Chapter 7 विंचू चावला…

Day
Night

Chapter 7 विंचू चावला…

Chapter 7 विंचू चावला…

Textbook Questions and Answers

कृती

1. अ. योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.

प्रश्न 1.
तम घाम अंगासी आला, म्हणजे ……..
अ. संपूर्ण शरीराला घाम आला
आ. घामाने असह्यता आली
इ. घामामुळे मन अस्थिर झाले
ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली
उत्तर :

ई. शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.

प्रश्न 2.
मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे ………..
अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते
आ. मनुष्याला इंगळी चावणे वाईट
इ. इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते
ई. मनुष्याला इंगळी नांगा मारते
उत्तर :

अ. माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते

प्रश्न 3.
सत्त्व उतारा देऊन, म्हणजे …….
अ. जीवनसत्त्व देऊन
आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
इ. सात्त्विक आहार देऊन
ई. सत्त्वाचे महत्त्व सांगून
उत्तर :

आ. सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन

प्रश्न 4.
‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे ……..
अ. भारूड उत्तम गाता येते
आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
इ. भारूडाला अर्थप्राप्त होतो
ई. भारूड अधिक रंजक बनत
उत्तर :

आ. वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो

आ. कृती करा.

प्रश्न 1.


उत्तर :

इ. खालील शब्दांचे अर्थ लिहा.

प्रश्न 1.

  1. वृश्चिक ………
  2. दाह ………
  3. क्रोध ………
  4. दारुण ………

उत्तर :

  1. वृश्चिक – विंचू
  2. दाह – आग
  3. क्रोध – राग, संताप
  4. दारुण – भयंकर

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।
उत्तर :

अर्थ : काम-क्रोधरूपी विंचू चावला, तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात – विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया. त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्त्विक गुणांचा अंगारा लावा. म्हणजे विंचू-इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील.

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।4।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :

‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.

तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।1।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।2।।
उत्तर :
आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराज यांनी ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा, याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम-क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे.

काव्यसौंदर्य : काम-क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो, तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो.

भाषिक वैशिष्ट्ये : लोकशिक्षण देणारे ‘विंचू चावला’ हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा, असा मोलाचा संदेश हे भारूड देते. ‘विंचू, वृश्चिक व इंगळी’ अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. ‘तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर :

माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते; पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की, मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की, मी वेळेवर जेवण, झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही. त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले, तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले.

पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला, तरी तो नाहक आहे, हे जाणून घेतले. एखादया गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का, याची शहानिशा मी मनाशी करू लागलो नि माझ्या लक्षात आले की, माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले नि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे, ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो.

प्रश्न आ.
‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
उत्तर :
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा, यांचा उपदेश मार्मिक प्रतीकांतून केला आहे.

संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकूळ करतो. येथे काम-क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता.

म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.

उपक्रम :

संत एकनाथ महाराज यांची इतर भारुडे मिळवून वाचा.

तोंडी परीक्षा.

‘विंचू चावला’ हे भारूड सादर करा.

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → [ ] व [ ]
  2. घामाचे नाव → [ ]
  3. व्याकूळ झालेला → [ ]
  4. अतिभयंकर असलेली → [ ]
  5. फुणफुण शांत करणारे → [ ]

उत्तर :

  1. विंचू या अर्थाची दोन नावे → वृश्चिक व इंगळी
  2. घामाचे नाव → तम घाम
  3. व्याकूळ झालेला → पंचप्राण
  4. अतिभयंकर असलेली → मनुष्य इंगळी
  5. फुणफुण शांत करणारे → जनार्दन स्वामी

व्याकरण 

वाक्यप्रकार :

क्रियापदाच्या रूपावरून पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. पाऊस पडला असता, तर हवेत गारवा आला असता. → [ ]
  2. मनुष्य-इंगळी अतिदारुण आहे. → [ ]
  3. तुम्ही नक्की परीक्षेत यश मिळवाल. → [ ]
  4. संत एकनाथ महाराजांनी भारुडातून लोकशिक्षण दिले. → [ ]

उत्तर :

  1. संकेतार्थी वाक्य
  2. स्वार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. स्वार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.
1. भारतीय क्रिकेट संघ विजयी झाला. (नकारार्थी करा.)
2. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :

1. भारतीय क्रिकेटसंघ पराभूत झाला नाही.
2. प्रत्येक गोष्टीचे सुख मानावे.

समास :

तक्ता पूर्ण

करा :

प्रश्न 1.

उत्तर :

प्रयोग :

पुढील प्रयोगांच्या वैशिष्ट्यांवरून प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदात कुठलाच बदल होत नाही. → [ ]
2. कर्माच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाच्या रूपात बदल होतो. → [ ]
उत्तर :

1. भावे प्रयोग
2. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. → [ ]
2. एखादया गोष्टीचे वा प्रसंगाचे वा व्यक्तीचे वर्णन करताना असंभाव्य कल्पना केली जाते. → [ ]
उत्तर :

1. अर्थान्तरन्यास अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

विंचू चावला… Summary in Marathi

कवितेचा (भारुडाचा) भावार्थ :

‘बहुरूङ’ ते भारूड होय. भारुडात ‘आध्यात्मिक रूपक’ वापरलेले असते. प्रतीकांमधून लोकशिक्षण देणारी नाट्यमय रचना म्हणजे भारूड होय. ___ ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या दुर्गुणांवर प्रहार करताना संत एकनाथ महाराज म्हणतात – मला (मनुष्याला) विंचू चावला. काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की, माझ्या अंगाला दुर्गुणाचा घाम फुटला. ।। धृ ।।

काम-क्रोधरूपी हा विंचू चावल्यामुळे त्याच्या डंखाने माझा जीव व्याकूळ झाला. प्राण कंठाशी आले. प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत. माझ्या तनामनाची आग झाली आहे.।।1।।

मनुष्यरूपी ही इंगळी (विंचू) इतकी भयंकर आहे की, तिने नांगी मारताच त्या दंशाने सर्वांगाला वेदना झाली. ठणका लागला. त्या इंगळीचे विष सर्वांगभर पसरले.।।2।।

या विंचवाच्या डंखाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातील तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया, त्याचा त्याग करा. हे दुर्गुण नाहीसे करण्याचा उपाय म्हणजे सात्त्विक गुणांचा अंगारा लावा, या सत्त्वगुणाच्या अंगाऱ्याने विंचू-इंगळीरूपी विकार पटकन् दूर होतील.।।3।।

अशा प्रकारे सात्त्विक गुणाचा उतारा घेऊन सगळी तामसवृत्ती, दुर्गुण दूर केले, थोडीशी ठसठस राहिली आहे, ती गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने शांत केली.।।4।।

शब्दार्थ :

  1. वृश्चिक – विंचू.
  2. तम – (येथे अर्थ) दुर्गुण.
  3. पंचप्राण – जीव.
  4. सांग – सगळे अंग.
  5. दाह – आग.
  6. इंगळी – (मोठा) विंचू.
  7. अतिदारुण – खूप भयंकर.
  8. मज – मला.
  9. नांगा – दंश.
  10. वेदना – कळ.
  11. सत्त्वगुण – चांगले गुण.
  12. अंगारा – उदी.
  13. झरझरा – पटकन.
  14. अवघा – सगळा.
  15. सारिला – मागे केला.
  16. फुणफुण – ठसठस.