोळी – फुलपाखरू.
  30. रत्नकळा – रत्नाचे तेज.
  31. माध्यान्ह – भर दुपार.
  32. न्हाणोत – भिजवत.
  33. इंद्रवर्ण – निळा रंग.
  34. वन – बन, रान.
  35. पीत – पिऊन.
  36. आसवे – अश्रू.
  37. हितगुज – मनातील गोष्ट, मनोगत.
  38. त्यांसवे – त्यांच्याबरोबर.
  39. निरखीत – न्याहाळत, पाहत.
  40. जळ – पाणी.
  41. विधुवदन – चंद्रबिंब.

टिपा :

  1. आषाढ-चौथा मराठी महिना.
  2. पाचू-हिरवे रत्न.
  3. प्रवाळ-(लाल रंगाचे) पोवळे (रत्न).
  4. इंद्रनीळ – निळ्या रंगाचे रत्न.
  5. केतकी-केवड्याचे झाड (फुले).
  6. चंपक, जाई-फुलांची नावे.
  7. आश्लेषा-एक पावसाळी नक्षत्र.
  8. पालवी-कोवळी पाने.