Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुल (स्थूलवाचन)

Day
Night

Chapter 5.1 हास्यचित्रांतली मुल (स्थूलवाचन)

Textbook Questions and Answers

1. खालील फरक लिहा:

प्रश्न 1.
खालील फरक लिहा:

व्यंगचित्र

हास्यचित्र

उत्तर:

व्यंगचित्र

हास्यचित्र

हास्याबरोबर काही गमतीदार विचार मांडलेला असतो.

केवळ हसवणे हा मुख्य हेतू असतो.

2. वैशिष्ट्ये लिहा:

प्रश्न 1.
वैशिष्ट्ये लिहा:

उत्तर:

  1. व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे.
  2. केवळ हसवणे हा हेतू नसतो.
  3. आपल्याला काहीतरी सांगू पाहते.
  4. गमतीदार विचार मांडलेला असतो.

3. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे.’ हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नसतो. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुणदोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे.

या चित्रांतून-(1) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते; ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे व (2) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे. म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.

4. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यांसह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांची रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत.

भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सर्जनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.

5. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.

प्रश्न 1.
‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर:
व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.

6. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे,’ याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर:
लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली रेषांमधून अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते असे मलाही वाटते.

उपक्रम:

प्रश्न 1.
5 मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.

प्रश्न 2.
खालील चित्राचे निरीक्षण करा. विचार करा. सांगा:

  1. शेजारील चित्रात कोणती समस्या प्रतिबिंबित होते?
  2. ही समस्या का निर्माण झाली असावी?
  3. पाण्यासाठी पैसा व वेळ खर्च करावा लागला तर… कल्पना करा व लिहा.
  4. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
  5. या समस्येसंदर्भात घोषवाक्ये तयार करा.


उत्तर:
1. पाणीटंचाईची गंभीर समस्या प्रतिबिंबित होते.

2. योग्य मार्गाने पाण्याचा साठा न करणे; पाण्याचा गैरवापर करणे ; पाणी प्रदूषित करणे; उतारावरून वाहणारे पाणी न अडवणे या कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली.

3. पाण्यासाठी वारेमाप पैसा खर्च करावा लागला, तर इतर गरजेच्या गोष्टी घेण्यास त्रास होईल व महिन्याचे पैसे खर्च करण्याचे कोष्टक बिघडून जाईल. पाण्यासाठी रांगेत उभे राहिल्यामुळे वेळेचा अपव्यय होईल. इतर कामांसाठी वेळ अपुरा पडेल. माणसाच्या राहणीमानावर विपरीत परिणाम होईल.

4. पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी पुढील उपाय करावे लागतील:

  1. पाण्याची बचत करणे.
  2. पाण्याचा गैरवापर टाळणे.
  3. पाण्याचा योग्य साठा करणे.
  4. जलप्रदूषण टाळणे.
  5. पाणी वाया न दवडणे.
  6. पाण्याविषयी जनजागृती तयार करणे.
  7. पाण्याचे महत्त्व जनमानसाला पटवून देणे.

5. घोषवाक्ये:

  1. पाण्याचा गैरवापर करू नका
  2. जलप्रदूषण थांबवा
  3. पाणी साठवा, पाणी वाचवा
  4. पाणी वाया दवडू नका
  5. पाणी आहे, तर जीवन आहे पाणी नाही, तर मरण आहे
  6. पाण्याची बचत म्हणजे
  7. जीवनाची बचत
  8. जल-अभियान सुरू करा

भाषाभ्यास:

1. चेतनगुणोक्ती अलंकार:

1. खालील ओळी वाचा व समजून घ्या.
उदा., “नित्याचेच दुःख होते
उशागती बसलेले
…. तोच अवचित आले
सुख ठोठावीत दार ।” (कृ. ब. निकुम्ब)

1. वरील ओळींमधील अचेतन गोष्टी कोणत्या ? [ ] [ ]
2. अचेतन गोष्टी कोणत्या क्रिया करतात? [ ] [ ]
3. अचेतन गोष्टी ज्या क्रिया करतात त्या मानवी आहेत का? [ ] [ ]

चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये –

1. अचेतन वस्तूंना सचेतन मानले जाते.
2. त्या वस्तू सजीव प्राण्याप्रमाणे किंवा माणसाप्रमाणे वागतात.

2. अचेतन वस्तूवर जेव्हा सचेतनेचा किंवा मानवेतर प्राण्यांवर मानवी गुणधर्माचा आरोप केला जातो, तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ अलंकार होतो.

3. खालील वाक्य वाचून दिलेल्या चौकटीत उत्तरे लिहा.

मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे.

1. प्रस्तुत उदाहरणातील अचेतन गोष्ट – [ ]
2. अचेतन गोष्टीने केलेली कृती – [ ]
3. अचेतन गोष्टीने केलेली कृती कशी आहे? – [ ]

Summary in Marathi

पाठाचा परिचय:

या पाठात लहान मुलांसाठी/मुलांवर रेखाटलेल्या कार्टून्स किंवा हास्यचित्रांबद्दल लेखकांनी गमतीशीर व मार्मिक विचार मांडले आहेत. त्यासाठी हास्यचित्रांची विविध उदाहरणे दिली आहेत.

पाठातील महत्त्वाचे मुद्दे:

1. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. व्यंगचित्र हा हास्यचित्रामधील पुढचा टप्पा आहे. व्यंगचित्र व हास्यचित्र यांत फरक आहे. व्यंगचित्रात केवळ हसवणे हा हेतू नसतो. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार मांडलेला असतो.
2. मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. त्यात व्यंगचित्रकाराचे कौशल्य पणाला लागते. मुलांसाठी विनोद , करणे सोपे असते पण व्यंगचित्रातील मूल हे मुलांसारखे दिसणे ही कठीण गोष्ट आहे.

काही हास्यचित्रांचे विश्लेषण:

1. शि. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांनी काढलेले हे हास्यचित्र आहे. या चित्रात फ्रॉक घातलेली एक मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घालते आहे. तिचा निरागसपणा या चित्रातून रेखाटला आहे.

2. पहिल्या चित्रात उद्गारासकट एक रांगणारे मूल दाखवले आहे. दुसऱ्या चित्रात एक बालक देवाला ‘बॅडमिंटनचे शटल’ (फूल) वाहतो आहे. दोन्ही बालकांच्या बोलण्यातून सदयः परिस्थितीवर गमतीशीर भाष्य केले आहे. चित्र व हास्यचित्र यांत मूलभूत फरक – चित्रात हुबेहूब माणूस काढावा लागतो, तर हास्यचित्रात चित्राचीच गमतीदार है हुबेहूब नक्कल असते.

3. डेव्हिड लँग्डन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची ही दोन हास्यचित्रे आहेत. पहिल्या चित्रात एक चतुर मुलगा ‘लहान मुलांसाठी बचत करण्याचा असलेला डबा’ फोडतो आहे. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव – बिचकणे, घाबरणे, कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शिताफी – हे सर्व पाहून हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा मुलगा अहे. काहीतरी मिळावे म्हणून एरव्ही लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली ‘सेफ्टी पिन’ टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो आहे, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा हसू फुटते.

4. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे हे हास्यचित्र आहे. यात एक मोठा माणूस व छोटा मुलगा आहे. मुलाला जमिनीवर बसवून केस कापण्याचा हा प्रसंग पूर्वी खेड्यात सर्रास दिसत असे. या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावरील कंटाळ्याचे व वैतागलेले भाव, यांचा गमतीशीर विरोधाभास जाणून हास्य निर्माण होते.

5. ही चिंटूची चित्रमालिका आहे. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू, ‘नदीचे पाणी कुठे जाते?’ असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो आहे. ते उत्साहाने उत्तर देतात. परंतु पुढच्या चित्रात ‘नदीत चावी पडली, म्हणून विचारतोय.’ या चिंटूच्या खुलाशामुळे चिंटूचा निरागस खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिरास यांची जुगलबंदी गमतीशीर आहे.

6. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र आहे. पहिल्या चित्रात एक लहान मुलगा स्टुलावर चढून भलेमोठे व्हायोलीन वाजवतो आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलीन वाजवतो आहे. लहान मुलांना ‘मोठ्या’ वस्तूंचे आकर्षण असते, तर वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक खोल व सूक्ष्म होत जातो व बाह्य आकाराचे आकर्षण कमी होते – हा विचार किती खुबीने सांगितला आहे!

7. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे हे हास्यचित्र आहे. या चित्रात एक स्काउटचा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या चित्रात मुलाच्या तोंडावरील भाव व त्याचा वेडावाकडा झालेला देह (शरीर) हे इतके अप्रतिमपणे रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे सिद्ध होते.

अशा प्रकारे, लहान मुलांचे चित्र काढताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात:

  1. लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते.
  2. हातापायांची बोटे लहान काढली की नखे आपोआप लहान होतात.
  3. नाकाचा, ओठांचा आकार काढल्यावर कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात.
  4. लहान मुलांना दाढी-मिशी नसते.
  5. व्यंगचित्रे बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टींची नोंद घेणे गरजेचे आहे.