Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

Chapter 6 आभाळाची अम्ही लेकरे

Textbook Questions and Answers

1. खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा –
(आ) इच्छा –
(इ) अखंड –
(ई) आकाशप्र –

प्रश्न 1.
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
(अ) किनारा – [ ]
(आ) इच्छा – [ ]
(इ) अखंड – [ ]
(ई) आकाशप्र – [ ]
उत्तर:
(अ) किनारा – [तीर]
(आ) इच्छा – [आस]
(इ) अखंड – [अभंग]
(ई) आकाश – [आभाळ]

2. कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. 

प्रश्न 1.
कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
(i) इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे

(ii) माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते

(iii) कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढून नेऊ

3. कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
उत्तर:
1. आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
2. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
3. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।
4. माणुसकीचे अभंग नाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
5. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।

4. ‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा 

प्रश्न 1.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा
उत्तर:
कृती 3 : काव्यसौंदर्य मधील (1) चे उत्तर पहा.

5. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.

प्रश्न 1.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
उत्तर:

  1. तीरावरती – बसती
  2. नाव – गाव
  3. ठावे – करावे
  4. मार्ग – स्वर्ग
  5. नाते – भाग्यविधाते
  6. पंथ – संत
  7. बाहू – नेऊ
  8. आस – ध्यास

6. खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा. 

(अ) आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.

(आ) इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे

प्रश्न अ.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
उत्तर:
वसंत बापट यांनी ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यांमध्ये एकी दिसून येत नाही.

मात्र कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात. आपले आई बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात, धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जातीधर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात.

प्रश्न आ.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
उत्तर:
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून, करुन, स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते.

कष्टांपुढे, कामापुढे त्यांना दुसरे काही महत्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्गसुख सगळ्यांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे स्पष्ट होते.

भाषेची गंमत :

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (1) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(2) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.

Important Additional Questions and Answers

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती

करा. कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
चौकट पूर्ण करा.
उत्तर:

  1. कष्टकऱ्यांची आई – [काळी माती]
  2. अभंग राहणारे नाते – [माणुसकी]
  3. बळकट बाहूंनी हे ओढता येणे शक्य – [जगन्नाथ रथ]

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. आभाळाची अम्ही लेकरे …………….. माती आई। (लाल, काळी, तांबडी, ओली)
  2. माणुसकीचे ……………. नाते, आम्हीच अमुचे भाग्यविधाते। (अभंग, अतूट, अखंड, अबाधित)
  3. कोटि कोटि हे ……………. बाहू। (दणकट, बळकट, बलशाली, सामर्थ्यवान)

उत्तर:

  1. काळी
  2. अभंग
  3. बळकट

प्रश्न 4.
खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा,

  1. श्रमगंगेच्या तीरावरती ………………..
  2. ………………. घाम गाळुनी काम करावे
  3. ……………. आम्हा ध्यास वेगळा नाही।।
  4. मार्ग वेगळा नाही आम्हा …………………

उत्तर:

  1. श्रमगंगेच्या तीरा वरती कष्टकऱ्यांची अमुची वसती
  2. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळुनी काम करावे
  3. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।
  4. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न i.
कष्टकऱ्यांची वस्ती कुठे आहे?
उत्तर:
कष्टकऱ्यांची वस्ती श्रमगंगेच्या तीरावरती आहे.

प्रश्न ii.
कष्टकऱ्यांना कोणते इमान ठाऊक आहे?
उत्तरः
कष्टकऱ्यांना घाम गाळून काम करत राहणे हे एकच इमान ठाऊक आहे.

प्रश्न iii.
कष्टकरी आपण कोणाची लेकरे असल्याचे सांगतात?
उत्तर:
आम्ही सारे कष्टकरी आभाळाची लेकरे असून काळी माती आपली आई असल्याचे कष्टकरी सांगतात.

प्रश्न iv.
कष्टकरी आपल्या बाहूंवरील विश्वास कसा दर्शवतात?
उत्तरः
कष्टकरी आपले बाहू जगन्नाथ रथ ओढून नेण्याइतके बळकट असल्याचे सांगत त्यांवर विश्वास दर्शवतात.

प्रश्न 3.
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट

‘ब’ गट

1. नाव

(अ) संत

2. मार्ग

(ब) भाग्यविधाते

3. पंथ

(क) गाव

4. आस

(ड) स्वर्ग

5. नाते

(ई) ध्यास

उत्तर:

‘अ’ गट

‘ब’ गट

1. नाव

(क) गाव

2. मार्ग

(ड) स्वर्ग

3. पंथ

(अ) संत

4. आस

(ई) ध्यास

5. नाते

(ब) भाग्यविधाते

कृती 3 : काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
जात, धर्म, पंथाने विभागल्या गेलेल्या माणसाला स्वत:च्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी कोणा-ना-कोणाची गरज पडत असते. मात्र निसर्गाची लेकरे असलेल्या कष्टकऱ्यांना मात्र तशी कोणाचीच गरज पडत नाही. सर्व कष्टकरी सगळ्यांनी एकच जात, धर्म, पंथ मानतात व माणुसकीचे कधीही न दुभंगणारे नाते जपतात. म्हणूनच स्वत:ची प्रगती साधण्यासाठी, भाग्य उजळण्यासाठी त्यांना कोणाचीच गरज पडत नाही.

प्रश्न 2.
‘मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
कष्टकऱ्यांमध्ये असलेले माणुसकीचे अभंग नाते विशद करताना कवी त्यांच्यातील एकजूटही सहज, सोप्या भाषेत नमूद करतात. स्वतःला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी नाव, गाव, जात, धर्म, पंथ सर्व एकच आहे. त्यांचा मार्गही एकच अर्थात कष्टाचा मार्ग आहे.

स्वर्गप्राप्ती ही अंतिम इच्छा सामान्यतः माणूस ठेवत असताना कष्टकऱ्यांसाठी अंतिम ध्येय, उद्दिष्ट हे एकच आहे. कष्टकऱ्यांच्या उदात्त विचारांचे सहजसुंदर दर्शन प्रस्तुत काव्यपंक्तीतून दिसून येते.

दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1.
दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तर:
1. कवी/कवयित्री – वसंत बापट
3. कवितचा रचनाप्रकार – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता यमक या रचनाप्रकारात लिहलिी आहे.
3. कवितेचा काव्यसंग्रह – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता शिंग फुकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
4. कवितेचा विषय – मानवतावादी उदात्त विचार व कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते या कवितेतून स्पष्ट केले आहे.
5. कवितेतून व्यक्त होणारा भाव – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून ‘शांत’ हा स्थायी भाव दिसून येतो.

6. कवी/कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये – माणुसकीच्या अभंग नात्याशी सहज जोडणारी कविता म्हणजे ‘आभाळाची अम्ही लेकरे’ ही कविता होय. या कवितेतून शांतरस दिसून येतो. कवीने अतिशय सोप्यासहज भाषाशैलीतून मानवतावादी विचार मांडले आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्ट हीच एक जात, पंथ, मार्ग, धर्म, ध्यास असल्याचे सांगून सर्व एकाच निसर्गाची लेकरे असल्याचा उदात्त विचार अधोरेखित केला आहे. यमक

7. साधल्यामुळे शाब्दिक सौंदर्य निर्माण झाले आहे. मध्यवर्ती कल्पना – सर्व कष्टकरी निसर्गाची, आभाळाची लेकरे असून त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद्रभाव नसतो. स्वकष्टावर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी जात, धर्म, नाव, गाव हे एकच असते. कष्टाचा मार्ग व अंतिम ध्येय ऐकच असते. आपल्या बाहूंवर, कष्टांवर विश्वास असणाऱ्या कष्टकऱ्यांची इच्छा व ध्यास एकच असतो आणि म्हणूनच कष्टकऱ्यांमधील हे नाते अभंग रहाते.

8. कवितेतून व्यक्त होणारा विचार – वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेत मानवतावाद व माणुसकीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी ‘माणुसकी’ हा एकच धर्म आहे. नाव, गाव, पंथ-संत एकच मानणाऱ्या कष्टकऱ्यांचा स्वत:च्या बाहूंवरील विश्वास त्यांच्यातील अभंग नात्याची ग्वाही देतो. माणुसकीचे अभंग, अतूट नाते व त्यातून निर्माण होणारा विश्वास या कवितेतून दिसून येतो.

9. कवितेतील आवडलेली ओळ –
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।

10. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
वसंत बापट यांनी आपल्या कवितेतून समाजात आवश्यक असणाऱ्या माणुसकीच्या कवितेतून समाजात आवश्यक असणाऱ्या माणुसकीच्या नात्याचे अनन्यसाधारण महत्त्व मांडले आहे. जात, धर्म, पंथ, संत वेगवेगळे मानून भेदभाव निर्माण करणाऱ्या माणसांपेक्षा ‘माणुसकी’ हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांचे वेगळेपण कष्टकरी समाजात मानवतावाद पसरवण्याची आस उरी बाळगतात. माणुसकी या अभंग नात्याचा पाया भक्कम करणारी ही कविता मनाला उभारी देते आणि म्हणूनच मनाला भावते.

11. कवितेतून मिळणारा संदेश – ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेत मानवतावादी उदात्त विचार मांडले आहेत. आभाळाची निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहात नाही. स्वकष्टावर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी माणुसकीचे नाते अनमोल ठरते. स्वत:च्या कामावर निष्ठा ठेवून अविरत मेहनत घेऊन स्वर्गसुख प्राप्त करण्याचा ध्यास घेतल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचा संदेश आपल्याला प्रस्तुत कवितेतून मिळतो.

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
उत्तरः
वसंत बापट यांनी ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून माणुसकीचा, एकीचा उदात्त विचार मांडला आहे. सर्व माणसे निसर्गाची लेकरे असल्याचा सुंदर विचार वरील काव्यपंक्तीतून दिसून येतो. माणूस हा अनेक जाती, धर्मांनी विभागला गेल्यामुळे त्यांमध्ये एकी दिसून येत नाही. मात्र कष्टकरी स्वत:ला निसर्गाची, आभाळाची लेकरे मानतात व काळ्या मातीला आपल्या आईच्या स्थानी ठेवतात.

आपले आई बाप एक असल्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी जात, धर्म वेगवेगळा ठरत नाही. आपण सर्व एकाच जातीधर्माचे असल्याचे ते ठासून सांगतात. आभाळ, काळी माती अशा शब्दांतून निसर्ग डोळ्यांसमोर उभा करण्याची किमया कवीने साधली आहे. कवीची, भाषाशैली सहजसोपी असून लयबद्ध पंक्तीतून ती वाचकांच्या सहज लक्षात येते.

प्रश्न 2.
श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही।
उत्तरः
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेमधील या पंक्ती असून वसंत बापट यांनी त्यातून कष्टकऱ्यांसाठी श्रमाचे असलेले महत्त्व विशद केले आहे. नाव, गाव एक मानणाऱ्या कष्टकऱ्यांची एकी यातून पहावयास मिळते. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी श्रम हे गंगेसारखे पवित्र व महत्त्वाचे आहे.

कष्ट करून आपले जीवन घडवणारे कष्टकरीश्रमरूपी गंगेच्या तीरावरती कायमस्वरूपी आपली वस्ती असल्याचे सांगतात. त्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी गाव वेगवेगळे ठरत नाही. आपण सारे एकच आहोत म्हणूनच त्यांना आपल्या नावातील वेगळेपणही मान्य नाही. कष्टकऱ्यांची एकी स्पष्ट करताना तीरावरती, वसती, नाव, गाव असे शब्द वापरून कवीने यमक साधले आहे. त्यामुळे भाषिक सौंदर्यात भर पडली आहे.

प्रश्न 3.
इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही।।
उत्तरः
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. कष्टकऱ्यांसाठी कष्टाहून श्रेष्ठ काही नाही याचा प्रत्यय वरील काव्यपंक्तीमधून येतो. आपापसात कोणताही भेदभाव न मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आपले इमानही एकच आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणारे काम मनापासून, करून, स्वकष्टाने ते पूर्णत्वास नेण्याची त्यांची निष्ठा त्यांना एक करते.

कष्टांपुढे, कामापुढे त्यांना दुसरे काही महत्त्वाचे वाटत नाही. म्हणूनच त्यांचा कष्टाचा मार्ग व त्यातून मिळणारे स्वर्गसुख सगळयांना वेगळे नसून एकच आहे. कष्टातून मिळणारे सुख, समाधान त्यांना स्वर्गप्राप्तीच्या सुखासारखे वाटते हे स्पष्ट होते. सतत काम करण्याचे कष्टकऱ्यांचे एक इमान ही कल्पना काव्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. शब्दांनी साधलेल्या यमकातून कष्टकऱ्यांचा दृढनिश्चय मनाला भिडतो. ध्येयपूर्तीची संकल्पनाही भाषिक सौंदर्य वाढवते.

प्रश्न 4.
माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही।।
उत्तरः
‘आभाळाची अम्ही लेकरे’ या वसंत बापट लिखित कवितेतील वरील ओळी असून कधीही न दुभंगणाऱ्या अशा माणुसकीच्या नात्याचे व त्यामुळे होणाऱ्या फायद्याचे महत्त्व कवीने प्रस्तुत ओळीतून विशद केले आहे. स्वत:ला निसर्गाची लेकरे मानणाऱ्या कष्टकऱ्यांना आपापसातील नात्याला कोणतेही नाव देणे मान्य नाही. त्या सर्वांना एकच नाते ठाऊक आहे, ते म्हणजे माणुसकीचे नाते. जे सदैव अभंग, अतूट राहणारे आहे. अशा नात्यामुळेच व कष्ट करण्याच्या जिद्दीमुळे त्यांना स्वत:चे भाग्य बदलण्यासाठी कोणाची गरज नाही.

ते स्वत:लाच आपले भाग्यविधाते मानतात. माणुसकीचे नाते श्रेष्ठ मानल्यामुळे ते कोणत्याही पंथाला, संताला, संप्रदायाला वा त्यांच्या विचारांना मानत नाही. त्यांच्यासाठी ‘कष्ट’ हा एकच पंथ आहे तर ‘माणुसकी’ हा एकच संत आहे. कधीही विचार न केलेल्या नात्यातून कवीने अत्यंत खुबीने माणुसकीचे व कष्टाचे समर्थन केले आहे. अत्यंत साध्या पण अर्थपूर्ण भाषाशैलीतून कवीने उत्कृष्ट संदेश दिला आहे.

प्रश्न 5.
कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओढुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही।।
उत्तरः
प्रस्तुत काव्यपंक्ती वसंत बापट लिखित ‘आभाळाची अम्ही लेकरे’ या कवितेतून घेतल्या आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती व आपल्या बाजूंवर असणारा दृढ विश्वास हे कष्टकऱ्यांचे गुणविशेष वरील काव्यपंक्तीमधून दिसून येतात. कष्टाला आपले इमान मानणाऱ्या, स्वत:चे भाग्य स्वत: लिहिण्याची हिंमत ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांना आपल्या बाहूंवर प्रचंड विश्वास आहे.

सगळ्यांना समान मानणाऱ्या कष्टकऱ्यांचे अनेक हात एकत्र आल्यावर जगन्नाथ रथ ओढून नेण्याची क्षमताही त्यांच्यात असल्याचे ते आत्मविश्वासाने सांगतात. कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची त्यांची आस व ध्येयपूर्तीचा ध्यास त्या सगळ्या कष्टकऱ्यांसाठी एकच आहे.

उपरोक्त पंक्तीतून स्वत:वर असणाऱ्या विश्वासाचे व एकीचे, कार्यपूर्तीसाठी असणारे महत्त्व दाखवून दिल्याने आशय संपन्नता प्राप्त झाली आहे. आस, ध्यास अशा आत्मविश्वासपूर्ण शब्दांतून कवितेत आशयसौंदर्य निर्माण झाले आहे.

Summary in Marathi

काव्यपरिचय :

वसंत बापट लिखित प्रस्तुत कविता मानवतावादी उदात्त विचारांचे दर्शन घडवते. निसर्गाची लेकरे असणाऱ्या कष्टकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. आपल्या कष्टांवर विश्वास ठेवणाऱ्या कष्टकऱ्यांमधील माणुसकीचे नाते अभंग राहते.

The poet Vasant Bapat has described humanitarian noble thoughts through his poem ‘Abhalachi Amhi Lekare.’ All labourers are children of nature and they do not discriminate amongst themselves. They believe in hard work and share a common bond of humanity.

भावार्थ :

आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।

कष्टकऱ्यांमधील नाते स्पष्ट करताना कवी वसंत बापट सांगतात की, आम्ही सर्व निसर्गाची, आभाळाची लेकरे असून काळी माती आमुची आई आहे. म्हणूनच आमची जात अथवा धर्म वेगवेगळा नसून तो एकच आहे.

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकऱ्यांची अमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही ।।

गंगेइतकीच पवित्रता कष्टकऱ्यांच्या श्रमामध्ये असल्याने कवी कष्टकऱ्यांची वस्ती ही श्रमरूपी गंगेच्या तीरावरती असल्याचे सांगतात. या सर्व कष्टकऱ्यांचे गावच नाही तर नावही | वेगळे नसून एकच असल्याचेही ते नमूद करतात.

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही ।।

स्वत:च्या कामावर निष्ठा असणाऱ्या कष्टकऱ्यांनी घाम गाळून, अविरत मेहनत घेऊन काम करत राहणे ही एकच गोष्ट माहीत आहे. त्यांच्यासाठी ते स्वर्गसुख आहे सर्व कष्टकरी आपला मार्ग व आपले ध्येय अर्थात स्वर्ग एकच मानतात.

माणुसकीचे अभंग नाते
अम्हीच अमुचे भाग्यविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही ।।

सर्वांना एकसमान मानणाऱ्या सगळ्या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे अखंड, कधीही न दुभंगणारे नाते आहे. आपल्या कष्टांवर विश्वास असणाऱ्या त्यांना आपणच आपले भाग्यविधाते असल्याची खात्री आहे. ‘माणुसकी’ हा एकच धर्म मानणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी पंथ वा संत वेगळा नाही.

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ रथ ओळुन नेऊ
आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही ।।

कष्टकऱ्यांना स्वत:च्या बाहुंवर विश्वास आहे. त्यांचे खांदे इतके बळकट आहेत की ते जगन्नाथ रथ एकत्र ओढून नेऊ शकतात याची त्यांना खात्री आहे. मानवतावाद पसरवणाऱ्या या कष्टकऱ्यांची इच्छा, आस एक आहे व ध्यासही एक आहे.

शब्दार्थ :

  1. आभाळ – आकाश, गगन – sky
  2. लेकरे – मुले – children
  3. आई – माता, जननी – mother
  4. श्रम – कष्ट – hardship
  5. तीर – किनारा – shore, bank
  6. वसती – वस्ती, राहण्याचे ठिकाण – habitation
  7. इमान – निष्ठा – constant, loyalty
  8. ठावे – माहीत असणे – to know
  9. घाम – स्वेद – sweat
  10. मार्ग – दिशा, रस्ता – way, direction
  11. स्वर्ग – heaven
  12. माणुसकी – मानवता, सौजन्य- humanity
  13. अभंग – अखंड – unbroken/unbreakable
  14. संत – साधू – saint
  15. पंथ – संप्रदाय – creed
  16. बाहू – हात – arms
  17. आस – इच्छा – desire, wish

वाक्प्रचार :

  1. घाम गाळणे – कष्ट करणे
  2. ठाव असणे – माहीत असणे

टिप :

जगन्नाथ रथ – ओडिसा येथील पुरी येथे असलेले जगन्नाथ मंदिर हे भगवान कृष्णाच्या वैष्णव पंथाचे मंदिर आहे. भगवान कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. या मंदिराचा वार्षिक रथप्रवास उत्सव प्रसिद्ध आहे. त्यामध्ये देवगिरीच्या तीन मुख्य देवता, भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र व सुभद्रा हे तीन वेगवेगळ्या भव्य व सुसज्ज रथांतून बाहेर पडतात व शहराच्या प्रवासासाठी जातात. ओडिसा येथील सर्वात महत्त्वाचा सणही ‘रथयात्रा’ मानतात.